वकील आढाव दांपत्याच्या खून प्रकरणी संगमनेर वकील संघाचा पाच दिवस काम न करण्याचा निर्णय !
9 फेब्रुवारी पर्यंत दुखवटा पाळणार ; घटनेचा तीव्र निषेध

बार कौन्सिल करते काय ?
-
वकील दांपत्याच्या हत्ये नंतर राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. आक्रमक भूमिका घेत वकील संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध करीत विविध प्रकारे आंदोलन केले. न्यायालयीन कामकाज करत असताना अशा प्रकारच्या घटना घडत राहिल्या तर वकिलांच्या जीविताचे संरक्षण कोण करणार असा सवाल उपस्थित झाला असून वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत आणि त्यांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाबाबत आणि इथून मागे घडलेल्या घटनांबाबत बार कौन्सिल नेमकी काय भूमिका घेते ? वकिलांसाठी बार कौन्सिल नेमके काय करते आणि या प्रकरणी काय भूमिका घेतली असे सवाल संगमनेर वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड. सुहास आहेर यांनी केले आहेत. बार कौन्सिलने अशा घटनांबाबत काहीतरी ठोस आणि निर्णायक भूमिका घ्यावी असे मत काही वकिलांनी व्यक्त केले.
प्रतिनिधी —
राहुरी येथील वकील राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी वकील मनीषा आढाव या दांपत्याचा खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आला होता. याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. अहमदनगर जिल्ह्यात देखील वकिलांनी आक्रमक होत या घटनेचा तीव्र निषेध करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा करण्यात यावा असाही आग्रह वकील संघटनांनी धरला आहे.

आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी संगमनेर तालुका बार असोसिएशनची बैठक होऊन या बैठकीत वकील सदस्यांनी वरील घटनेचा तीव्र निषेध करीत पाच दिवस दुखवटा पाळण्याचे जाहीर केले. तसेच या पाच दिवसात न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. तसा ठराव संगमनेर वकील संघाच्या सर्व सदस्यांनी सर्वानुमते मंजूर केला आहे.

आढाव दांपत्य हे संगमनेर न्यायालयात देखील कामकाज करीत असल्याने त्यांच्याबद्दल संगमनेर वकील संघातील सदस्यांचे मैत्रीपूर्ण व चांगले संबंध होते. त्यामुळे या घटनेचा निषेध करताना अनेक वकील भावनावश झाले होते. असे प्रकार घडू लागले तर वकिलांनी काम कसे करायचे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील वकिलांनी विविध प्रकारे आंदोलन करीत निषेध नोंदवला आहे.

तसेच मयत आढाव दांपत्यांचा एकुलता एक मुलगा त्यांच्या पश्चात आहे. त्यामुळे त्या मुलास आधार देणे देखील महत्त्वाचे असून इतर सोपस्कार पार पाडण्याकरिता जिल्ह्यातील सर्व वकील संघटना व सदस्यांनी दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला व आढाव कुटुंबासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.
दरम्यान संगमनेर येथे वकील संघाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात आणि उपोषणात माजी महसूल मंत्री व माजी वकील आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन आढाव दांपत्याच्या हत्येचा निषेध करून दुःख व्यक्त केले आहे. तसेच वकील संघाच्या आणि वकील संघटनांच्या निर्णयाबाबत आपण त्यांच्या पाठीशी आहोत असे देखील त्यांनी जाहीर केले आहे.

संगमनेर वकील संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या ठरावाची प्रत प्रसिद्धीसाठी देण्यात आली असून या ठरावाचे सुचक ॲड. जनार्दन वाळुंज हे असून त्यास अनुमोदन ॲड. विजय खताळ यांनी दिले आहे. हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
