संगमनेर पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे सुरू आहेत !
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
प्रतिनिधी —
संगमनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात विविध प्रकारचे अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. अवैध धंदे करणारे गुन्हेगार पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैध धंदे करीत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त होत आहेत. पुणे पोलिसांनी संगमनेरात छापा घालून सुमारे ५८ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थ बनावट ताडी तयार करण्याच्या उद्योगाचा पर्दाफाश केला. तरीही संगमनेर पोलीस कोणत्या झोपेत होते ? की झोपेचे सोंग घेऊन अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करीत होते ? असे सवाल विचारले जात असून हा चर्चेचा विषय झालेला आहे.

संगमनेर तालुक्यातील अवैध धंद्यांचे पितळ वेळोवेळी उघड झाले आहे. तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे चालू आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला अवैध कत्तलखाना, गोवंश हत्या याने संगमनेर पोलिसांची आणि शरीराची बदनामी देखील झाली आहे. असे असताना कुठलेही अवैध धंदे कायमस्वरूपी पोलिसांकडून बंद केले जात नाहीत अथवा त्यावर छापे मारले जात नाहीत. छापे मारले तरी जुजबी कारवाई करून मुख्य आरोपींना सोडून देऊन पंटर वर कारवाई केली जाते हा पोलिसांचा नेहमीचा फंडा आहे.

दोन दिवसांपूर्वी पुणे शाखेच्या पथकाने संगमनेर तालुक्यात येऊन वेल्हाळे गावाच्या शिवारात (हरीबाबा) छापा टाकून एका पत्र्याच्या शेडमध्ये बनावट ताडी तयार करण्याचे २ हजार २१७ किलो ‘क्लोरेल हायड्रेट’ जप्त केले. यावरून संगमनेरात हा धंदा किती मोठ्या प्रमाणात फोफावलेला होता हे दिसून येत आहे. आणि याची माहिती संगमनेर पोलिसांना नव्हती यावर संगमनेर कर जनता विश्वास ठेवायला तयार नाही.

संगमनेर तालुक्यातील पोलिसांवरचा विश्वास कमी होत चालला आहे. कारण अनेक वेळा कारवाया करूनही तेच तेच अवैध धंदे पुन्हा त्याच ठिकाणी सुरू होतात. आरोपीही तेच असतात. त्यामुळे यात पोलिसांचा सहभाग असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. एवढे सगळे होत असताना वरिष्ठ पोलीस अधिकारी कुठल्याही प्रकारची याबाबतची जबाबदारी पार पाडताना दिसत नाहीत. त्यामुळे ते अशा अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जनतेमधून केला जात आहे.

संगमनेर शहर, घारगाव पोलीस स्टेशन, संगमनेर तालुका पोलीस ठाणे आणि आश्वी पोलीस ठाणे. संगमनेर तालुक्यातील या चारही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका जुगार अड्डे, बेकायदा दारू विक्री, वाळू तस्करी, गोवंश कत्तलखाने, वेश्याव्यवसाय, बेकायदा गुटखा विक्री, अवैध प्रवासी वाहतूक असे अनेक धंदे सुरू आहेत. अमली पदार्थांमध्ये गांजा विक्री करण्याचे केंद्र संगमनेर असल्याचे एकेकाळी उघड झाले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या भंगार उद्योगात चोरीचे भंगार विकत घेण्याचे प्रमाण मोठे आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या चोरलेल्या वीज मोटारी, केबल, मोटार सायकल, गाड्या यांचे स्क्रॅप करून या भंगारवाल्यांना विकले जाते. त्यांच्यावरही कुठलीच कारवाई केली जात नाही. राज्या बाहेरून आलेले भंगारवाले देखील संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागात मोठ मोठ्या जमिनी घेऊन त्यावर गोडाऊन थाटून भंगाराचा व्यवसाय करत आहेत.

घरफोड्या, अवैध सावकारी, चोऱ्या, गावठी कट्टे, मोटरसायकल चोरी, मोठ्या वाहनांची चोरी, बस स्थानकावरील पाकीट मारी आणि सोन साखळ्यांची चोरी असे चोऱ्यांचे विविध प्रकार संगमनेर मध्ये सुरू आहेत. त्यात भरीस भर म्हणून धार्मिक तेढ, जातीय कारणावरून हाणामाऱ्या होत आहेत. त्यात सातत्याने वाढत होत आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस यशस्वी झालेले नाहीत. ठराविक गुन्हे आणि व्यक्तिगत इंटरेस्ट असलेल्या गुन्ह्यातच पोलीस आवडीने तपास करताना दिसतात. अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार, खून यासारख्या घटनांमध्ये देखील पोलिसांचा तपासातला हलगर्जीपणा वेळोवेळी समोर आला आहे.
