अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ !
एप्रिलची १९ तारीख उजाडली तरीही मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळाले नाही..
प्रतिनिधी —
महाराष्ट्रातील दोन लाख दहा हजारांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधना अभावी उपासमार होते आहे. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या महाराष्ट्र, अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांनी निवडणूक प्रचारात रममाण असलेल्या मुख्यमंत्री आणि महिला बाल कल्याण मंत्र्याकडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे मानधन त्वरीत जमा करण्याची मागणी केली आहे.

सरकारं अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर विविध कामे लादते. निवडणूक प्रशिक्षण, आरोग्याची कामे सोपवली जातात. परंतु अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे मानधन वेळेवर देण्याची जबाबदारी मात्र टाळत आहे. सणासुदीच्या दिवसात मानधन नसल्यामुळे सण साजरे करणे या कर्मचाऱयांना मुश्कील झाले आहे. कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव घोषणा द्यायची मात्र महिला व बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याना वेळेवर मानधन द्यायचे नाही, या विसंगती कडे ॲड. निशा शिवूरकर यांनी लक्ष वेधले आहे. प्रचंड उन्हाळा, पाणी टंचाई आणि उपासमारीच्या चक्रात अडकलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाच्या उदासीनतेचा अंगणवाडी कर्मचारी सभेने निषेध केला आहे. तसेच त्वरीत मानधन जमा करावे अशी मागणी सरचिटणीस कमल परुळेकर, कार्याध्यक्ष कृष्णा भानारकर, उपाध्यक्ष नितीन पवार यांनी केली आहे.
