सुभेदाराची लंका आणि लंके ची आग !

 

बोला..रामकृष्ण हरी………..

आटपाट नगरीत सध्या निवडणुकीची हवा आहे. पूर्वेकडेच्या सुभेदाराचे सुपुत्र युवराज या निवडणुकीत उभे आहेत. बोल बच्चन सम्राटाच्या दोरखंडाला बांधलेले हे सुभेदारीतले ‘फिरते करंडक’ पिता पुत्र निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. ‘सुभेदाराची लंका आणि लंके ची आग’ हा चर्चेचा विषय आहे. निवडणुकीच्या निकालानंतर या आगीत कोणा कोणाचे बळी गेले हे रयतेला पाहण्यास मिळणार आहे.

आटपाट नगरीचे सुभेदारमंत्री तसे सर्व परिचित आहेत. सुभेदारांचे सुपुत्र युवराज यांच्या अति गोड बोलण्यामुळे चांगलेच गाजलेले आहेत. आपल्या विरोधकांचे नामोहरण करण्यासाठी पोलीस शिपायांचा झालेला वापर, प्रशासनाचा झालेला वापर आणि त्या माध्यमातून रयतेचा आणि विविध सुभेदाऱ्यातील कार्यकर्त्यांना दिला जात असलेला त्रास, कायद्याचा धाक गेल्या वर्षात नगरीच्या महसुली क्षेत्रात रयतेने अनुभवला आहे. नगरीच्या परगण्यात असलेल्या विविध सुभेदाऱ्यांमध्ये केलेले वेगवेगळे उद्योग यावेळी युवराजाच्या निवडणुकीला खूपच अडचणीचे ठरणार असल्याचे चित्र संपूर्ण लोकशाहीच्या मतदार संघात दिसून येत आहे.

सुभेदाराच्या पक्षाच्या बहुरुपी बोलबच्चन महासम्राटाच्या ‘धन की बात’ ने शेतकऱ्यांच्या आयुष्याची धूळधाण केली आहे. व्यापारी वृत्तीचा सम्राट, तडिपार मित्र आणि त्यांचे दोन ठेकेदार संपूर्ण रयतेच्या मुळावर उठले आहेत. शेतकऱ्यांवर गोळ्या चालवणे, त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकणे, त्यांच्यावर धुराचे नळकांडे फोडणे असे विविध प्रयोग केल्यामुळे संपुर्ण ‘आटपाट देशात’ सम्राटाविरुद्ध संतापाची लाट आहे. त्याचा परिणाम सुभेदार सहकाऱ्यांना भोगावे लागणार आहेत. नगरीतला संपूर्ण मतदार जागा झाला असल्याने सुभेदार पिता-पुत्रांना त्यांची जागा दाखवली जाणार आहे.

आटपाट नगरीच्या दक्षिण दिशेला असलेल्या लोकशाही मतदार संघात कानोसा घेतला असता तेथील मतदार रयतेच्या ‘प्रतिक्रिया अत्यंत तिखट’ असून युवराज आणि सुभेदारावर चांगलीच आगपाखड केली जात आहे. आटपाट देशाच्या मागील निवडणुकीत निवडून आलेले युवराज दक्षिण लोकशाहीच्या मतदारसंघात फिरकलेच नसल्याच्या स्पष्ट तक्रारी रयतेकडून ऐकण्यास मिळतात. खोटी आणि मोठी आश्वासने देऊन रयतेबरोबरच बेरोजगार युवकांची मोठी फसवणूक केली असल्याचे पाच वर्षानंतर उघड झाले आहे. युवराज यांची ‘मग्रुरी’ त्यांची ‘उर्मटभाषा’ याला रयत वैतागली आहे. त्याचा वचपा काढण्याची वाट आम्ही बघत आहोत अशी प्रतिक्रिया ऐकण्यास मिळाली.

स्वतःच्या पक्षातीलच सुभेदारांना वेळोवेळी स्थानिक निवडणुकांमध्ये अडचणीत आणून पराभूत करण्याचे उद्योग युवराज आणि सुभेदारांनी केल्यामुळे सदर मंडळी देखील युवराजांना कुठलीही मदत करताना दिसत नाही. रामूभैय्याची मदत होईल अशी भाबडी आशा असली तरी रामू भैयांच्या आत ‘बदले की आग’ धुमसत आहे. त्यांना दिलेला त्रास त्यांचे समर्थक सहकारी आणि कार्यकर्ते अद्यापही विसरलेले नाहीत. आपली मदत होत आहे असा ‘भास’ युवराज यांना होत असून हा ‘भास आहे की आभास’ आहे, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होईल. तोपर्यंत भोवती असलेला आणि गुळाला मुंगळे चिकटावे तसा जमा झालेला गोतावळा हा सुभेदार आणि युवराज यांच्या तिजोरीवर चांगला डल्ला मारत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे.

आटपाट देशातल्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही. त्यांच्या अनेक अडचणी समोर आल्या आहेत. दक्षिण लोकशाही मतदार संघातील काही भागात गेल्या दोन वर्षांपासून भाव न मिळाल्याने सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून आहे. दूध, कांदा, कापूस दराचे तर वाटोळे झाले आहे. गल्लीबोळात टमाटमा बोलत फिरणाऱ्या युवराजाने मराठीतच काय इंग्रजीत सुद्धा लोकशाहीच्या मंदिरात या समस्यांबाबत कधीच तोंड उघडले नसल्याचे आरोप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. खतांचे वाढलेले दर, पेट्रोल डिझेलची दरवाढ, शेतीच्या कामांसाठी लागणाऱ्या अवजारांची दरवाढ, वाढती महागाई आणि बेरोजगारी याच्या चढत्या आलेखाला रयत अक्षरश: वैतागलेली असून प्रत्येक ठिकाणी संताप व्यक्त होत आहे. दक्षिण लोकशाही मतदार संघात बऱ्याच ठिकाणी पाण्याचा मोठा प्रश्न आहे. शेतीचे पाणी तर सोडा पण पिण्याच्या पाण्याचे देखील अनेक वर्षांपासून हाल होत आहेत. मागच्या निवडणुकीच्या वेळी खोटी आश्वासने आणि थापा देऊन पाणी आणण्याच्या बाता मारणाऱ्या या युवराजाने गेल्या पाच वर्षात पाण्याचा एक थेंब देखील आणला नसल्याचे स्पष्टपणे रयत बोलून दाखवत आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी पसरलेली आहे.

आता या दक्षिण लोकशाही मतदार संघात सुभेदार आणि युवराजांच्या अनेक संस्थांमध्ये असलेले गुलाम सेवक मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून गावागावात, वाड्या वस्त्यांवर, शहरात, चौका चौकात, लॉज, हॉटेल, टपऱ्या मध्ये या युवराजांच्या ‘टोळीचा डोळा’ आहे. कोण काय बोलतोय ? कुठे बोलतोय ? काय करतोय कुणाला भेटला ? शेजारच्या सुभेदारांचा गुलाम सेवक आहे काय ? याची खबर आणि बित्तंबात युवराजांना पोहोचविली जात आहे. मोठ्या प्रमाणावर खजिना रिकामा केला जात आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या संपूर्ण मतदारसंघात ‘धुरळा’ उडवत फिरत आहेत. बाबाच्या भूमीतून आणि सुभेदारांच्या सुभेदारीतून जवळचे भरघोस गुलाम सेवक या मतदारसंघात ठाण मांडून बसलेले आहेत. साम दाम दंड भेद याचा वापर सुरू आहे. लाडू, साखर, बत्तासे, खोबरे क्षणाक्षणाला बाहेर येत आहे. कोंबडा आणि कोंबड्या हादरलेले आहेत. बोकडांचा फडशा पडत आहे. शेवटच्या टप्प्यात पैशांचापाऊस पडणार आहे. तरीही सुभेदाराची लंका आणि लंकेची आग विझणार नसल्याचे चित्र मतदार संघात आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!