अवैध धंद्यात नंबर वन !

मटका, अमली पदार्थ आणि गोवंश कत्तलींची बाजार पेठ संगमनेर !

एलसीबीला मटका किंग आणि अमली पदार्थांचे मुख्य तस्कर कधीच सापडत नाहीत…सापडतात ते फक्त पंटर….

भाग १ (क्रमशः)

प्रतिनिधी —

संपूर्ण नगर जिल्ह्यात सातत्याने मटका, गांजा, गर्द, हेरॉईन आणि गोवंश कत्तलींचा धुमाकूळ सुरू असलेले संगमनेर आता या सर्व ‘अवैध धंद्यांची बाजारपेठ’ बनले असून जिल्ह्यात ‘अवैध धंद्यात नंबर वन’ असलेल्या या धंद्यांना आळा घालण्या साठी संगमनेरातील आणि नगर जिल्ह्यातील पोलिसांच्या सर्व शाखा अपयशी ठरल्या असून वेळोवेळी त्यांच्या लुटूपुटूच्या  दिखावू कारवायांचे पितळ उघडे पडले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), शहर पोलिस,  ग्रामीण पोलिस, पोलीस उपअधीक्षकांचे पथक, अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे पथक आणि बऱ्याच वेळा विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक या सर्वांनी संगमनेरात वेळोवेळी छापे टाकून देखील संगमनेरातील अवैध धंदे सर्रासपणे १२ महिने २४ तास सुरू असतात. त्यामुळे अवैध धंद्याची बाजारपेठ असलेल्या या नंबर वन संगमनेरातील अवैध धंदे कधी बंद होतील हे फक्त पोलिसांनाच ठाऊक असावे.

गोवंश हत्या अवैध कत्तलखाने…

संपूर्ण ‘महाराष्ट्रात फेमस’ असलेल्या संगमनेरच्या गोवंश कत्तलखान्यात महिनाभर अधून मधून  छोटे छापे टाकायचे. महिन्यातून एकदा मोठा छापा टाकायचा. फक्त पंटर पकडायचे आणि सातत्याने हा कार्यक्रम सुरू ठेवायचा. छापे टाकत आहोत असे दाखवायचे मात्र त्यातून कुठलीही ठोस कृती करायची नाही. असा प्रकार पोलिसांकडून केला जात आहे. अनेक वेळा छापे टाकून गुन्हेगार न्यायालयातून सुटतात. त्यांच्यावर नंतर कुठलीही कारवाई केली जात नाही. गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे करू नयेत म्हणून कारवाई करण्यासाठी विविध उपाय योजना आणि पर्याय असून देखील त्याचा वापर केला जात नाही. त्यामुळे कत्तलखाने आणि गोवंश हत्या जिल्ह्यातील पोलिसांच्या सर्वच पथकांच्या वसुलीचे केंद्र बनले आहे. यात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आघाडीवर असल्याचे नेहमीच बोलले जाते. एवढेच नव्हे तर गोवंश मांस भरलेल्या गाड्या सही सलामत संगमनेर तालुक्याच्या हद्दीतून बाहेर काढून देण्याचा सुपाऱ्या देखील घेतल्या जातात.

गांजा, गर्द, हेरॉईन तस्करी…

गांजा सारख्या अमली पदार्थाच्या तस्करीचे देखील प्रमुख केंद्र संगमनेर असल्याचे नेहमीच उघड झाले आहे. साधारण दोन ते तीन वर्षांपूर्वी हैदराबाद पोलिसांनी दोन कोटी रुपयांचा गांजा पकडला होता. हा गांजा ओडीसा राज्यातून महाराष्ट्रात येत होता. या छाप्यामध्ये पोलिसांना मोठे घबाड मिळाले होते. या गांजाचा, अमली पदार्थाचे मुख्य तस्कर हे नगर जिल्ह्यातले होते. आणि त्यातला एक आरोपी हा संगमनेरचा होता. त्यावेळी तो पसार झाला होता. अद्यापही तो सापडला आहे की नाही हे माहीत नाही. मात्र हा संगमनेरचा मुख्य संशयित गांजा तस्कर संगमनेर पोलिसांना आणि जिल्हा पोलिसांच्या पथकांना चांगलाच ठाऊक असावा. संगमनेर शहरा अवतीभोवती नेहमीच गांजांचे छापे झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी समनापुर जवळ एका वाहनातून पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने लाखो रुपयांचा गांजा पकडला होता. त्यातही त्यांना मुख्य आरोपी सापडला नाही. गांजाच्या गुन्ह्यामध्ये अपरातफरी केली म्हणून पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाया देखील झाल्या आहेत. कसारा दुमाला, कासारवाडी हे गाव नेहमी चर्चेत असते. आता तर संगमनेर शहरातच काही दिवसांपूर्वी गर्द, हेरॉईन सारखा अतिशय घातक अमली पदार्थ सापडला. मालदाड रोड, संजय गांधी नगर या ठिकाणी गांजा सापडला. गांजा छाप्यातील एक आरोपी पोलिसांच्या समोर पळून गेला. तो अद्याप सापडलेला नाही. या गुन्ह्यांच्या तपासातून पोलिसांना काहीही सापडलेले नाही. या घटना अगदी आठवडा, पंधरवाड्यातल्या आहेत. या सर्व बाबी पाहता पोलिसांवरचा संशय वाढत जातो.

मटका, जुगार अड्डे….

मटका आणि जुगार अड्डे संगमनेरच्या पाचवीला पुजलेले आहेत. नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे मटका किंग संगमनेर शहरात आणि तालुक्यात आहेत. अगदी लाखो रुपयांची उलाढाल मटका आणि जुगार अड्ड्यामधून चालू असते. शहरातल्या तीन बत्ती चौक, नेहरू चौक, तेली खुंट, मोगलपुरा, सय्यदबाबा चौक, माळीवाडा, मंगळापुर, अकोले नाका, नवघर गल्ली, चिखली अशा मुख्य भागात मटका किंग वावरत असून देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. येथेही पंटरच पकडले जातात. उपनगरांसह, जुन्या शहरामध्ये माधव टॉकीज, म्हाळुंगी नदी परिसर, प्रवरा नदीच्या संगमावरील एक बेट, जुगाराचे अड्डे चालवले जातात. विविध भागात मटक्यांच्या टपऱ्या पसरल्या आहेत. शहरासह ग्रामीण भागात मटका जोरात आहे. पुणे नाशिक महामार्गावर पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असणाऱ्या बोटा, साकूर या गावात मोठ्या प्रमाणावर गुटखा, मटका, गांजा आणि जुगार अड्ड्यांची रेलचेल आहे. हे सर्व घारगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. तसेच तालुक्यातील आश्वी, तळेगाव, वडगाव पान, समनापुर, धांदरफळ अशा मोठ्या गावांमधून देखील अवैध व्यवसाय, अवैध दारूची ढाबे, हॉटेल मधील दारू विक्री सर्रास सुरू आहे पोलीस मात्र निवांत आहेत. भाग १ (क्रमशः)

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!