श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी साठी संगमनेर – राहाता तालुक्यातून जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश
प्रतिनिधी —
श्री संत निवृत्ती महाराजांची पालखी संगमनेर आणि राहता तालुक्यातून जाणार आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील पारेगाव आणि राहता या ठिकाणी पालखीचा मुक्काम आहे. त्यामुळे या मार्गावरून जाताना पालखीतील वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत चालू राहावी यासाठी दिनांक 26 जून ते 28 जून पर्यंत या मार्गावरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे.

श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आगमन संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक या गावांमध्ये दिनांक 26 जून 2024 रोजी सायंकाळी चार वाजता होणार असून त्या ठिकाणी पालीखीचा मुक्काम आहे.
त्यानंतर दिनांक 27 जून रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नांदूर शिंगोटे ते लोणी या मार्गावरून तळेगाव दिघे मार्गे वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, कासारे, लोहारे आणि त्यानंतर पुढे लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील गोगलगाव तालुका राहता येथे पालखी जाणार असून त्या ठिकाणी मुक्काम आहे.

तसेच 28 जून 2024 रोजी सकाळी सहा वाजता पुन्हा नांदूर शिंगोटे लोणीच्या दिशेने जाणार आहे. नांदूर शिंगोटे ते लोणी हा रस्ता खूपच अरुंद असून जड वाहतूक चालू असते. श्री संत निवृत्ती महाराज पालखी महत्त्वाची असून पालखीमध्ये सुमारे एक लाखाच्या वर वारकरी सहभागी होत असल्याने पालखी या रस्त्याने जात असताना वाहनांमुळे पालखीतील भाविकांना धक्का लागून अडचण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याकरिता श्री संत निवृत्ती महाराज पालखी मार्गावरील जड वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे त्यानुसार या मार्गावरील जड वाहतूक दिनांक 26 जून 2024 रोजी पहाटे पाच वाजल्यापासून 28 जून 2024 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात आलेली आहे.
• लोणी तळेगाव दिघे मार्गे नांदूर शिंगोटेकडे जाणाऱ्या सर्व जड वाहतुकीसाठी वाहतुकीचा मार्ग लोणी, वडगाव पान, तळेगाव दिघे, संगमनेर, नांदूर शिंगोटे
• नांदूर शिंगोटे कडून लोणी तळेगाव दिघे कडे जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी मार्ग नांदूर शिंगोटे, तळेगाव दिघे, वडगाव पान, लोणी, अहमदनगर
• लोणी तळेगाव दिघे कडून कोपरगाव कडे जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी मार्ग लोणी वडगाव पान, तळेगाव दिघे, झगडे फाटा, कोपरगाव
• कोपरगाव कडून लोणी कडे जाणाऱ्या जड वाहतुकीसाठी मार्ग कोपरगाव, झगडे फाटा, तळेगाव दिघे, वडगाव पान, लोणी, अहमदनगर असा असेल
