राजकारणासाठी धर्माचा वापर सुरू झाल्याने संगमनेरची शांतता धोक्यात !
बहुजन तरुणांनो सावधान !!
विशेष प्रतिनिधी —
दंगलींसाठी कुप्रसिद्ध असणारे शहर म्हणून संगमनेर शहराची ओळख यापूर्वी राज्यात परिचित होती. हिंदू मुस्लिम दंगल घडण्याचा ‘हॉटस्पॉट’ असे रेकॉर्ड संगमनेरचे पोलीस दप्तरी नोंदवलेले होते. मात्र गेल्या काही वर्षापासून या शहरात आणि तालुक्यात शांतता नांदत आहे. ही शांतता आता राजकीय मंडळींना बघवत नसल्याने केवळ राजकीय स्वार्थ साधण्यासाठी किरकोळ गोष्टींचा बाऊ करत संगमनेर शहराचे वातावरण पुन्हा एकदा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू झाला असून त्यामध्ये हिंदू मुस्लिम समाज एकमेकांविरुद्ध कसे उभे राहतील आणि ही तेढ कशी वाढत जाईल याचे खास प्रयत्न राजकीय नेतेमंडळींकडून सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

मुळातच शांतता प्रिय असणाऱ्या संगमनेरकरांनी ‘दंगलींचा डाग’ पुसून गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेरची शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवली आहे. मात्र आता संधीसाधू मंडळी राजकीय फायदा उठवण्यासाठी या शांततेला गालबोट लावण्याचा एन केन प्रकारे प्रयत्न करीत आहेत. संगमनेरात दंगल होत नाही, यामुळे काही मंडळी अस्वस्थ झाली आहे. ती ठराविक मंडळी छुपी कारस्थाने करीत आहे. परंतू ही मंडळी यात यशस्वी होणार नाही. संगमनेरकर त्यांना आता यशस्वी होऊ देणार नाहीत अशी परिस्थिती सध्या तरी दिसत आहे. मात्र तरिही भावनेच्या भरात कोणी काही पाऊल उचलले तर शांतता बिघडू शकते अशीही शंका आल्या वाचून राहत नाही.

आज-काल धर्माविरुद्ध धर्म लढविण्याची एक नवी राजकीय पद्धत पुढे आली आहे. कोणत्याही किरकोळ गोष्टींना पुढे करून त्याला धार्मिक आणि जातीय रंग देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर देखील जोरदारपणे केला जातो. शिवाय विविध प्रकारची माध्यम यात भर घालत असतात. फेक न्यूज तयार करून त्या न्यूजच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण कशी होईल असे प्रयत्न अनेक वेळा झाले आहेत. आणि त्यात ही मंडळी यशस्वी देखील झाली आहे. एआय चा देखील वापर केला जात आहे किंवा केला जात असावा. देशात विविध ठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणारी ठराविक राजकीय मंडळी उघड देखील झाली आहे.

संगमनेरात गेल्या दोन तीन वर्षांपासून पुन्हा जातीयवाद, धार्मिक वाद वाढविण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते मंडळी करीत आहेत. या मंडळींच्या भुलथापांना बळी पडून हिंदू मुस्लिम समाजातील बहुजन तरुण हा त्यांच्या जाळ्यात सापडून फसला जात आहे. तरुणांचा वापर करणे हे पुढार्यांना सोपे शस्त्र झाले आहे. विशेष म्हणजे हे पुढारी नामानिराळे राहून, वातावरण भडकवणारे बाजूला राहून सर्वसामान्य शेतकऱ्यांची, मजुरांची, कामगारांची, मध्यमवर्गीयांची बहुजन मुलेच अशा घटनांमध्ये अडकली जातात. आणि आरोपी होऊन त्यांचे पुढचे आयुष्य बरबाद होते. याचा विचार बहुजन मुलांच्या माता-पित्यांनी, पालकांनी, नातेवाईकांनी करायला हवा. आपल्या तरुण मुलांचे आयुष्य कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकवून त्यांना कायमचे बरबाद होऊ द्यायचे काय ? याचा विचार त्यांनी करायला हवा. मुस्लिम धर्मातील सामाजिक विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी देखील याचा विचार करून आपल्या समाजातील तरुणांना अशा गोष्टींपासून परावृत करण्याची गरज आहे.

संगमनेरचा दंगलींचा इतिहास पाहता रेकॉर्ड जर तपासले तर दंगलींमध्ये मध्ये सापडलेली आणि कायद्याच्या कचाट्यात पिळून निघालेली व आपल्या तारुण्याची कित्येक वर्ष तुरुंग, फौजदारी खटल्यांमध्ये वाया घालवलेली सर्व तरुण मंडळी ही सर्वसामान्य कुटुंबातून आणि बहुजन समाजातून आलेली दिसतील. त्यांचा वापर झाल्याचा पश्चाताप त्यांना आज होत असेल. संगमनेर मध्ये दंगली घडवल्या गेल्या आहेत असे देखील जाणकार मंडळी सांगतात. राजकीय फायद्यासाठी दंगली घडवण्याचे प्रकार नवे नाहीत. यामध्ये पोलिसांचीही भूमिका संशयास्पद आणि अशा गोष्टींना खतपाणी घालणारी ठरली आहे.

गावाशी, शहराशी, तालुक्याशी, जिल्ह्याशी कुठलीही व्यक्तिगत नाळ नसलेले, प्रेम नसलेले बाहेरून बदलून आलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना त्या त्या गावाशी काहीही घेणे देणे नसते. असा आज वरचा अनुभव आहे. त्यांना फक्त राजकीय साहेबांचे ऐकून, माना डोलवून आपले रेकॉर्ड क्लिअर ठेवायचे असते. आणि नोकरीच्या कालावधीत आपली तिजोरी कशी भरता येईल व राजकीय पुढाऱ्यांच्या विविध पक्षांच्या थडीवर हात ठेवून आपला स्वार्थ कसा साधता येईल एवढा एकच उद्देश त्यांच्यासमोर दिसतो.

एखाद्या साहेबांनी सांगितले की ह्या धर्माच्या लोकांवर कारवाई करा, गुन्हे दाखल करा, की त्यांना ‘जी साहेब’ म्हणत कारवाई करायची. तर दुसऱ्या साहेबांनीही सांगितले की, नाही आता या धर्माच्या लोकांवर कारवाई करा, की लगेच त्या धर्माच्या लोकांवर कारवाई करून दोन्हीही धर्मातील बहुजन, गोरगरीब तरुणांना गुन्हेगार, आरोपी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे आयुष्य कायमचे बरबाद करायचे अशा भूमिका पोलिसांनी नेहमीच घेतलेल्या दिसतात. त्यामुळे त्यांना गावाशी, शहराशी काही घेणं देणं नसतं. फक्त साहेब सांगेल त्याप्रमाणे कारवाई करायची आणि आपला स्वार्थ साधायचा. असे दुकान पोलिसांकडून चालविले जाते. त्यामुळे पोलीस देखील फार शांतता व्यवस्था, कायद्याचे रखवाले आहेत असा समज निर्माण करून घेण्याचे कारण नाही.

पोलिसांना, त्यांच्या वरिष्ठांना, अधिकाऱ्यांना जर खरंच शांतता आणि सुव्यवस्था राखायची असेल तर त्या साठी त्यांना 24 तास खूप झाले. 24 तासात ते कुठल्याही शहराची गावाची शांतता कायदा व सुव्यवस्था सुरळीत करू शकतात. गावगुंडांना वठणीवर आणू शकतात. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना सरळ करू शकतात. जातीयवाद वाढवणाऱ्यांना ठेचून काढू शकतात. ते सर्व काही करू शकतात परंतु साहेबांच्या नादी लागल्यामुळे आणि साहेबांच्या सांगण्याप्रमाणे पोलीस अधिकारी नाचत असल्याने सगळीकडे अशी प्रकरणे वाढलेली दिसतात.

बऱ्याच ठिकाणी सर्व प्रकारचे अवैध धंदे आणि दोन नंबरचे अनैतिक धंदे करणारे व पोलिसांचे साटे लोटे असल्याने असे अवैध धंदे करणारे या घटनांना खतपाणी घालताना आढळून आले तरी त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे देखील बोलले जाते. त्यामुळे अशा घटना घडण्यामागे व आरोपींना रसद पुरवण्यामागे बऱ्याच वेळा दोन नंबर धंदे करणाऱ्या पुढार्यांचा, गुंडांचा देखील छुपा सहभाग असल्याचे आढळून आले आहे.

सध्याच्या राजकारणात धार्मिक राजकारणाबरोबर आता नवीन ‘जातीचा ट्रेंड’ सुरू झालेला आहे. हिंदू विरुद्ध मुस्लिम असा धार्मिक वाद तर वाढवला जातच होता. हिंदू विरुद्ध ख्रिश्चन, मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन असाही वाद वाढवला जात होता. परंतु गेल्या काही वर्षापासून आता धर्मवेड्यांनी, कट्टर जातीयवाद्यांनी नवीन पद्धती सुरू केली आहे. मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध मुस्लिम, दलित विरुद्ध मुस्लिम, बहुजन ओबीसी विरुद्ध मराठा अशा विविध जाती, विविध धर्मांतर्गत असणारे पंथ यांना किरकोळ कारणांवरून एकमेकांशी लढविले जात आहेत. त्यामध्ये देखील बारकाईने पाहिल्यास अशा घटना घडविण्यात आणि तेढ निर्माण करण्यात राजकीय नेते, पुढारी मंडळीच पुढे असल्याचे दिसून येईल.

एकंदरीत हा सर्व प्रकार पाहता सर्वसामान्य नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, मध्यमवर्गीयांनी आपल्या तरुण मुलांना भविष्यात कुठल्याही गुन्ह्यात अडकू नये, त्यांचे आयुष्य बरबाद करू नये म्हणून शांततेने, लक्षपूर्वक आणि संयमाने समजून सांगायला हवे. आपला वापर होऊ न देणे हे आजकालच्या तरुणांचे काम आहे. त्यामुळे तरुणांनी देखील आपले भवितव्य, नौकरी, कामधंदा, भविष्यातील स्वतःचा कुटुंबाचा आणि देशाचा विकास याकडे लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर कट्टर धर्मवेढ्यांच्या नादी लागून कायमचे आयुष्य बरबाद होते. यापूर्वी घडलेल्या दंगलीतील सर्व धर्माच्या आरोपी मंडळींना याबाबत हिंदू आणि मुस्लिम धर्मातील तरुणांनी विचारून वस्तूस्थितीचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे सत्य त्यांच्यासमोर येईल.

