आटपाट नगरीचा विकास आणि मंत्र्याची आदळआपट !

सुभेदाराचा तांडा भविष्यात कुठे असेल ?

विशेष प्रतिनिधी —

सध्या आटपाट नगरीच्या विकासाचा बोलबाला सुरू आहे. आटपाट नगरीचा विकास करण्यासाठी मंत्र्याची नुसती ‘आदळआपट’ सुरू आहे. विशेष म्हणजे हे मंत्री महोदय संपूर्ण राज्याचे मंत्री असले तरी आटपाट नगरीवर या मंत्र्यांचे विशेष प्रेम आहे. आपला सवता सुभा आणि तिथली सुभेदारी दुर्लक्षित करून आटपाट नगरीचा विकास करण्याचा ‘विडा’ या मंत्र्यांनी उचलला आहे. त्यासाठी मंत्री वाट्टेल ते करण्यास तयार आहेत.

आटपाट नगरीचे मुख्य महाराज आणि सुभेदार सध्या सत्तेतून पायउतार झालेले असल्याने या महाराजांच्या सुभेदारीत आपल्या बापजाद्यांनी  सुरू केलेली ‘राजकारणाची दुकानदारी’ कशी चालू राहील यासाठी मंत्र्याची नेहमीच जुळवाजुळवी चालू असते. आटपाट नगरीच्या सुभेदारीत नाक खुपसून शेजारच्याला त्रास द्यायचा हा ‘वडिलोपार्जित धंदा’ त्यांच्या सुपुत्राने कायमस्वरूपी सुरू ठेवलेला आहे. हा धंदा व्यवस्थित चालू राहावा यासाठी वेळोवेळी त्यांनी आपला ‘राजकीय तांडा’ कोणत्या ना कोणत्या महासम्राटाच्या दारात नेऊन बांधला आहे. सध्या देशावर राज्य करणाऱ्या सम्राटाच्या दरवाज्याशी हा तांडा या सुपुत्र मंत्री महोदयाने बांधून ठेवला आहे. भविष्यात हा ‘पूर्वेकडचा तांडा’ कोणाच्या दारात लोटांगण घालून बसलेला असेल ? आटपाट नगरीची रयत हे पाहण्यास उत्सुक आहे.

मंत्री महोदयांच्या सुभेदारीत आटपाट नगरीच्या महाराजांनी केलेला हस्तक्षेप मंत्री महोदयांच्या जिव्हारी लागलेला आहे. भविष्यात आपल्या सुभेदारीला कोणताही धक्का पोहोचू नये म्हणून आटपाट नगरीत येऊन थोडा वेळ गोंधळ घालून पुन्हा आपल्या दुकानदारीकडे लक्ष देण्यासाठी मंत्री महोदय आटपाट नगरीत धाव घेत असतात. आटपाट नगरीच्या सुभेदारीत मात्र त्यांना आतापर्यंत कुठलाही छेद करता आलेला नाही. आटपाट नगरीतील मंत्री महोदयांची वडिलोपार्जित नेतेमंडळी आता वयोवृद्ध आणि राजकीय निवृत्त झालेली आहे. फक्त मंत्री महोदय आटपाट नगरीत आले की मंत्रिमहोदयाच्या आजूबाजूला येऊन शांतपणे बसणे. मंत्री महोदयांचे बोलबच्चन ऐकणे, शांतपणे उठून घरी जाणे आणि राजकीय निवृत्तीचा आनंद घेणे. एवढा एकच कार्यक्रम या महोदयांच्या वडिलोपार्जित कार्यकर्त्यांनी सुरू ठेवलेला आहे.

आटपाट नगरीत मंत्री महोदयांना काही ‘नवीन मासे’ गळाला लागले आहेत. हे नवीन कार्यकर्ते उत्साहात असून आटपाट नगरीतले राजकारण आणि सुभेदारीवर कसा डल्ला मारता येईल याची दिवास्वप्ने बघत आहेत. विशेष म्हणजे मंत्र्याचा जो राजकीय पक्ष आहे त्या पक्षात गटबाजी निर्माण करून आपल्याच वडिलोपार्जित कार्यकर्त्यांचा आणि स्वतःच्या ‘जनसेवेचा’ एक गट निर्माण करून राजकीय गोंधळ घालण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. असा उद्योग मंत्री महोदयांचा तांडा ज्या ज्या पक्षात गेला आहे त्या त्या पक्षात त्यांनी घातला आहे यात काही नवीन नाही.

आटपाट नगरीत या मंत्रिमहोदयांना मिळालेले नवागत कार्यकर्ते आणि त्यांची ‘सामाजिक राजकीय लायकी’ किती आहे हे सर्वसामान्य रयतेला मात्र चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे या नवोदित प्रसिद्धीलोलूप कार्यकर्त्यांकडून मंत्र्यांना काय फायदा होईल हे भविष्यात दिसणार आहे. विशेष म्हणजे आटपाट नगरीतील महाराजांबरोबर अनेक वर्ष सत्तेच्या खुर्च्या मिळवून ‘मालमलीदा’ गोळा केलेले हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही गाव पुढारी आपल्या जातीचा, समाजाचा आधार घेत मंत्र्याच्या तांड्यामध्ये सामील झाले असले तरी त्याचा अद्याप तरी कोणताही फरक आटपाट नगरीच्या सुभेदारीवर पडलेला दिसत नाही. मंत्री महोदयांच्या आटपाट नगरीतील पक्षाची अंतर्गत वाताहात जोरदारपणे झालेली आहे. ही वाताहत करण्यात मंत्री महोदयांचे कर्मचारी, कार्यकर्ते वेगवेगळे प्रयोग नेहमीच राबवत असतात. त्यामुळे आटपाट नगरीत या पक्षाचे अस्तित्व काय हा एक चर्चेचा विषय आहे.

एकंदरीत आटपाट नगरीचा विकास करण्यासाठी स्वतःची सुभेदारी सोडून या नगरीच्या विकासात अगदी जीव तोडून आदळआपट करणाऱ्या मंत्री महोदयांना येणाऱ्या निवडणुकीत काय काय धावपळ करावी लागणार आहे हे येथील रयत पाहणारच आहे. मात्र शेजाऱ्यांना त्रास देण्याचा धंदा काही नवीन नाही. वडिलोपार्जित उद्योग आहे. निवडणुकीत साटे लोटे करण्यात आणि छुप्या भानगडी करण्यात हा तांडा ‘फेमस’ असल्याने ‘पंचवार्षिक सालाबादप्रमाणे’ रयते साठी ती करमणूकच ठरणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!