आटपाट नगरीतले इंग्लिश विंग्लिश !
आटपाट नगरीत सध्या निवडणुकीचा माहोल आहे. नगरीतले वेगवेगळे सुभेदार पुन्हा पुन्हा निवडणुका लढवून आपला ‘खुट्टा’ बळकट करीत आहेत. दर पाच वर्षांनी येणाऱ्या या निवडणुकीच्या वेळी विविध ‘बोलबच्चन’ करणारे नेते, पुढारी प्रचारासाठी पुन्हा बाहेर पडले असून आटपाट नगरीत सभा, मिटिंग, रॅली, रोड शो याचा धुमाकूळ सुरू झाला आहे. सोशल मीडियावर उमेदवारांच्या, सुभेदारांच्या समर्थकांची, विरोधकांची एकमेकांसोबत जोरदार आदळआपट सुरु आहे. असे सगळे घडत असताना आटपाट नगरीच्या पूर्वेकडील सुभेदाराचा एक युवराज सुपुत्र दिल्लीश्वर सम्राटाच्या पक्षाकडून उभा आहे. हा सुपुत्र सध्या निवडणुकीमध्ये ‘इंग्रजी’च्या मागे हात धुऊन लागला आहे. सुभेदार मंत्र्यांचे हे युवराज आटपाट नगरीच्या लोकशाही मंदिराचे गेले पाच वर्ष प्रतिनिधी राहिले आहेत. हे ‘इंग्रजी’च्या प्रेमात पडल्या पासून ‘इंग्रजी’ त्यांना खूप आवडते. ‘देशी’ बद्दल त्यांचे काय विचार आहेत हे त्यांच्या वक्तव्यामधून बाहेर आल्याने आता हे युवराज महाशय चांगलेच ट्रोल होऊ लागले आहेत.

वडिलोपार्जित पुण्याईवर लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश मिळविलेले हे महा – हुशार इंग्रजाळलेले युवराज सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेष म्हणजे युवराजांच्या शिक्षणाविषयी सुद्धा आता या निवडणुकीच्या काळात चर्चा सुरू झाली असून युवराजांच्या भाऊबंदाने युवराजांच्या तथाकथित शिक्षणाविषयी ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्याची देखील चर्चा आता बाहेर येऊ लागली आहे. युवराजांच्या ‘इंग्रजी’ वक्तव्यामुळे त्यांच्या महान दिल्लीश्वर सम्राटाला देखील सोशल मीडियात ‘ट्रोल’ व्हावे लागत आहे. आधीच शिक्षण, भाषा, इंग्रजी, टेली प्रॉम्पटर, दुभाषी असल्या भानगडींनी ते त्रस्त असताना आता ही नवीन भर पडली आहे.

बोलबच्चन युवराजांनी आपल्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याला इंग्रजी बोलण्याचे आवाहन करून आटपाट नगरीत एकच धुमाकूळ उडवून दिला. तुम्हाला जर ही भाषा बोलता येत असेल तर तुम्ही श्रेष्ठ आहात असा या युवराजांचा अहंभाव आहे. युवराजांना ‘इंग्रजी’ किती चांगली येते हे त्यांनाच माहीत. इंग्रजी भाषा ही काय नुसती खायची – प्यायची गोष्ट आहे का ? अवघड आहे ती. महान युवराजांना ती किती ‘खाता – पिता’ येते हे त्यांच त्यांनाच ठाऊक. कोणाच्या अति खाजगी गोष्टीत आपण कशाला पडायचं ? असा आटपाट नगरीतला सूर आहे. आटपाट नगरीत मात्र युवराज यांचे ‘इंग्रजी’ प्रेम आणि ‘देशी’ बद्दल असलेला अनादर याची मोठी चर्चा घडू लागली आहे. नगरीतील रयत आता युवराज फक्त ‘इंग्रजी’चा आसरा घेऊन पुढे भविष्यात आपला कार्यभाग साधू इच्छितात की, ते कधीतरी ‘देशी’ला हात लावतील ? अशी आशा बाळगून आहे.

