वाळू तस्करीसह गंभीर गुन्ह्यातून नावे वगळण्यासाठी…
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची नेते मंडळींकडे धावाधाव !
पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रयत्न…
प्रतिनिधी —
नगर जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर पोलीस ठाण्यांमध्ये जे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत त्यामधून नावे वगळण्यात यावीत यासाठी संबंधित तपासी अंमलदार, फिर्यादी पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुचना कराव्यात यासाठी धावाधाव सुरू असून पोलिसांवर दबाव आणण्याचे प्रयत्न देखील सुरू असल्याची चर्चा आहे.

नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या संदर्भाने वेगवेगळ्या चर्चा ऐकण्यास मिळत असून गौण खनिज तस्करी आणि वाळू चोरीचा मुद्दा ऐरणीवर आहे. जिल्ह्यात वाळू माफियांनी घातलेला हैदोस आणि त्यातून वाढलेली गुंडगिरी यावर विधानसभेत देखील चर्चा उपस्थित झाली. माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी जिल्ह्यात वाळू तस्कर माफीयांची गुंडगिरी सुरू असल्याचे स्पष्टपणे म्हटले असून वाळू धोरणावर टीका केली होती.

संगमनेर तालुक्यासह अकोले, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदा, सोनई, नेवासा, राहुरी या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असते. याआधी अशा वाळू तस्करीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यातून मोठ-मोठे श्रीमंत वाळू तस्कर निर्माण झाले आहेत. यापूर्वीच्या आणि आत्ताच्या सरकारमधील सत्ताधाऱ्यांवर अशा वाळू तस्करांना पाठीशी घातल्याचे आणि छुपे राजकीय आशीर्वाद असल्याचे आरोप सातत्याने झाले आहेत. एकमेकांवर असे आरोप नेहमीच करण्यात राजकीय पुढारी पटाईत आहेत.

आता मात्र अशा विविध तालुक्यांमधून वाळू तस्करांवर जे काही गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच इतर कारणांनी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत आणि त्यामध्ये आरोपी म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी गुन्हेगार नोंदवले गेले आहेत. अशा आरोपींची म्हणजेच पदाधिकाऱ्यांची आणि महत्त्वाच्या कार्यकर्त्यांची फिर्यादी मधून अथवा त्या संपूर्ण गुन्ह्यामधून नावे वगळली जावीत असा प्रयत्न सुरू असून तसा दबाव संबंधितांवर आणला जात आहे. विशेष म्हणजे असे आरोपी असणारे पदाधिकारी शासनाने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमातून खासदार आणि मंत्र्यांबरोबर मिरवत आहेत. शासनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या कार्यक्रम पत्रिकांमध्ये देखील थेट अशा विविध गुन्ह्यतील आरोपींना स्थान मिळाले आहे.

पोलिसांच्या विविध पथकाकडून होणाऱ्या कारवाई मधून आणि छापीमारीतून जे काही गुन्हे दाखल झाले आहेत आणि ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी या संदर्भात फिर्याद नोंदवली आहे अशा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना गुन्ह्यातून नाव वगळावे असे सुचविले जात असल्याची माहिती समजली आहे. काही ग्रामीण आणि शहर पोलीस ठाण्यांमध्ये तसेच गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत दबक्या आवाजात चर्चा असल्याचेही बोलले जात आहे. असे प्रकार वाढू लागले तर गुन्हेगारांवर कोणाचाही वचक राहणार नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

