संगमनेरात सोशल मीडियातून हिंदू मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न !

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी विकृत पोस्ट व्हायरल..

भाजपच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यासह इतरांवर कायदेशीर कारवाई करण्याची महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची मागणी..

प्रतिनिधी —

लोकसभा निवडणुकीच वारं शिर्डी लोकसभा मतदारसंघात थंडावलं असलं तरी समाज माध्यमात मात्र अद्यापही त्याचे पडसाद उमटत आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रात छेडछाड करून ते छायाचित्र समाज माध्यमात आक्षेपार्ह मेसेजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आले. त्यामुळे शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्याच्या कारणावरून मंगळवारी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी असलेल्या दीपक भगत तसेच माजी नगरसेवक अजित माणियार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

संगमनेर पोलिस शहरात समाज माध्यमातून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान प्राथमिक उपायोजना करताना पोलिसांनी संबंधित व्हाट्सअप ग्रुपच्या ॲडमिनला नोटीस बजावली आहे. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमधील सोशल वॉरमधून दोन धर्मीयांच्या तसेच दोन पक्षांच्या भावना दुखावल्या जात असल्याने या माध्यमातून सामाजिक शांततेला गालबोट लावू शकते. याची जाणीव असताना देखील समाज माध्यमातून अशा प्रकारचे संदेश सातत्याने टाकले जातात.

विशेष म्हणजे शहरातील बहुतांशी व्हाट्सअप ग्रुपवर शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असताना देखील अशा प्रकारचे मेसेज व्हायरल केले जातात. शासकीय अधिकारी देखील अशा मेसेजकडे बऱ्याचदा कानडोळा करताना दिसतात. संगमनेरात गेल्या काही दिवसातील जातीय प्रकार बघता या संबंधाने समाज माध्यमात देखील विविध प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. यातूनच दोन धर्मीयात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा देखील आरोप सातत्याने होत होता. मात्र वेळीच प्रशासनाने या गोष्टी काबूत आणल्याने अनर्थ टळला.

महाविकास आघाडीच्यावतीने प्रमुख कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीत भाजप पदाधिकारी असलेले दीपक भगत यांच्यासह काही लोक सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांबद्दल आक्षेपार्ह मेसेज, छायाचित्रे व्हाट्सअप ग्रुप, फेसबुकसह अन्य समाज माध्यमात टाकत असतात. त्यातून भावना दुखावल्या जातात. यातून सामाजिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता असल्याने अशा लोकांवर, समाजकंटकांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक शैलेश कलंत्री, नूरमोहम्मद शेख, सोमेश्वर दिवटे, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष निखिल पापडेजा, मोहसीन शेख, हैदरअली सय्यद, कमलेश उनवणे, माजी शहर प्रमुख अमर कतारी, शरद कवडे, सुभाष दिघे, अजीज मोमीन, अमोल डुकरे, अजित याकूब मोमीन, वैभव अभंग, दीपक साळुंखे, असिफ तांबोळी, त्रिलोक कतारी, अनुप म्हाळस आदी या वेळी उपस्थित होते.

हे दंगली भडकविण्याचे कारस्थान…

नगर जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी महाविकासआघाडीचे उमेदवार निवडून येण्याच्या चर्चा असल्याने दोन धर्मात तेढ निर्माण करणारे मनोविकृत माणसे संगमनेरमध्ये दंगली घडविण्याचे कट कारस्थान करत आहेत. समाजमाध्यमावर यापूर्वीदेखील दीपक भगत व मणियार यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांच्याविषयी असे फोटो व आक्षेपार्ह मजकूर लिहून फेसबुक आणि व्हॉट्सअपवर प्रसारित केला होते. तसेच “सौ शहरी एक संगमनेरी” या व्हॉट्सअप ग्रुपवर त्याने प्रसारित केलेला फोटो हा आक्षेपार्ह असून आमच्या भावना दुखावल्या आहेत. त्याचप्रमाणे ताजिया, मिरवणूक वगैरे शब्द वापरुन हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करायचा याचा उद्देश असल्याचा संशय आम्हाला येत आहे. तरी अश्या मनोविकृत लोकांचा आपण तातडीने बंदोबस्त करावा. जेणेकरुन शहरातील वातावरण दूषित होणार नाही. अन्यथा संगमनेरमध्ये जातीय दंगल, समाजात तेढ निर्माण होऊन तणाव घडू शकतो अशा चुकीच्या गोष्टीला पायबंद बसावा यासाठी या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा.

अमर कतारी, माजी शहरप्रमुख ( शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!