संगमनेर शहर व तालुक्यात चोऱ्या आणि घरफोड्या सुरूच !
पोलीस दल हतबल…
प्रतिनिधी —
संगमनेर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. या गुन्हेगारीवर पोलिसांना कुठलाही अंकुश बसवता आलेला नाही. चोरट्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात धुमाकूळ घातला असूनही पोलिस आणि वरिष्ठांकडून त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. चोऱ्या आणि घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासात देखील म्हणावी तशी प्रगती नाही. तालुक्यात चार ठिकाणी पोलीस स्टेशन असून देखील त्याचा काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. संगमनेर शहर बस स्थानक तर चोरट्यांसाठी सोन्याचा खजिना लुटण्याचे प्रमुख केंद्र झाले आहे.

संगमनेर शहर आणि तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी, घरफोड्या झाल्या असून यामध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रकमेची चोरी झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील पळसखेडे या गावांमध्ये घरफोडी झाली असून चोरट्यांनी ३ लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, नेकलेस लॉकेट, अंगठ्या, झुबे व रोख रक्कम चोरून नेली आहे.

अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले वरील वर्णनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. यासंदर्भात श्रीकांत बाबाजी कांडेकर (राहणार पळसखेडे, तालुका संगमनेर) यांनी फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे ही घरफोडी दिवसा झाली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार एम. आर. सहाणे हे करीत आहेत.

तर संगमनेर शहरात पुन्हा चोरी झाली असून यामध्ये ८० हजार रुपये किमतीचे सव्वा दोन तोळ्याचे सोन्याचे नेकलेस पेंडलसह चोरी करण्यात आले आहे. ही चोरी संगमनेर बस स्थानकावर झाली आहे. बस स्थानकावर होणाऱ्या चोऱ्या या चोरट्यांसाठी सुगीचा काळ ठरला आहेत. रामनाथ किसन ढोले (ढोले वस्ती, तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्यादा दिली असून यातील फिर्यादी यांची मुलगी वर्षा गणेश पठारे ही संगमनेर बस स्टॅन्ड येथे नाशिक बस मध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने वरील वर्णनाचे व किमतीचे तिच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे नेकलेस चोरून नेले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी नेहमीप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

एकंदरीत पाहता संगमनेर शहर आणि ग्रामीण भागात चोऱ्या, घरफोडीचे सातत्य सुरूच आहे. घारगाव आणि आश्वी परिसरात देखील चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने दिसून येत आहे. पोलिसांनी यावर कुठलाही योग्य आणि खात्रीशीर उपाय शोधलेला नसून गुन्हा दाखल करून फक्त गुन्ह्यांची नोंद करणे व परिस्थिती जैसे थे ठेवणे एवढा एकच उद्योग पोलीस ठाण्यांमधून सुरू आहे. पोलीस नेमकं करतात काय हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

