आटपाटनगरीतले प्रेम, शरीरसुख आणि ‘हनी ट्रॅप’ !

टोळीमध्ये कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचाही सहभाग !

नगरीच्या कोतवालीतील यंत्रणा ॲक्शन मोडवर

( आटपाट नगरीतली कथा भाग एक)

खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून किंवा शारीरिक आकर्षण दाखवून व्यवसायिक, व्यापारी, श्रीमंत मंडळी, तरुण मुले, अधिकारी, डॉक्टर्स, राजकीय पुढाऱ्यांची मुले, तथाकथित प्रतिष्ठित नेते, युवानेते इत्यादींना नादाला लावून पुढे हनी ट्रॅपचे हत्यार वापरुन लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या एका ‘खंडणीखोर टोळी’ची चलती सध्या आटपाट नगरीत आहे. या टोळीवर कुठलीच कारवाई होत नसल्याने, टोळीचे उद्योग दिवसेंदिवस वाढतच असल्याने आटपाट नगरीच्या महाराजांचा आणि विरोधी मंडळीसह, रयतेचा तथाकथित ‘सामाजिक आणि सुसंस्कृत दरारा’ कमी होऊ लागला आहे. आटपाट नगरीला कोणत्याही गुन्हेगारी पासून आणि वाईट कृत्यांपासून वाचवण्याची जबाबदारी नगरीतील सर्व रयतेची आहे. ती मात्र व्यवस्थित पार पाडली जात नाही. असे सध्याचे तरी चित्र आहे.

नगरीमध्ये घडलेल्या एका गुन्ह्यातील नाजूक घटनेमुळे हनी ट्रॅपची आणि ब्लॅकमेलिंगची प्रकरणे चव्हाट्यावर येऊ लागली आहेत. या टोळीमध्ये दोन-तीन महिलांबरोबरच एका कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा (कोतवालाचा) सहभाग असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे आटपाट नगरीच्या कोतवालीतील अधिकारी, कोतवाल, कर्मचाऱ्यांसह परगण्यातील ‘गुप्त पोलीस गट ॲक्शन मोडवर’ आला आहे. या टोळीकडून पीडित असलेल्या रयतेतील बऱ्याच जणांनी नगरीच्या कोतवालीत संपर्क केला आहे.

या गुन्हेगारीत महिलांचा वापर होत असल्याने बदनामीच्या आणि असलेल्या – नसलेल्या इज्जतीच्या भीतीने रयते मधील काही प्रतिष्ठित आणि या सापळ्यात अडकलेले पीडित गप्प बसले आहेत. या टोळीतील काही सभासद आर्थिक देवाणघेवाण, उधार उसनवारी आणि सावकारीचा धंदा देखील करतात. समोरच्या व्यक्तीकडून देण्या घेण्यात आणि उधार उसनवारी, आर्थिक बाबींचा वाद झाल्यास सोशल मीडिया मधून संबंधित व्यक्तीची यथेच्छ बदनामी, अगदी अश्लील भाषेत करण्यात येते. बिचाऱ्यांना काहीही करून समोरच्या मंडळींची पूर्तता करावी लागते. मात्र सोशल मीडियातून समाज सुधारणेच्या गप्पा मारणारे तथाकथित ‘सुधारक’ यातून मार्ग काढण्यासाठी कोणत्याही हालचाली, प्रयत्न न करता ‘शेपूट’ घालून बसलेले दिसतात.

आटपाट नगरीत गेल्या काही वर्षांपासून हा उद्योग सुरू असल्याचे माहिती मिळते. यामध्ये ‘त्या’ महिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यासह शारीरिक आकर्षणाचे विविध प्रयोग करीत हनी ट्रॅपचा उद्योग चालवत आहेत. जाळ्यात अडकलेल्या सावजाला घाबरवून त्याच्याकडून माल मलीदा मिळवताना यात अचानक एन्ट्री करून ‘मिटवा मिटवी’ करण्यासाठी नगरीतले तथाकथित काही प्रतिष्ठित दलाल टक्केवारी मिळवण्यासाठी यात सहभागी झालेले आहेत. काही संघटनांचे पदाधिकारी आणि ‘त्या’ कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मिलिभगत असल्याने या मंडळींनी मोठी वसुली केली आहे. सातत्याने घडत असलेले प्रकार आणि मिटवण्यासाठी वाढत जाणाऱ्या रकमा यांनी वैतागलेल्या व हनी ट्रॅप मध्ये सापडलेल्या काही पीडित प्रतिष्ठितांनी कोतवालीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून पोलिस शिपायांनी देखील गुप्त प्रकारे या सर्व प्रकाराची चौकशी सुरू केली आहे. यातून बऱ्याच गंभीर घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नगरीतील राजकीय पुढार्‍यांच्या, व्यापाऱ्यांच्या, व्यवसायिक, डॉक्टरांच्या तरुण मुलांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडले आहेत. पैसे न दिल्यास करियर बरबाद करू, तुमच्या लग्नात येऊन तुमचे लग्न मोडू, लग्नात गोंधळ घालू, अशा धमक्या दिल्या जातात. त्यामुळे घाबरलेली पालक मंडळी तथाकथित मध्यस्थांना पाचारण करतात. हे मध्यस्थ देखील तयारच असतात. विशेष आणि धक्कादायक बाब अशी की, यामध्ये कोतवालीची व कायद्याची भीती दाखवणाऱ्या ‘त्या’ छुप्या कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे नाव पुढे आले आहे. टोळीतील काही मंडळींसोबत नगरी आसपासच्या दोन-तीन हॉटेलमध्ये या अधिकाऱ्याच्या पार्ट्याही चालू असतात. आटपाट नगरीच्या मुख्यनगर मार्गावर आणि उपनगरात असणाऱ्या मोठ्या प्रतिष्ठित व श्रीमंत डॉक्टरांना देखील टोळीचा सहवास आणि प्रसाद मिळाला आहे. ब्लॅकमेल करण्यात आले आहे. एका डॉक्टरचा मुलगा या जाळ्यात सापडला आणि डॉक्टरच्या तिजोरीला मोठा खड्डा पडला. एका माजी नगरप्रमुखाला देखील मुलाला वाचवण्या साठी या ट्रॅप मधून जावे लागले आहे. त्या प्रमुखाने आपली अडकलेली इज्जतीची मान कशीतरी हातपाय जोडून टोळीच्या तावडीतून सोडवून घेतली आहे. तर काहींना समुद्रकिनाऱ्यावरच्या सहली भोवल्या आहेत.

या सर्व बाबी आटपाट नगरीत मोठ्या चविष्ट पद्धतीने चर्चेत आल्याने आणि काही पीडित मंडळींनी नगरीच्या कोतवालीतील पोलिस शिपाई आणि अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याने पोलीस देखील ॲक्शन मोडवर आले. याबाबत तांत्रिक पद्धतीने शोध घेतला जात असून अनेकांच्या यांत्रिक हालचाली आणि संपर्क साधण्याच्या यंत्रांवर पोलिसांचा चांगलाच डोळा आहे. सोशल मीडिया मधून होत असलेले उद्योग आणि सोशल मीडियाची साधने यावर देखील चांगलाच ‘कटाक्ष’ कोतवालीच्या गुप्त टीम कडून टाकण्यात आला आहे. अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गरज भासली तर परगण्याच्या मुख्यालयातील ‘सायबर गटा’चा उपयोग देखील याप्रकरणी केला जाऊ शकतो. तांत्रिक माहिती मधून कोणताही चोर, खंडणीखोर आणि ब्लॅकमेलिंग करणारा गुन्हेगार सुटणार नाही. तो पकडला जाईल.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!