घारगाव पोलीस कार्यक्षम कधी होणार ?

कोण पाठीशी घालतय ? कोणाचे आशीर्वाद ?

प्रतिनिधी —

सातत्याने घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटनांमुळे नेहमीच वादग्रस्त ठरलेले आणि संपूर्ण जिल्ह्यात अकार्यक्षम म्हणून प्रसिद्ध असलेले घारगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी कधी कार्यक्षम होणार असा सवाल उपस्थित झाला आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील पोलीस अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालत आहे ? त्यांना कोणाचे आशीर्वाद आहेत ? याची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घारगाव पोलीस ठाणे अंतर्गत बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने घडत आहेत. यामध्ये घरफोडी, चोऱ्या बरोबरच खून, सशस्त्र हाणामाऱ्या, अवैध शस्त्र, जुगार, मटका, अवैध दारू विक्रीचा व्यवसाय अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. घडल्या आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडकर यांच्या कार्यपद्धतीवर परिसरातील नागरिक नेहमीच शंका कुशंका व्यक्त करीत असतात. त्यांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत असतात. अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना घडणारे केंद्र म्हणून सध्या साकुर गाव समोर आले आहे. राजकीय हाणामाऱ्या, गुंडगिरी बरोबरच अवैध सावकारकी, मुलींवरील अत्याचार, बलात्कार, गावठी पिस्तुले, अवैध दारू विक्री, दादागिरी, अवैध प्रवासी वाहतूक अशा विविध गुन्हेगारी घटनांमुळे साकुर कुप्रसिद्ध होत आहे. अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना करणारे गुंड हे निर्ढावले आहेत. कारण त्यांना वाचवणारे आणि पाठीशी घालणारे राजकीय हस्तक्षेप त्यांच्या गुंडगिरीला प्रोत्साहन देताना आढळतात.

मोठ्या नेत्यांच्या राजकीय भांडणात साकुर गावाला मात्र वेठीस धरण्यात येत आहे. नेत्यांचे गट आणि त्यांच्या गटातील कार्यकर्ते अग्रभागी आहेत. आपल्या गाव पुढारी नेत्यांना व कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी दोन मोठ्या नेत्यांमध्ये असलेली स्पर्धा गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचे दिसून येत आहे. एवढे सगळे होत असताना घारगाव पोलीस मात्र गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात अपयशी ठरले आहेत. पोलीस निरीक्षक खेडकर यांच्या टीम मधील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने अशा घटनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने व कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने अशा घटना घडत असल्याचे आरोप होत आहेत.

एका पोलीस उपनिरीक्षकाने फिर्याद देण्यासाठी आलेल्या फिर्यादींना धमकावण्याचा प्रकार केला आहे. त्याची तक्रार देखील वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे. गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात हे पोलीस ठाणे आघाडीवर आहे. वर्षांपूर्वी झालेल्या एका खुनाचा तपास अद्याप घारगाव पोलिसांना लावता आलेला नाही. या खुनाच्या तपासात होणारा हलगर्जीपणा आणि  त्या संबंधाने पोलीस निरीक्षक व तपासी अधिकारी संतोष खेडकर यांच्यावर केले जाणारे आरोप आणि चर्चा या सर्वश्रुत आहेत.

पठार भागात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे देखील नुकतेच उघड झाले आहे. यापूर्वी येथील वेश्या व्यवसायावर पोलीस उपअधीक्षकांनी छापा घालून कारवाई केली होती. त्यानंतर खरे तर हा व्यवसाय बंद व्हायला हवा होता. परंतु त्याच ठिकाणी त्याच आरोपींकडून पुन्हा वेश्याव्यवसाय सुरू झाला. आणि दुसऱ्यांदा पोलीस उपअधीक्षकांनी पुन्हा छापा टाकून घारगाव पोलिसांचे पितळ उघडे पाडले. तरीही संबंधित जबाबदार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. यामागचे नेमके गौडबंगाल काय ? या पोलीस अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण असाही सवाल उपस्थित होत आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या अकार्यक्षमतेवर कारवाई होऊ नये यासाठी त्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणणारे राजकीय नेते कोण ? याचे उत्तर कधी मिळणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन मुलीवर झालेला निर्दयी अत्याचार त्यातून तिने केलेली आत्महत्या यामुळे सध्या घारगाव पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे, ढाबा, हॉटेलवर होणारी अवैध दारू विक्री, अवैध जुगार, मटका अड्डे, गांजा तस्करी, वाळू तस्करी, रस्ता लूट, गुटखा विक्री, वेश्याव्यवसाय, चोऱ्या, घरफोड्या यात सातत्याने भर पडत आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे पठार भागाची शांतता कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली असताना अकार्यक्षम अधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे वरिष्ठ अधिकारी कधी ॲक्शन मोडमध्ये येणार असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.

RRAJA VARAT

2 thoughts on “घारगाव पोलीस कार्यक्षम कधी होणार ?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!