राजकीय कोलांट उड्या मारणाऱ्या भाऊसाहेब वाकचौरेंवर मतदार पुन्हा विश्वास ठेवतील का ?
शिर्डी लोकसभा मतदार संघ
विशेष प्रतिनिधी —
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ शिवसेनेने दिलेल्या उमेदवारीवर सन २००९ साली मिळालेली आयती खासदारकी बुद्धी भ्रम झाल्याने पुढच्या पंचवार्षिकला दुसऱ्या पक्षात प्रवेश करून गमावली. आणि पुन्हा आता खासदार बनण्यास इच्छुक असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शिर्डी मतदार संघातील मतदार पुन्हा विश्वास ठेवतील का ? वाकचौरेंसाठी हा अडचणीचा मुद्दा ठरणार आहे.

शिर्डी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भाऊसाहेब वाकचौरे यापूर्वी राजकीय कोलांट उड्या मारीत पक्ष बदल करून काँग्रेस पक्षात गेले होते. भाजपातही त्यांनी नंतर विधानसभेसाठी नशीब आजमावून पाहिले होते. मतदारांशी आणि जनतेशी विश्वासघात केल्यामुळे नंतर मात्र त्यांना दोनही वेळा जनतेने नाकारले. सुरुवातीला विजयश्री मिळवूनही शिवसेनेला धोका दिला म्हणून त्यांच्याविषयी जनतेत नाराजी होतीच. त्यामुळे त्यांना खासदारकीपासून तब्बल दहा वर्ष दूर राहावे लागले. आता ते पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.

वाकचौरे यांच्या उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी ते उमेदवारी मिळाल्यासारखेच कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीने अद्याप पर्यंत शिर्डी लोकसभेचा उमेदवार जाहीर केलेला नाही. तसेच महायुतीकडून सुद्धा लोकसभेसाठी शिर्डी मधून कोण उभे राहील याबाबत अद्याप उमेदवार दिलेला नाही. महायुतीकडून सदाशिव लोखंडे हे निवडणूक लढविण्यास पुन्हा इच्छुक आहेत. तसेच रिपब्लिकन पार्टीचे नेते आणि मंत्री रामदास आठवले देखील शिर्डीतून इच्छुक आहेत. नव्यानेच माजी आमदार बाळा नांदगावकर यांचे देखील नाव पुढे आले आहे. काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री बबनराव घोलप देखील इच्छुक असल्याची चर्चा होती. त्यामुळे या मतदारसंघातून महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे लवकरच दिसेल.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात आता बाहेरचा उमेदवार नको अशी भावना नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये पसरलेली आहे. या भावनेच्या लाटेवर स्थानिक उमेदवार स्वार होऊन विजय मिळवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे इच्छुक असले तरी काँग्रेस पक्षाने देखील शिर्डीतून उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. काँग्रेस पक्षाकडून उत्कर्षा रूपवते या इच्छुक असून त्यांचे देखील तसे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे की उत्कर्षा रुपवते या दोघांमधून महाविकास आघाडी शिर्डी लोकसभेचा उमेदवार ठरविणार आहे.

सन २००९ साली खासदार झालेल्या पाच वर्षाच्या कालावधीतील कामांवरच भाऊसाहेब वाकचौरे आपल्या उमेदवारी बाबत सोशल मीडिया मधून प्रचार करत आहेत. तेवढी एकच शिदोरी त्यांच्याकडे आहे. त्यांना मिळालेल्या खासदारकीच्या काळात त्या वेळी त्यांनी केलेली कामे याबाबत ते वारंवार जनतेला सांगत आहेत. मात्र त्यांनी त्यावेळी शिवसेनेशी केलेली गद्दारी शिवसैनिकांच्या पचनी पडली नव्हती. त्यातून त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता. निष्ठावान शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे. त्यांची बदलती राजकीय भूमिका आणि विविध पक्षात मारलेल्या उड्या याबाबतही जनता अद्याप विसरलेली नाही. त्यामुळे त्यांच्या या धरसोडीच्या वृत्तीमुळे मतदारांमध्ये नेहमीच उलटसुलट चर्चा असते. पुन्हा खासदार होऊन दुसरीकडे गेले तर काय हा सवाल उपस्थित होतच आहे. अशा नेत्यांवर आता पुन्हा कितपत भरवसा ठेवणार ? अशा प्रतिक्रिया हे देखील व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे वाकचौरें विषयी अविश्वासाचे वातावरण मतदारसंघात आहे.


पक्षांतर करणारा कोणताही नेता असो त्याला खऱ्या अर्थाने कोणत्याच पक्षाने आपल्या पक्षात स्थान द्यायलो नको, तरच राजकारणातील घान काही अंशी कमी होईल असे मला वाटते.
यासाठी पत्रकारांनी आवाज तीव्रपणे उठविला पाहिजे असे मला वाटते.