घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाचे कोडे अद्याप उघडले नाही !

मयताच्या बँक खात्यातील लाखो रुपये गायब झाल्याचा संशय

पोलीस निरीक्षक आणि तपासाबाबत उलट सुलट चर्चांना उधाण

प्रतिनिधी —

दहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका खुनाचे कोडे अद्याप उलगडले नाही. या खुनाच्या तपासाबाबत मात्र उलट सुलट चर्चा असून तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्यावर आणि तपासावर विविध आरोप झाल्याची चर्चा देखील ऐकण्यास मिळते. तसेच या प्रकरणात पोलिसांनी बऱ्याच जणांचे ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी टेस्ट केली असली तरी पोलिसांना त्यातून काहीही मिळालेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा नव्याने कसून तपास करण्यात यावा असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केळेवाडी, वडदरा (बोटा) या ठिकाणी एका वृद्ध व्यक्तीचा खून करण्यात आला. ही घटना एप्रिल 2023 मध्ये घडली आहे. सुरुवातीला बिबट्याच्या हल्ल्याने सदर व्यक्तीच्या मृत्यू झाला असावा अशी अफवा उठवण्यात आली होती. अकस्मात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर मात्र तो खून असल्याचे उघड झाले होते त्यामुळे घारगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

या घटनेत वडदरा (बोटा) येथे राहणारे उत्तम बाळाजी कुऱ्हाडे (वय 63) यांची त्यांच्या राहत्या घराच्या पडवीत धारदार हत्याराने छातीवर व पाठीवर गंभीर वार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे स्वतः करत आहेत.

दरम्यान या प्रकरणी तपास करताना जवळजवळ चार ते पाच व्यक्तींची ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली. मात्र या टेस्ट मधून सुद्धा काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे नेमका आरोपी कोण हे अद्याप पर्यंत पोलिसांना कळलेले नाही. मात्र या तपासात पोलीस खरे आरोपी सोडून इतरांनाच त्रास देत असल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.

ज्या नातेवाईकांची ब्रेन मॅपिंग, पॉलीग्राफी टेस्ट करण्यात आली त्यांनी याबाबत पोलिसांना दोषी धरले आहे. विनाकारण आम्हाला त्रास दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान याच काळात मयत व्यक्तीच्या बँक खात्यावरून लाखो रुपये काढण्यात आले असल्याचे माहिती उघड झाली. हे लाखो रुपये काढून पोलिसांना देण्यात आल्याचे देखील चर्चा सुरू झाली. तशा आशयाच्या बातम्या वृत्तपत्रातून आल्या आहेत. याबाबत पोलिसांनी कुठलाही खुलासा अधिकृत रित्या केलेला नाही. त्यामुळे हा संपूर्ण तपास संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. याची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा कसून तपास करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती समजली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!