महिलांना प्रवेश नाकारणारा कळसुबाई (शिखर) गडावरील ‘तो’ फलक काढून टाकावा !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

गडकिल्ल्यांवर भटकंती करणारे आनंदयात्री राहुल भांगरे यांनी नुकताच कळसुबाई शिखर ट्रेक केला. त्या दरम्यान त्यांना एक फलक निदर्शनास आला. त्यामध्ये काही नियमावली लिहिण्यात आली होती. त्यात विवाहित महिलांनी मंदिरात प्रवेश करू नये व घरामध्ये विटाळ असल्यास गड चढू नये. असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी यास आक्षेप घेतला असून असा फलक हटवला जावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्या संदर्भात फेसबुक वॉल वरून त्यांनी आपले मत नोंदविले आहे ते खालील प्रमाणे….

 

राहुल भांगरे, खडकी, ता. अकोले

 

यंदाचा मार्च एन्ड हा कळसुबाई ट्रेक करून संपन्न केला. खरेतर ट्रेकचे इतर फोटो टाकण्याआधी हा फोटो टाकणे मला जास्त गरजेचे वाटले.

कळसुबाई ही स्त्रीशक्तीचे एक मोठे प्रतीक आहे. म्हणून नवरात्रात कळसुबाईच्या शिखरावर लक्षावधी लोक स्त्रीत्वाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जातात. स्थानिक दंतकथेनुसार कळसुबाई ही एक अत्यंत स्वाभिमानी स्त्री होती जी तिच्या घरचे तिच्या मनाविरुद्ध वागल्यामुळे थेट घर सोडून या शिखरावर जाऊन बसली.

भलेही आपण सर्वोच्च सामाजिक स्थानी आजपर्यंत कोणत्याही स्त्रीला कधीही बसू दिले नसले तरीही महाराष्ट्राच्या सर्वोच्च भौगोलिक स्थानी मात्र कळसुबाई ही एक स्त्री विराजमान असणे हे नक्कीच महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वासाठी महत्वाचे प्रतीक आहे.

हे मी यासाठी सांगतो आहे की, आजपर्यंत कितीतरी वेळा कळसुबाई ट्रेक केलाय पण कधी ही गोष्ट माझ्या लक्षात आली नव्हती, वा पूर्वी कधी मला ही सूचनांची पाटी दिसली नव्हती, जी यावेळी दिसली आणि ती पाहून माझा आणि माझ्या सोबतीच्या इतर मित्रांचाही प्रचंड संताप झाला.

केरळातील सबरीमाला मध्ये जी स्त्रियांच्या प्रवेशास बंदी आहे त्याला माझा पूर्वीपासून विरोध होताच, पण इथे तर माझ्या तालुक्यातच आणि तेही एका स्त्रीच्या मंदीरातच विवाहित आणि पाळी आलेल्या स्त्रियांना प्रवेश बंदी आहे हे पाहून संताप होणे स्वाभाविक होते.

मी देव बिव मानत नाही. त्यामुळे खरेतर मंदीर प्रवेश वगैरे गोष्टी माझ्यासाठी अजिबात महत्वाच्या नाहीत. किंबहुना मागच्या दहा वर्षांत मी कधीही कोणताही ट्रेक केल्यावर त्या डोंगरावरील कोणत्याही देवाच्या पाया पडलो नाही. वा आवर्जून रांग लावून दर्शन घेतले नाही. परंतु रांग वगैरे लावायची नसेल तर मंदिराची वास्तुकला, शिल्पकला वगैरे बघण्यासाठी मंदिरात मात्र मी अनेकदा जात असतो. इतकेच नाही तर भक्तीची वगैरे भावना म्हणून नाही तर फक्त प्रोटोकॉल आहे म्हणून कोणत्याही मंदिरात गेलो तर मी नेहमी चप्पल बूट काढूनच गेलो आहे.

खरेतर मंदिर प्रवेश वगैरे माझ्यासाठी पूर्णतः गौण आहे. परंतु जेव्हा कोणत्याही कारणास्तव, विशेषतः काहीतरी भेदभावपूर्ण वा पाखंडपूर्ण कारणामुळे कुणाला मंदिर प्रवेश नाकारला जात असेल तेव्हा मात्र मी त्यांच्या मंदिर प्रवेशाच्या अधिकाराचे समर्थनच करतो. म्हणजे तुम्ही मला हिपोक्रेट समजले तरी चालेल, पण कुणाला मंदिर प्रवेशापासून रोखले जात असेल तर मी त्याला प्रवेशाचा अधिकार मिळावा म्हणून लढा देईल, आणि एकदा त्यांना तो अधिकार मिळाला की नंतर त्यांना जगात देवच नाहीय त्यामुळे मंदिर प्रवेश वगैरे कसे निरुपयोगी आहे याचे प्रबोधन सुद्धा करेल.

तर मुद्दा हा आहे की, आपल्या महाराष्ट्रात तेही माझ्या तालुक्यात आणि तेही एका स्त्रीच्याच मंदिरात पाळी आलेल्या व विवाहित असलेल्या स्त्रियांना प्रवेश बंदी कशी काय असू शकते?

बारी ग्रामस्थांचे मला खूप कौतुक आहे की कोण्या एका तथाकाथित धर्मगुरू स्त्रीने म्हणे तिला स्वप्नात दृष्टांत झाला म्हणून तिच्या पंथाच्या कोणा देवाचे मंदिर कळसुबाई शिखरावर बांधण्याचा घाट घातला होता. तिचे राजकीय वजन भरपूर असल्यामुळे सदर मंदिर बांधणीचे काही साहित्यही शिखरावर पोचले होते, परंतु बारी गावच्या गरीब आणि तुलनेने दुर्बल आदिवासी बंधू भगिनींनी या प्रभावशाली राजकीय आणि मोठ्या आर्थिक ताकदीपुढे न झुकता नेटाने लढा देऊन तिथे होणारे हे सांस्कृतिक अतिक्रमण थांबवले. हा नक्कीच एक आदर्श आणि प्रेरणादायी लढा होता जो बारी ग्रामस्थांनी जिंकून दाखवला. तो अवघड आणि निकराचा लढा तर त्यांनी जिंकला पण मग ही अशी एका स्त्रीच्याच मंदिरात स्त्रीत्वाला प्रवेश नाकारण्याची अनैतिक रूढी त्यांनी का लादून घेतली आहे ?

आपला आदिवासी समाज हा स्त्रियांना समानतेचा दर्जा देणारा समाज आहे असे अभिमानाने म्हंटले जात असताना, एका आदिवासी स्त्रीच्या मंदिरात मात्र स्त्रियांनाच अशी बंदी घालणे पूर्णपणे चुकीचे नाही काय ? ही स्त्रीपुरुष समानतेस गर्वाची बाब समजणाऱ्या आदिवासी संस्कृतीशी प्रतारणा नाही काय ?

खरेतर इतर कोणत्याही बाबीपेक्षा प्रजोत्पादन ही कोणत्याही सजीव प्रजातीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे स्त्रियांस पाळी येणे ही खरेतर मानवी समाजातील सर्वात पवित्र गोष्ट मानली जायला हवी, पण आपण त्याउलट या पवित्र गोष्टीला विटाळ मानतो हे आपल्या सामाजिक विकृतपणाचे लक्षण आहे.

आपल्या अहमदनगर जिल्ह्याने काही वर्षांपूर्वीच शनी शिंगणापूर येथे स्त्रियांना प्रवेश मिळवून देऊन स्त्रीपुरुष समानतेचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. नगर जिल्ह्यात आपला अकोले तालुका हा प्रागतिक आणि सुधारणावादी विचारांचा उज्ज्वल वारसा असणारा तालुका आहे. हा हरेक जुलमी सत्तेविरुद्ध लढणाऱ्या असंख्य क्रांतिवीरांचा तालुका आहे, हा प्रत्येक अन्यायाविरुद्ध विद्रोह करणाऱ्या बंडकऱ्यांचा तालुका आहे. म्हणून मी सर्व बारी ग्रामस्थ तसेच अकोले तालुक्यातील समस्त सुजाण नागरिकांना विनंती व आवाहन करतो की त्यांनी एका स्त्रीच्याच मंदिरात स्त्रियांवर अन्याय करणारी ही अनैतिक प्रवेशबंदी तात्काळ उठवून संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशापुढे एक आदर्श उदाहरण घालून द्यावे.

RRAJA VARAT

One thought on “महिलांना प्रवेश नाकारणारा कळसुबाई (शिखर) गडावरील ‘तो’ फलक काढून टाकावा !”
  1. काही संकुचित वृत्तीचे लोक स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी असे काहीतरी फलक तयार करून लावत असतात त्यांना कोणी अधिकार दिला नियम ठरवण्याचा हा देश स्वतंत्र आहे सगळ्यांना समान अधिकार आहे फलक लावणाऱ्या जाहीर निषेध.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!