म्हाळूंगी नदीवरील नवीन पुलाचे काम सुरू करण्यास होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ संगमनेरात साखळी उपोषण !
पूलाच्या बांधकामावरून भाजपच्या दोन गटात सुरू झाले राजकारण
दरम्यान राजकारणाच्या आरोप प्रत्यारोपात अडकलेल्या या पुलाच्या बांधकामा संबंधी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा शहरात सुरू आहेत. स्थानिक भाजपच्या दोन गटांमध्ये याबाबत छुपे शीत युद्ध सुरू असल्याचे बोलले जात असून एका गटाने कसल्या तरी तांत्रिक बाबींचा आधार घेत या पुलाचे काम या तांत्रिक बाबी पूर्ण केल्याशिवाय सुरू करू नये असा पवित्रा घेतला आहे. यामध्ये शहर भाजपाचे पदाधिकारी सहभागी नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भाजपचा एक गट पूल पूर्ण करण्यासाठी तर दुसऱ्या गटाकडून पुलाच्या बाबत तांत्रिक प्रश्न उपस्थित करून या कामात खोडा घालत असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिनिधी —
संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर दरम्यान असणेरा म्हाळुंगी नदीवरील पूल तुटल्यानंतर सुमारे दीड वर्ष होत आले तरी हा पूल अद्याप पर्यंत नव्याने बांधण्यात आलेला नाही सदर कामाच्या निवेद्य निघूनही या पुलाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यास दिरंगाई करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संगमनेर शहरातील माळुंगे पूल बनाव कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे या संदर्भात नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 पासून स्वामी समर्थ मंदिरासमोर या साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे.

नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, म्हाळुंगी नदीवरील पुल तुटुन जवळपास १५ महिने उलटून गेले आहेत. सदरील कामाच्या निविदा प्रक्रिया पुर्ण होऊनही साधारण १५ दिवस उशिराने प्रशासनाकडून कामाचा आदेश काढण्यात आला. सदर आदेश प्रत्यक्षात दि. ३० जानेवारी २०२४ रोजी निविदा प्राप्त ठेकेदाराला देण्यात आला.

तसेच मागील उपोषणावेळी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या संदर्भीय पत्रानुसार शालेय विदयार्थ्यांची, स्थानिक नागरीकांची गैरसोय होणार नाही या अनुषंगाने कामास दिरंगाई होऊन देणार नाही, असे लेखी स्वरुपात स्पष्ट करण्यात आले होते.
परंतु नवीन पुलाच्या कामाची निविदा दि.०५/१२/२०२३ रोजी प्रसिदध केली होती व सदर निविदा प्रक्रिया पुर्ण करुन दि. २५/०१/२०२४ रोजी कार्यारंभ आदेश काढण्यात आला.

जोपर्यंत सध्या जुन्या पुलावर असलेल्या जलवाहिन्या (पाईपलाईन) स्थालांतरीत करीत नाहीत तोपर्यंत तुटलेला पुल संपूर्ण जमीनदोस्त करुन नवीन पुल उभारणीचे काम सुरु करणे अशक्य असल्याची माहिती असूनही सदर जलवाहिन्या (पाईपलाईन) स्थलांतरण कामाची निविदा उशिरा प्रसिदध करण्यात आली. या दोन्ही निविदा प्रकरणात वाया गेलेला १ महिना १४ दिवसांचा कालावधी व प्रत्यक्षात जलवाहिन्या (पाईपलाईन) स्थलांतरण कामाची निविदा प्रक्रिया पुर्ण करुन कार्यारंभ आदेश मिळेपर्यंत लागणारा अवधी लक्षात घेता प्रशासनाकडून होणारी अथवा जाणीवपुर्वक केली जाणारी चालढकल व दिरंगाई स्पष्टपणे दिसून येते व संशयास पात्र ठरते.

म्हणून पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ म्हांळुगी पुल बनाव कृती समितीच्या वतीने 2 फेब्रुवारी 2024 पासून (सकाळी ११.००वा.) स्वामी समर्थ मंदिराजवळ साखळी उपोषणास सुरुवात करण्यात येणार आहे.
काम सुरु करण्यापुर्वी पर्यायी मार्ग व्यवस्था म्हणून छोटा पुल बांधून प्रत्यक्ष वाहतुकीस खुला होत नाही व जलवाहिन्या (पाईपलाईन) स्थलांतरणाचे काम प्रत्यक्षात सुरु होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरु राहील. सदर उपोषणादरम्यान यदाकदाचित कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अमोल डुकरे, अमित देव्हारे, किरण पाटणकर, अनुप म्हाळस, संकेत पाटणकर आदींच्या सह्या आहेत.

