घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध वेश्या व्यवसायाला पोलीसच जबाबदार !
वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्याने नाराजी…
प्रतिनिधी —
पठार भागातील वेश्याव्यवसाय आणि अवैध धंद्यांना घारगाव पोलीस जबाबदार असल्याचे उघड झाले असून केवळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळे घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे आणि अवैध कृत्ये वाढली असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे पंचक्रोशीसह गावाची बदनामी होत असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोखरी बाळेश्वर या गावाच्या शिवारात वेश्याव्यवसाय सुरू असताना पोलिसांनी छापा टाकून चार महिलांची सुटका केली. तर सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी वैशाली उत्तम फटांगरे हिला अटक करण्यात आली. त्याचबरोबर इतर आरोपींनाही अटक करण्यात येऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोकाळलेले अवैध व्यवसाय, मटका, जुगार ढाब्यांवरचे छुपे दारू अड्डे, वाळू तस्करी याने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. या सर्व अवैध गोष्टींना पोलीस जबाबदार आहेत. विशेष म्हणजे खुना सारख्या गंभीर गुन्ह्याच्या तपासाच्या बाबतही पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष खेडकर यांच्यावर विविध आरोप झाले असून संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यात नेमके काय काय चालते हा संशोधनाचा विषय झालेला आहे.

पोखरी बाळेश्वर येथे वेश्या व्यवसाय करणाऱ्या मुख्य आरोपी महिलेवर यापूर्वीही वेश्याव्यवसायाच्या संबंधाने गुन्हा दाखल झाला आहे. असे असताना पुन्हा या महिलेने त्याच ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू करण्याचे धाडस दाखवले. ते कोणाच्या जीवावर आणि पाठिंब्याने ? पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे किंवा पोलिसांकडून हप्ते खोरी मुळे छुप्या पद्धतीने अशा अवैध धंद्यांना पाठिंबा दिला जात असावा असा संशय सर्वसामान्य नागरिक व्यक्त करतात.

त्यामुळे असे अवैध धंदे पठार भागात सर्वत्र फोपावले आहेत. यापूर्वी कारवाई होऊनही जर अशा व्यवसायांना आळा बसत नसेल तर त्याची जबाबदारी संबंधित पोलीस ठाणे प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची का नसावी ? याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून उचित कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

