विखे पिता – पुत्रांची जीवतोड मनधरणी तरीही नाराज अद्याप नाराजच !

विखे फॅक्टरचा फटका स्वतःलाच बसण्याची शक्यता !!

विशेष प्रतिनिधी —

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना यंदाच्या निवडणुकीत स्वपक्षीयांच्या नाराजीचा मोठा फटका बसणार असल्याचे भाकीत वर्तवले जात असून खासदार डॉक्टर सुजय विखे आणि महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोघे पिता पुत्र नाराज मंडळींची नाराजी दूर करण्यासाठी सातत्याने त्यांची मनधरणी करत असले तरी नाराज अद्यापही नाराजच असल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच विखे पिता पुत्रांवर असणारी नाराजी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत होती. कधी ती सामाजिक माध्यमातून जनतेसमोर येत होती. तर ती कधी सार्वजनिक सभांमधून भाषणातून, तर कधी कार्यकर्त्यांच्या वक्तव्यांमधून नाराजी उघड होत होती. निवडणुका जाहीर झाल्यानंतर या नाराजीने कडकसुर पकडला होता. विखे पिता पुत्रांना सर्वप्रथम ही नाराजी दूर करणे महत्त्वाचे होत. त्यामुळे त्यांनी पॅचअप करण्यासाठी नाराज नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. एक दोन वेळा नाहीतर जास्त वेळा नाराज मंडळींची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले असले तरी संपूर्ण मतदारसंघातील सुरुवातीपासूनच नाराज असलेली मंडळींची नाराजी अद्यापही दूर झाली नसल्याची चित्र आहे.

यंदाची लोकसभेची निवडणूक अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे पाटील यांना जड जाणार असल्याचे मत राजकीय जाणकार मंडळी व्यक्त करत होते. भाजप अंतर्गत त्यांच्याविषयी असलेली नाराजी, पक्ष बांधणी बाबत त्यांच्याविषयी असलेली साशंकता, पाच वर्षात वेगवेगळ्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजप सोडून इतरांना केलेली छुपी मदत, कर्जत जामखेड मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगर पंचायत, पंचायत समिती किंवा इतर निवडणुकांमध्ये आमदार रोहित पवार यांच्याशी होत असलेले जवळीक या सर्वच चर्चेच्या विषयांमुळे खासदार विखे यांच्या विरोधात नाराजीचा सूर होता. विशेषतः आमदार राम शिंदे आणि विखे पाटील यांच्यात वादाची मोठी ठिणगी पडली आहे. हा वाद काही केल्या मिटत नाही. विखे यांनी शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अनेक वेळा त्यांची भेट घेतली तरीही शिंदे अद्यापही नाराज  आहेत.

दुसरीकडे मतदार संघातील काही प्रमुख गावांमध्ये नेते कार्यकर्ते विखेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात होते. बहुचर्चित असलेला विखे पॅटर्न विखेंना अडचणीचा ठरू शकतो. राजकीय दृष्ट्या विरोधकांना संपवणे तसेच पक्षांतर्गत आपले राजकीय विरोधक देखील संपवणे. असा विखे पॅटर्न असल्याचे बोलले जाते. तोच पॅटर्न आता अडचणीचा ठरू शकतो. ‘जनतेच्या समस्या सुटलेल्या नाहीत, त्यावर आधी बोला, पाण्याचा प्रश्न सोडवा’ असा थेट सवाल खासदार विखे यांना सभेमध्ये विचारण्यात आला होता. त्यांच्याविषयीची नाराजी सामान्य जनतेपर्यंत किती मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे यावरून दिसून आले. शेवगाव, श्रीगोंदा, कर्जत जामखेड, नगर शहर या तालुक्यांमध्ये विखे पाटलांचा पूर्वीचा राजकीय पॅटर्न  त्यांना अडचणीचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

पाथर्डी मध्ये विद्यमान आमदार मोनिका राजळे या विखेंना पक्ष कर्तृत्व म्हणून मदत करतीलही, परंतु प्रतापराव ढाकणे आणि बहुजन समाज विखे पाटलांना किती अडचणीत आणतील हे निवडणुकीच्या वेळी दिसून येणार आहे. सध्या प्रतापराव ढाकणे हे शरद पवारांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत दिसत असून ढाकणे यांचे विखेंशी असलेले राजकीय सख्य सुद्धा सर्वश्रुत आहे. त्यामुळे या मतदारसंघात बहुजन समाज हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. संपूर्ण अहमदनगर मतदार संघात बहुजन समाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय ओबीसी समाज कोणती भूमिका घेतो हेही निवडणुकीच्या वेळी दिसून येईल. धर्म, जात, समाज याचा शिरकाव राजकारणा बरोबर निवडणुकातही झाला आहे, हे नाकारता येणार नाही. विखे पॅटर्न बरोबरच पवार पॅटर्न देखील या मतदारसंघात जोरदार कार्यरत असणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!