तुरुंग फोडून संगमनेरातून चार आरोपींचे पलायन !
पोलिसांच्या बंदोबस्ताचे निघाले ‘दिवाळे’….
जेलर आणि तुरुंग अधीक्षकही तितकेच जबाबदार
प्रतिनिधी —
ऐन दिवाळीच्या तोंडावर संगमनेर शहरातील पोलीस ठाण्याच्या कक्षेत असणाऱ्या तुरुंगातून चार आरोपींनी आज पहाटे तुरुंग तोडून पलायन केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारभाराचे दिवाळे निघाले असून या तुरुंगा विषयी पोलिसांच्या कामचुकारपणाचे पितळ उघड पडले आहे.

संगमनेच्या कारागृह सध्या आरोपींची गर्दी आहे. कोपरगाव तुरुंगातील आरोपी या ठिकाणी शिफ्ट केल्याने आरोपींची संख्या वाढली आहे. रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. आरोपींनी तुरुंगाचे गज कापून पहाटेच्या दरम्यान तुरुंगातून पलायन केले आहे.

खून प्रकरणातील आरोपी राहुल देवीदास काळे, खुनाचा प्रयत्न गुन्ह्यातील मच्छिंद्र मनाजी जाधव, बलात्कार प्रकरणातील अनिल छबू ढोले व रमेश रोशन दधेल (थापा) अशी पळून जाणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पळून गेलेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत होते. या चौघांनीही हेक्सा ब्लेडचा वापर करुन तीन नंबरच्या तुरुंग खोलीचे गज कापले व ठरल्याप्रमाणे शहर पोलीस स्टेशन बाहेर त्यांना नेण्यासाठी आलेल्या एका कार मध्ये बसून पसार झाले.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या अखत्यारीत असणाऱ्या या तुरुंगाबाबत नेहमीच विविध घटना जनतेसमोर येत होत्या. तुरुंगातील आरोपींवर कुठलाही अंकुश पोलिसांकडून नसल्याचे वेळोवेळी उघड झाले होते. यामध्ये आरोपींनी अगदी वाढदिवस साजरा करणे, दादागिरी करणे, नवीन आलेल्या आरोपींना मारहाण, करणे तसेच सर्व सोयी सुविधा चहा, बिडी, सिगरेट, मोबाईल मिळवणे असे प्रकार घडत होते आणि ते उघडकीसही आले होते.

त्याच्या बातम्या वृत्तपत्रातून वेळोवेळी प्रसिद्धही झाल्या होत्या. त्यामुळे तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी असल्याचेच दिसून येत होते. तरीही त्यातून पोलिस, जेलर व तुरुंग अधिक्षकांनी कुठलाही धडा न घेता त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे.

तहसीलदार हे तुरुंगाचे अधीक्षक असतात. तसेच शहर पोलीस ठाण्यातून व उपविभागातील इतर पोलीस ठाण्यांकडून या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांची नियुक्ती केली जाते. मात्र तेवढे असूनही आरोपींनी तुरुंग तोडून पलायन करण्याची घटना पोलीस अधिकारी, सुरक्षा आणि तुरुंग अधीक्षक यांच्या निष्काळजीपणाचा नमुना ठरला आहे. या आधी सुद्धा पलायनाच्या घटना घडल्या आहेत.

