हेरॉइन (गर्द) सारखा घातक अमली पदार्थ संगमनेर शहरात सापडणे हे एलसीबीचे अपयश !
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सेटलमेंट करून कार्यभाग साधण्याचे उद्योग…
प्रतिनिधी —
नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) संगमनेर शहरात सुमारे चार दिवसांपूर्वी छापा टाकून गांजा सह गर्द (हेरॉइन) जप्त केले. संगमनेर शहरात हेरॉईन सारखा अत्यंत घातक अमली पदार्थ सापडणे म्हणजे अवैध अमली पदार्थांच्या धंद्याबाबत नगर (एलसीबी) स्थानिक गुन्हे शाखेचे अपयश आणि जिल्हा पोलीसांचे पितळ उघडे पडले आहे. संगमनेरसह नगर जिल्ह्यात अशा अमली पदार्थांची तस्करी आणि वापर किती मोठ्या प्रमाणात सुरू असेल हे यावरून दिसून येते. अत्यंत महागडा असणारा हा अमली पदार्थ शहरात सर्रासपणे आढळून आल्याने खळबळ तर उडालीच आहे. मात्र पोलीस अधीक्षकांसह इतर तपास यंत्रणांना त्याबाबत काहीही घेणे देणे नसल्याचे दिसून येत आहे.
अमली पदार्थांमुळे संपूर्ण युवा पिढी बरबाद होऊ शकते. हे माहीत असून देखीलही लोकप्रतिनिधी फक्त बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसतात हेही समाजासाठी तेवढेच घातक आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीकडून अद्याप पर्यंत पोलिसांना कोणतीच माहिती मिळालेली नाही. संगमनेर मध्ये असलेले अवैह धंदे आणि त्यातही अमली पदार्थांची विक्री आणि वापर याबाबत स्थानिक पोलिसांपासून ते थेट पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकापर्यंतच्या सर्व ‘यंत्रणा फेल’ झाल्याचे चित्र आहे. संगमनेरसह नगर जिल्ह्यात अशा अमली पदार्थांचा व्यापार कोण करत आहे ? हा माल कुठून येतो ? कोणाला पुरवला जातो ? याचे ग्राहक कोण ? याचा देखील तपास संबंधित यंत्रणांना अद्याप पर्यंत लावता आलेला नाही. नुसते छापे मारून कागदी घोडे नाचवून कारवाया केल्याचे दाखवायचे आणि नंतर सर्व ‘सेटलमेंट’ करायच्या व आपला कार्यभाग साधून घ्यायचा असे आरोप जनते मधून या यंत्रणांवर होत आहेत.

संगमनेर शहरात अमली पदार्थांची तस्करी नव्याने होत नाही. याआधी देखील अशा कारवाया झाल्या आहेत. साधारण एक वर्षांपूर्वी हैदराबाद पोलिसांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा गांजा पकडला होता. त्याचा मुख्य सूत्रधार हा संगमनेर तालुक्यातला होता. त्यामुळे अमली पदार्थांच्या तस्करीची व्याप्ती किती मोठी आहे हे यावरून उघड झाले होते. संगमनेर शहरात देखील अनेक वेळा छापे टाकून गांजा पकडण्यात आला होता. गांजा कारवायात काही पोलिस अधिकाऱ्यांनी देखील हात धुवून घेतले. गांजा प्रकरण नगर जिल्ह्यात चांगलेच गाजलेले आहे आणि पोलीसही त्यामध्ये चांगलेच प्रकाश झोतात आलेले आहेत. त्यामुळे या अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला कोण खत पाणी घालतं हे आता लपून राहिलेलं नाही.

जिल्ह्यात होणाऱ्या अवैध हालचालींबाबत, गुन्ह्यांबाबत, अमली पदार्थांच्या विक्री बाबत या व अशा अनेक कारवाया करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आहे. ज्याला सर्वसाधारणपणे एलसीबी म्हणून ओळखले जाते. या पथकाच्या कारवायांची चर्चा मात्र नेहमीच होत असते. कारवाया झाल्यानंतर मात्र कुठलाही तपास लागल्याचे आणि तो पूर्णपणे धसास जाऊन आरोपींना शिक्षा झाल्याचे मात्र आढळून आलेले नाही. झालेच असेल तर त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा कारवाया झाल्यानंतर देखील हे अवैध धंदे सुरू राहतात यामागे ‘नेमकं पाणी कुठं मुरतं’ हे सामान्य नागरिकांना समजत नाही असे नाही आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देखील समजत नाही असे नाही. मात्र यात काहीतरी ‘काळं बेरं’ असण्याची शक्यता असल्याने कुठलाही अवैध धंदा आज पर्यंत तरी एलसीबीला बंद करता आलेला नाही.

स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी अनेक वर्ष एकाच ठिकाणी तळ ठोकून असल्याने नगर जिल्ह्यातील अवैध धंदे करणाऱ्यांशी त्यांचे संबंध निर्माण झाले असून अवैध धंदे करणाऱ्यांना छाप्याच्या टिप्स आधीच मिळत असल्याची चर्चा आहे. कुठलीही मोठी कारवाई न करता ‘पंटर’ वर कारवाया करून मोठे आरोपी आणि गुन्हेगारी व ‘अवैध धंद्यातले किंग’ एलसीबीला सापडत नसल्याचे आरोप नेहमीच झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेत अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेले आणि बदल्या होऊनही बदल्याच्या ठिकाणी सोडण्यात आले नसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यां बाबत तक्रारही करण्यात आली आहे. याबाबत नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. आता अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
