पालकमंत्री विखे पाटील यांच्या आदेशामुळे आवर्तन काळात संगमनेर अकोले तालुक्यातील वीज पुरवठा बावीस तास खंडित !
शेतकऱ्यांचे आणि पशुधनाचे अतोनात हाल ; निवडणुकीच्या काळात जनक्षोभ होईल
डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात
प्रतिनिधी —
भंडारदरा – निळवंडे धरणातून सध्या पाण्याचे आवर्तन सुरू आहे. हे पाण्याचे आवर्तन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने देण्यात आलेले आहे. त्याच वेळी त्यांच्या या आदेशामुळे संगमनेर अकोले तालुक्यात दररोज 22 तास वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे जनतेचे, शेतकऱ्यांचे आणि पशुधनाचे अतोनात हाल होत असल्याची टीका संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडिया मधून केली आहे.

कडक उन्हाळ्यात अवघे दोन तास वीज पुरवठा चालू राहत असल्याने सर्वच प्रकारच्या उन्हाच्या झळा शेतकऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. थोरात यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, पालकमंत्री विखे यांच्या आदेशाने भंडारदरा निळवंडे धरणाचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. अकोले – संगमनेर तालुक्यात प्रतिदिन 22 तास वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील जनतेस व पशुधनास पिण्याच्या पाण्या पासून वंचित ठेवण्याचा अघोरी व अन्यायकारक आदेश पाटबंधारे विभागाने देऊन या भागातील जनतेवर अन्याय केला आहे.
यापूर्वी आवर्तनाच्या काळामध्ये प्रतिदिन पाच तास वीज पुरवठा देण्याचे प्रचलित असताना आता फक्त दोन तास वीज पुरवठा करण्यात येतो. हे चुकीचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी वेळीच दुरुस्ती न केल्यास जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होऊ शकतो आणि ऐन लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जन आंदोलन होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे अवघड होईल, असाही इशारा त्यांनी या पोस्ट मधून दिला आहे.

