संगमनेरात घडणाऱ्या घटनांबाबत आमदार थोरात – तांबे यांची ‘चुप्पी’ धक्कादायक  !

शांतता समितीचा फार्स… समाजात प्रचंड नाराजी !!

विशेष प्रतिनिधी —

गेल्या काही महिन्यांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यात दोन धर्मांमध्ये आणि समाजामध्ये  किरकोळ आणि गंभीर स्वरूपाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे संगमनेरची शांतता, कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. शहर हे दोन धर्माच्या, दोन समाजाच्या दंगलीच्या उंबरठ्यावर उभे असताना संगमनेरचे आमदार माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी धरलेली चुप्पी ही धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया शांतताप्रिय नागरिक आणि समाजातून उमटत आहेत.

आपल्या मतदारसंघात घडणाऱ्या चांगल्या वाईट घडामोडींबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी जागृत असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी जागृत असतील आणि मतदार संघाची शांतता अबाधित राहावी असे त्यांना मनोमन वाटत असेल तर त्यांनी अशा घटना घडल्यानंतर ठोस भूमिका घेऊन समाजामध्ये येऊन शांतता स्थापित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु संगमनेरचे लोकप्रतिनिधी असे काहीच करताना दिसत नाहीत याची खंत जनता बोलून दाखवत आहे.

आमदार बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्याकडून कोणतीच भूमिका घेतली जात नसल्याने त्यांच्याविषयी थेट नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हिंदू समाजाबरोबरच मुस्लिम समाजात देखील त्यामुळे साशंक वातावरण आहे. लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचे महत्त्व सर्वसामान्य जनतेने त्यांना समजून सांगण्याची वेळ आली आहे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसर हा हिंदू मुस्लिम समाजात वादग्रस्त प्रसंग घडण्याचा हॉटस्पॉट आणि बदनामी कारक पॉईंट ठरला आहे. या ठिकाणी मुस्लिम समाजातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून हिंदू समाजातील तरुणांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी कोल्हेवाडी रोडला देखील हाच प्रकार घडला. त्याचबरोबर ग्रामीण भागात विशेषत: समनापुर, कोल्हेवाडी, जोर्वे या गावांच्या पंचक्रोशीत मुस्लिम तरुणांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या बाबत  संगमनेर शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. शनिवारी सायंकाळी देखील संगमनेर बस स्थानकावर असाच प्रकार घडून अफवांचे पेव फुटले.

त्या मुळे पोलिसांची एकच धांदल उडाली. मोठी धावपळ झाली. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह पोलीस उपअधीक्षक आणि संगमनेर उपविभागातील पोलीस ठाण्यांचा फौज फाटा संगमनेर शहरात तातडीने हजर झालेला आहे. वातावरण गंभीर असले तरी अद्याप शांतता आहे. ही शांतता कायम अबाधित राखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आहे. जनतेला फक्त मतदानापुरते गृहीत न धरता जनताही आपलं कुटुंब आहे. परिवार आहे. याचे भान ठेवत त्यांना शांततेचे, आनंदाचे जीवन जगण्यासाठी ठोस भूमिका बजावण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. त्याबाबतही लोकप्रतिनिधींनी जागृत असायला हवे. परंतु लोकप्रतिनिधींची याबाबत कोणतीही भूमिका समाजापर्यंत पोहोचत नसल्याने समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या सोयीची शांतता समिती…

दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या सोयीनुसार सदस्य असलेल्या शांतता समिती बैठक झाली. या बैठकीत सुद्धा मुस्लिम आणि हिंदू कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची आणि वादावादी झाली. ‘शांतता समितीची बैठक हा निव्वळ फार्स’ ठरला आहे. प्रत्येक बैठकीला शांतता समितीचे सदस्य बदलत असतात. पोलिसांची वाहवाह करणारे सदस्य आणि समाजातील तथाकथित प्रतिष्ठित पुढारी फक्त शांतता समितीच्या बैठकीत बोलवले जातात. पोलिसांच्या आणि समाजातल्या चुकांवर बोट ठेवणाऱ्या नागरिकांना शांतता समितीच्या बैठकीला बोलावणे टाळले जाते. यामागे पोलिसांची नेमकी भूमिका काय हा देखील तेवढाच संशय निर्माण करणारा प्रश्न आहे.

त्यामुळे वारंवार अशा घटना घडून संगमनेर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये व कुठल्याही प्रकारे दंगलीचे गालबोट लागू नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन शांतता राखण्यासाठी ठोस प्रयत्न करायला हवेत. विशेष म्हणजे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील काही गावांमध्ये देखील अशा घटना घडत आहेत. त्यांनी देखील अशा घटनांमध्ये गांभीर्याने लक्ष घालून संगमनेरात शांतता कशी राहील यासाठी ठोस प्रयत्न करून पोलिसांना तशा सूचना वजा आदेश द्यायला हवेत आणि नागरिकांना देखील दंगलीच्या भीतीच्या छायेतून बाहेर काढायला हवे. असे मत नागरिक व्यक्त करतात. एकंदरीत पाहता संगमनेरची शांतता अबाधित ठेवण्याचे काम आमदार थोरात – तांबे यांच्यासह महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील असल्याच्या भावना समाजातून व्यक्त होत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!