संगमनेर तुरुंगातून पळून जाणाऱ्या आरोपींना सहकार्य करणाऱ्यांचा शोध सुरू !

चार आरोपींसह दोन साथीदार पकडले ; एक जण संगमनेरचा…

प्रतिनिधी —

संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या तुरुंगातून गज कापून पळून गेलेले चार आरोपीना नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पकडले. या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणारे त्यांच्या दोन साथीदारांना देखील पोलिसांनी अटक केली आहे. पकडलेल्यांपैकी आरोपींना मदत करणारा एक जण संगमनेर मधला असून इतरांचा शोध सुरू आहे.

आरोपींनी तुरुंगाचे गज कापण्यासाठी हेक्सा ब्लेड चा वापर केला होता. साधारण एक महिना गज कापत होते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली असून तुरुंगाचे तीन गज कापण्यात आले आहेत.

आरोपींनी तुरुंगातून पलायन केल्यानंतर त्यांना पांढऱ्या रंगाच्या कारमधून सोडणारा कारचालक पुन्हा गाडी घेऊन परतत असताना त्याला पोलिसांच्या पथकाने पकडले आणि त्याच्याकडे चौकशी केली असता सदर आरोपी धुळे तालुक्यात असल्याचे त्यांनी सांगितले आणि तेथून ते नेपाळला जाणार आहेत अशी माहिती दिली.

पळून गेलेले आरोपी आणि त्यांना मदत करणारा संगमनेर येथील अल्ताफ असिफ शेख (रा. कुरण तालुका संगमनेर) हे धुळे येथे शांतीसागर हॉटेल येथे गाडी नादुरुस्त झाल्याने थांबले. त्यानंतर हे सर्व रस्त्यावर जाणाऱ्या एका प्रवासी वाहनातून जळगावकडे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे पथकाने शांतीसागर हॉटेल तसेच आजूबाजूच्या हॉटेल दुकानदार यांच्याकडे आरोपींचे फोटो दाखवून विचारपूस केली असता एका चहाच्या टपरी चालकाने आरोपीचे फोटो ओळखून टपरी चालकाने त्यांना दोन हजार रुपये रोख दिल्याची माहिती दिली. त्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून आरोपी ज्या शेतामध्ये थांबले होते त्या शेतात एका ओढ्यामध्ये आंघोळ करत असताना सर्वांना पथकाने ताब्यात घेतले.

पळून गेलेल्या चार आरोपींसह संगमनेर मधील अल्ताफ असिफ शेख आणि मोहनलाल नेताजी भाटी (रा. वडगाव शेरी, जिल्हा पुणे) या दोघांनाही आरोपी करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

आरोपींना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू…

तुरुंगाचे गज कापून पळून जाणाऱ्या या आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणारे, तसेच हत्यारे पुरवणारे व आरोपींना आश्रय देणाऱ्या इतर इसमांचा शोध घेऊन त्यांना लवकरच पकडण्यात येणार आहे. संगमनेरच्या या तुरुंगात आरोपींचे अनेक उद्योग सुरू होते. मोबाईल फोन, बिडी काडी, जेवणाचे डबे अशा अनेक सुविधा उपलब्ध होत होत्या. या सुविधा पुरवताना त्यांना कोण कोण मदत करत होते व  गार्डवर असणारे पोलीसही त्यांना कसे दुर्लक्षित करीत होते याचाही यामध्ये शोध घेतला जाणार असल्याचे माहिती समजली आहे.

संगमनेर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी दुय्यम कारागृह येथून पलायन केलेल्या आरोपी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा आयपीसी कलम २२४ खाली दाखल करण्यात आलेला होता. काल रात्री उशिरा या गुन्ह्यामध्ये भादवि कलम ३०७, १२० ब ची वाढ करण्यात आलेली आहे.

तसेच या गुन्ह्यात मुख्य चार आरोपी अटक करण्यात आलेले असून या आरोपींना मदत करणारे आणखी दोन आरोपी देखील आज पहाटे अटक करण्यात आलेली आहे. सर्व सहा ही अटक आरोपींना आज रोजी कोर्टापुढे हजर करण्यात येऊन पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे व गुन्ह्याचा पुढील तपास करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!