‘आधार’चे कार्य देवदूतासमान — सोमनाथ वाघचौरे 

प्रतिनिधी —

दिवाळीचा उत्सव म्हणजे सर्वत्र रंगीबेरंगी रांगोळी, आकाश कंदील आणि प्रकाशाची उधळण असते. कुठे फटाके तर कुठे खरेदीची घाई असते. परंतु दुसरीकडे अशी मुले असतात ज्यांच्या माता-पित्यांची छत्र हरपलेले असते. शिकण्यासाठी आधार नसतो आणि अडचणींचा डोंगर निराधार मुलांच्या आयुष्यात सतत उभा असतो. अशा या गरजू होतकरू आणि आई-वडिलांचे छत्र नसलेल्या निराधार मुलांच्या आयुष्यात शिकण्याचे बळ निर्माण करण्याचे अत्यंत प्रेरणादायी काम आधार फाउंडेशन करत आहे. खरंतर आधारचे हे कार्य देवदूता समान आहे. असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस  अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.

आधार फौंडेशन संगमनेरच्या वतीने आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेतील पाल्य व पालक यांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते पणतीच्या आकारातील रांगोळीवर पणत्या पेटवून, दिवाळीच्या सुरेल गीताने आधार दीपोत्सवाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी राजेंद्र फरगडे हे होते. याप्रसंगी युवा उद्योजक सोनू राजपाल, कोमल राजपाल, सुभाष ताजणे, प्रा.चं.का. देशमुख , कार्तिक तांगडकर, सूर्यकांत घेगडमल, पी.आर.शिंदे, डी.डी.वाकचौरे आदीसह दत्तक पालक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

वाघचौरे म्हणाले की, समाजात अनेक गरजू घटक असतात, अनाथ मुलं असतात कुणाच्यातरी पाठीशी उभे राहून शिक्षणाची जिद्द निर्माण करणे, त्यांच्या पंखात ताकद निर्माण करणे हे एक सात्विक व पवित्र काम आहे. सेवाभावी संस्थेच्या या दिव्य कामातून माणूस घडतो. सामाजिक जीवन समृद्ध बनते. आधारची शैक्षणिक दत्तक पालक योजना ही नावीन्यपूर्ण व अत्यंत प्रेरणादायी आहे. म्हणून या योजनेत शैक्षणिक दत्तक पालक म्हणून अनेकांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी  केले. स्वतःही काही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दत्तक पालकत्व त्यांनी स्वीकारले.

युवकांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या त्रिसूत्रीचा जीवनात उपयोग करून नेहमी वाटचाल करावी, आधार आयडॉलप्रमाणे आपणही आयुष्यात स्वतःच्या पायावर उभं राहावं. असाही संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सुखदेव इल्हे यांनी केले.

“आधार आयडॉल” अमित कदम, रेश्मा मनसूख, गोदावरी घनवट, डॉ.उमेश कातोरे आदींशी मुक्त संवाद साधत त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांचे प्रसंग ऐकून विद्यार्थी व पालक भावुक झाले. बहुउद्देशीय “आधार भवन” प्रकल्पासाठी ज्येष्ठ पत्रकार किसन हासे यांनी अकरा हजार रुपयांची देणगी दिली.

अध्यक्षीय भाषणात राजेंद्र फरगडे यांनी विदयार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्वच दत्तक पाल्यांना नवीन कपडे भेट देण्यात आले. मिठाईचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डॉ. महादेव अरगडे, विठ्ठल कडुसकर, पी.डी.सोनवणे, लक्ष्मण कोते, तान्हाजी आंधळे, अनिल कडलग, अरविंद गाडेकर, देविदास गोरे, दीपक कर्पे, लक्ष्मण ढोले, त्र्यंबक शिंदे, शाम वाडेकर, मच्छिंद्र पावसे, धनराज चौधरी, निवृत्ती शिर्के, भानुदास झंझाड, संतोष शेळके आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पिंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सोमनाथ मदने यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!