नगर एलसीबीच्या बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीनंतर कार्यमुक्ती !!
पोलीस अधीक्षक कार्यालयात हालचाली सुरु
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिले होते आदेश
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली होती तक्रार
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यात विविध कारवाया करताना नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात आणि उलट सुलट चर्चांमध्ये असणाऱ्या पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेमध्ये (एलसीबी) करण्यात आलेल्या बदल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना अद्याप पर्यंत कार्यमुक्ती करण्यात आली नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात होता. या मागचे नेमके गौड बंगाल’ काय असा सवाल उपस्थित झाला होता. बदली झालेल्या पोलिसांचा ‘रक्षणकर्ता’ कोण ? या सर्व प्रश्नांना आता उत्तर मिळणार असून सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कार्यालयीन हालचाली सुरू केल्या असून लोकसभा निवडणुकीनंतर ‘त्या’ बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयातून समजली आहे.

शेख यांनी केलेली तक्रार ही गंभीर स्वरूपाची असून याची संपूर्ण चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच कारवाईचा अहवाल सात दिवसात सादर करावा. असे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते.

या बाबत नगर पोलीस अधीक्षक कार्यालयातून माहिती घेतली असता सदर बदलीच्या तक्रारीच्या अनुषंगाने व विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशाच्या संदर्भाने कार्यवाही सुरू करण्यात आली असून लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली.

काय आहे प्रकरण…
सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना केलेल्या सविस्तर तक्रारीत म्हटले होते की, अहमदनगर पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. एक वर्ष होऊनही अद्याप त्यांना कार्यमुक्त केले नाही. स्थानिक गुन्हे शाखेतील एकूण ३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. याबाबत पोलीस महासंचालक यांच्याकडे शेख यांनी दि.०६/०४/२०२३ रोजी सविस्तर तक्रार केली होती.

ज्या कर्मचाऱ्यांना ६ वर्षे पूर्ण झालेले आहेत.व आस्थापना सूचीवर मंजूर पदांपेक्षा अधिक कर्मचारी नेमणूकीस ठेवण्यात आलेले आहेत. ३१ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. परंतू एकाही कर्मचाऱ्याची नेमणूक स्थानिक गुन्हे शाखेत करण्यात आलेली नाही.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी ३१ कर्मचाऱ्यांपैकी १७ कर्मचाऱ्यांना एक वर्ष एवढा मोठा कालावधी होऊनही कार्यामुक्त केलेले नाही. ( बदलीच्या ठिकाणी सोडलेले नाही) व त्या कर्मचाऱ्यांना जिल्हापोलीस आस्थापना मंडळाने मुदतवाढही दिलेली नाही. असे असताना वरीष्ठांच्या आदेशाचा अवमान करुन सदर कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत ठेवलेले आहे.

त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना सायबर पोलीस ठाणे अहमदनगर येथे कार्यरत असल्याचे दाखवून स्थानिक गुन्हे शाखेतच कार्यरत ठेवले आहे. सायबर पोलीस ठाणे हे संपूर्णपणे स्वतंत्र असून ते स्थानिक गुन्हे शाखे अंतर्गत येत नसतानाही असे करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडेच सायबर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त कामकाज सुध्दा देण्यात आलेले आहे. सदरची बाब संयुक्तीक नाही. सायबर पोलीस ठाणे येथे स्वतंत्र पोलीस निरिक्षक पद मंजूर असताना त्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक दर्जाचे अनेक पोलीस निरीक्षक पोलीस नियंत्रण कक्ष येथे उपलब्ध असताना किंवा इतर अतिरिक्त पोलीस निरीक्षक उपलब्ध असूनही अधिकाऱ्याची नेमणूक न करता आहेर यांच्या कडे गेल्या १ वर्षापासून अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या आस्थापना सूचीवर दोन पोलीस निरीक्षक पदे मंजूर असताना एकच पोलीस निरीक्षक पद भरण्यात आलेले आहे.

अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळा मध्ये मोठा असून जिल्हयामध्ये एकूण १४ तालुके आहेत. ७ महसूल विभाग आहेत. या बाबींचा विचार करता दोन पोलीस निरीक्षकांची नेमणूक करणे आवश्यक असताना नेमणूक करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची सायबर पोलीस ठाणे किंवा स्थानिक गुन्हे शाखेत येथे नेमणूक नसताना त्या कर्मचाऱ्यांना सायबर पोलीस ठाणे येथे तपासकामी तात्पुरत्या स्वरुपात संलग्न नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यासाठी वरिष्ठ पोलीस आस्थापना मंडळाची पूर्वपरवानगी देखील घेण्यात आलेली नाही. सदरची बाब नियमाच्या विरोधात आहे.
अशी सविस्तर तक्रार शाकीर शेख यांनी पोलीस महासंचालक व विशेष पोलीस महानिरीक्षक, परिक्षेत्र नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती.
