अवैध धंद्यात संगमनेर नंबर वन !
गुटखा, गौण खनिज, वाळू तस्करी नेहमीचाच बिनधोक धंदा !
कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिका आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष, हा देखील चर्चेचा विषय
तुरुंगातून खंडणी अद्यापही गुलदस्त्यात !!
(भाग २)
प्रतिनिधी —
गुटखा, गौण खनिज आणि वाळू तस्करी..
चार-पाच दिवसांपूर्वी संगमनेर शहराच्या उपनगरात एका मोठ्या गुटखा तस्कराच्या गोडाऊन वर छापा टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. अश्या चार ते पाच गोडाऊन मधून गुटखा तस्करांचे काम संगमनेर शहरासह तालुक्यात सुरू आहे. त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. संगमनेरचे गुटखा प्रकरण वेळोवेळी गाजलेले आहे. शिवाय गौण खनिज आणि वाळू तस्करी तर थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रत्येक अधिवेशनाला गाजत आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी तत्कालीन तहसीलदारांनी संगमनेर तालुक्यातील दगडखाण आणि गौण खनिज उत्पादकांना नोटीस बजावून तब्बल साडेसातशे कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. गौण खनिजाची तस्करी, बेकायदेशीर उत्खनन प्रमाणापेक्षा जास्त ब्रास उत्खनन, परवानगी पेक्षा जादा उत्खनन अशा विविध कारणाखाली बऱ्याच मंडळींना कोट्यवधी रुपयाचा दंड ठोठवण्याची ही पहिलीच वेळ होती. यामागे राजकीय कारण देखील होते. मात्र संगमनेर तालुक्यात किती मोठ्या प्रमाणात गौण खनिज तस्करी सुरू असते हे त्यामुळे उघड झाले. अद्यापही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. बंदी असलेल्या गुटख्याची विक्री संगमनेर तालुक्यातील सर्वच छोट्या-मोठ्या किराणा दुकानातून, पान टपऱ्यांमधून उघडपणे केली जात असली तरी कारवाईचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे.

तुरुंगातील खंडणी आणि दादागिरी…
यावरही कळस म्हणजे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असणाऱ्या तुरुंगामधील एका आरोपीने दुसऱ्या आरोपीच्या नातेवाईकांना फोन करून डायरेक्ट खंडणी मागण्याचा प्रकार तुरुंगामधून घडला होता. तेथे मोबाईल कसा पोहोचला ? तो कोणी पोहोचवला ? खंडणी मागणारे ते आरोपी कोण ? तो मोबाईल नंतर कुठे गेला ? याचा तपास लावण्यात संगमनेर शहराचे पोलीस, वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील ‘सपशेल अपयशी’ झाले असून बरेच महिने झाले तरी पोलिसांना कुठलाही ठाव ठिकाणा लागलेला नाही. यामागे नेमके कोणाचा हात आहे हे पोलिसांना शोधता आले नाही. आपल्याच खात्याअंतर्गत कुठेतरी गळती लागलेली नाही ना ? याचा देखील शोध पोलिसांनी घ्यायला हवा. शहरामध्ये हनीट्रॅपच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक करुन खंडणी गोळा करण्याचे प्रकार झाल्याची चर्चा आहे. यामध्ये एक कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा सहभाग होता. याची देखील उघड चर्चा सुरू आहे. बदल्या होऊनही कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी सोडले जात नाही. संगमनेर मध्येच ठेवले जाते. यामागचे नेमके कारण काय ? वरिष्ठांची या अधिकाऱ्यांवर एवढी मर्जी कशी ? याचे उत्तर पोलीस देत नाहीत. तुरुंगातून आरोपी पळून जाणे, नव्याने आलेल्या आरोपींना होणारी मारहाण, आरोपींनी केक कापण्यासह वाढदिवस साजरे करण्याचे प्रकरण आणि त्यात निलंबित झालेले पोलीस कर्मचारी या सर्व घटना पोलिसांचा हलगर्जीपणा आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष उघड करतात.

अनेक वेळा शांतता बिघडली…
गेल्या वर्षभरात संगमनेर शहरातली आणि तालुक्यातली शांतता, कायदा सुव्यवस्था अनेक वेळा बिघडली होती. अगदी दंगलीच्या उंबरठ्यावर संगमनेर पोहोचले होते. थेट पोलीस अधीक्षकांना संगमनेर मध्ये येऊन, तळ ठोकून शांतता प्रस्थापित करावी लागली होती. या घटनांमधून पोलिसांनी धडा घेतला असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. हिंदू मुस्लिम हाणामाऱ्या आणि त्यातून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रक्षोभक आणि जातीवादी भाषणे करून संगमनेर मध्ये धार्मिक भडका’ उडवण्याचे कारस्थान करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल झाले. मात्र त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई अद्याप करण्यात आलली नाही. त्यांना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर देखील केलेले नाही. असे गुन्हे दाखल झालेले आरोपी बिनधास्तपणे संगमनेरात फिरत असतात. पोलीस आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी नेमके काय करतात असा प्रश्न येथे उपस्थित होतो. विशेष म्हणजे असे वेळोवेळी गुन्हे करणारे आणि त्यांच्यावर चार चार वेळा गुन्हे दाखल होऊन देखील त्यांना ‘तडीपार’ केले जात नाही ही आश्चर्याची बाब आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार (पोक्सो) आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध (ॲट्रॉसिटी) कायद्यानुसार दाखल झालेल्या उन्हामध्ये देखील पोलिसांकडून आरोपींना मदत झाल्याचे बोलले जात आहे. एका प्रकरणात तर न्यायालयाने देखील पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे केले असल्याचे समोर आले. यामध्ये देखील पोलिसांवर जास्त संशय व्यक्त केला जातो.

गुन्ह्यांचा तपास लागत नाही, आरोपी सापडत नाहीत…
संगमनेर तालुक्याच्या हद्दीत चंदनापुरी शिवारात विनापरवाना बोगस डिझेल विक्रीचा प्रकार उघडकीस आला होता. लाखो रुपयाचे डिझेल आणि डिझेल विक्रीचे साहित्य या ठिकाणी पकडण्यात आले होते. या घटनेत दोन आरोपी होते. एक संगमनेर मधला आणि एक संगमनेर बाहेरचा. प्रकरणाचा माध्यमातून गाजावाजा करण्यात आणि प्रसिद्धी मिळवण्यात पोलिसांनी आपली हौस भागवून घेतली. मात्र या गुन्ह्यात पुढे काय कारवाई झाली हे सांगण्यात पोलिसांकडून टाळाटाळ होत आहे. आरोपी सापडले की नाही ? आरोपींना अटक झाली की नाही ? याबाबत कुठलाही खुलासा पोलिसांकडून करण्यात येत नाही. माहिती दिली जात नाही. ही लपाछपी कशासाठी ? असे अनेक प्रकार घडतात. संगमनेरचे तालुका पोलीस ठाणे यात आघाडीवर असते. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींचा अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. बस स्थानकावरील पाकीट मारी, महिलांच्या सोनसाखळ्या, पर्समधील दागिने चोरी करणारे चोरटे कधीही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी, केबल यांची तर नेहमीच चोरी सुरू असते तेही आरोपी सापडत नाहीत.
शिवाय अधून मधून वेश्याव्यवसाय, चोऱ्या घरफोड्या, हाणामाऱ्या, बेकायदेशीर सावकारी असे प्रकार पोलिसांना तोंडी लावण्यासाठी असतातच. त्यामुळे संगमनेरात आणखी कोणकोणते अवैध धंदे सुरू होणार आहेत. आणि पोलीसही कशाकशाला खत पाणी घालतात हे येणाऱ्या काळात दिसून येईल.

