सुभेदार मंत्री आणि महाराजांनी आटपाट नगरीत ‘खेळ मांडला’ !
विशेष प्रतिनिधी —
शांत असणाऱ्या आटपाट नगरीत गेल्या वर्षभरापासून अशांतता निर्माण करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले आहेत. यासाठी राजकीय सत्ता, धर्म, जात याचा देखील वापर मुक्तपणे होऊ लागला आहे. ‘पूर्वेकडून आलेले मतलबी वारे’ या सर्व गोष्टींना कारणीभूत असल्याच्या प्रतिक्रिया नगरीच्या सर्वसामान्य रयतेच्या आहेत. सुभेदार मंत्री आणि महाराजांनी आटपाट नगरीत ‘खेळ मांडला’ असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

कुठलेही मोठे कारण नसताना राजकीय कुरघोड्या करण्याच्या नादात रयतेला वेठीस धरण्याचा प्रकार होऊ लागला आहे. सुरुवातीला आटपाट नगरीच्या महाराजांच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्यास सुरुवात झाली होती. त्यामध्ये आटपाट नगरीतील गौण खनिज, वाळू तस्करी अशा अवैध उद्योगांना पुढे करीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नाड्या आवळण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर आटपाट नगरीतील धार्मिक शांतता कशी नष्ट होईल आणि आटपाट नगरीत कायम तणाव कसा राहील याचे प्रयोग सुरू झाले. मुठभर मंडळींना हाताशी धरून सत्तेतील सुभेदार मंत्र्यांनी धर्माचा आणि जातीचा राजकीय खेळ सुरू केला. आटपाट नगरीत घडलेल्या कुठल्याही घटनेत हस्तक्षेप करून आपल्या ‘लाल दिव्याचा वापर’ करीत आटपाट नगरीचे पोलीस, प्रशासन वेठीस धरून मामलेदार, हवालदार, कोतवाल यांच्यावर दबाव टाकत प्रत्येक घटनेला राजकीय वळण देण्याचे कुटिल कारस्थान’ सुभेदार मंत्र्यांनी सुरू केले. आटपाट नगरीतील काही अति उत्साही आणि स्वतःला पुढारी समजणाऱ्या मंडळींनी साथ दिली. परंतु यातून रयतेलाच त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहेत.

तसे पाहायला गेले तर संपूर्ण परगाण्यात आटपाट नगरीचा विकास आणि सुजलाम सुफलाम वातावरण सुभेदार मंत्र्यांना व त्यांच्या हितचिंतकांना पाहवत नसल्याचेच दिसून आले आहे. अर्थात आटपाट नगरीचा कारभार देखील खूपच आदर्श आणि सुसंस्कृत आहे, असेही समजण्याचे कारण नाही. कारण आटपाट नगरीचे महाराज हे त्यांच्या कार्यकर्त्यांचे घरे भरण्यासाठी कोणकोणते उद्योग करतात आणि कसे छुपे सहकार्य करतात हे देखील वारंवार समोर आले आहे. महाराजांचे लायकी नसलेले ‘चमचे’ साहेबराव म्हणून आटपाट नगरीत फिरत असलेले पाहावे लागतात. रयतेला यातली खरी गोम माहित आहे. पण तरीही शेजारच्याने येऊन आपल्या मनातला राग आटपाट नगरीवर काढण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे तो रयतेला पटत नाही.

अर्थात सगळेच एकाच बाजूने आहे. असे नाही. दोघांच्याही त्रास देण्याच्या आणि कुरघोड्या करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. एक जण ‘अस्वली गुदगुल्या’ करून विरोधकाला मारतो. तर दुसरा धडक कृती दलाचा वापर करतो. एक जण ‘शुगर कोटेड गोळ्या’ खायला घालून पेशंटला नेस्तनाबूत करतो. तर दुसरा थेट सर्जरीवर विश्वास ठेवतो. त्रास मात्र सामान्य रयतेला भोगावा लागतो. दोघेही सारखेच….

पूर्वेच्या सुभेदार मंत्र्यांना आटपाट नगरीच्या महाराजांचा एवढाच राग येत असेल तर या दोघांनी समोरासमोर येऊन युद्ध करण्यास काय हरकत आहे ? एवढ्यावरही जमत नसेल तर दोघांनीही आपल्या कुटुंबातले जे काही सगे सोयरे, भाऊबंद, बायका, मुलं बाळं, सुना नातवंड, राजकारणात आणले आहेत, त्यांना देखील समोरासमोर आणून एकमेकांशी दोन हात करायला सांगितले पाहिजे. त्यासाठी दोघांनीही रयतेचा वापर कशाला करायचा ? आटपाट नगरीच्या, परगाण्याच्या, राज्याच्या महत्त्वाच्या लोकशाहीच्या निवडणुकांमध्ये एकमेकांना छुपी आणि रात्रीच्या अंधारातली मदत करायची, निवडणुका आधी एकमेकांचे गळे आवळण्याचा प्रयत्न करणारे निवडणूक काळात ‘रात्रीच्या अंधारात एकमेकांच्या गळा भेटी’ घेतात. आणि रयतेला उल्लू बनवतात. हे देखील सर्वजण जाणून आहेत. तरीही असे उद्योग सुरू असतात.

आटपाट नगरीच्या आणि आजूबाजूच्या महत्त्वाच्या निवडणुका होण्याआधीपर्यंत नगरीचे महाराज आणि पूर्वेकडचे सुभेदार मंत्री यांचे वेगवेगळे खेळ सुरू असतात. यामध्ये चिरडली जाते ती रयत. रयतेतील काही छोटे मोठे पुढारी, मजूर, हातावर पोट भरणारे कामगार, महिला, व्यापारी नुकसान रयतचेच होते. पोलीस प्रशासनावर दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करणे, गुन्ह्यात एकमेकांच्या कार्यकर्त्यांना अडकवणे, त्यानंतर गुन्ह्यातून आरोपींची नावे काढण्यासाठी पोलिसांवर कोतवालीत दबाव आणणे. असे उद्योग सुभेदार मंत्र्याचे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले रयतेच्या नजरेतून सुटलेले नाहीत. कितीही छुपे उद्योग केले तरी ते शेवटी उघड होतातच. ‘वडिलोपार्जित शेजाऱ्यांना त्रास देण्याचा धंदा’ कितीही जोरात असला तरी त्यात कधीही यश न मिळाल्याने ‘सुभेदार मंत्र्यांची आदळआपट’ होणे सहाजिकच आहे.

स्वतःची कुटुंबे सुरक्षित ठेवायची आणि रयतेचे प्रत्येक कुटुंब रस्त्यावर आणायचे. या कुटुंबातील तरुणांना अवैध मार्गांना लावायचे. दंगली घडवण्याचे प्रयत्न करायचे. शांतता, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवयाची. अशा गोष्टींना खतपाणी घालायचे. विनाकारण तणाव निर्माण करायचे. असले ‘बाजारबसवे’ उद्योग आटपाट नगरीचे महाराज आणि पूर्वेकडच्या मतलबी सुभेदार मंत्र्यांनी थांबवले पाहिजेत अशी अपेक्षा रयत व्यक्त करते.

