भाजपचे कार्यकर्ते अमोल खताळ यांचा चिकणी ग्रामपंचायत तर्फे निषेध !

पालकमंत्र्यांचे समर्थक आणि स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते असल्याचा आरोप

यापुढे जशास तसे उत्तर — आनंद वर्पे

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्याच्या विकासात कोणतेही योगदान नसणारे व चिकणी गावाशी कोणताही संबंध नसताना पालकमंत्री समर्थक व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी गावात येऊन केलेली तोडफोड व दमदाटी खपवून घेणार नाही असे सांगत या विरोधात चिकणी ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामसभेत तीव्र निषेध नोंदविला आहे.

ही तोडफोड करण्याच्या संबंधाने महिनाभरापूर्वी पोलीस अधीक्षक नगर यांना कारवाई करण्याचे निवेदनही दिले आहे मात्र त्यावर अद्याप कुठलेही कारवाई झाली नसून सत्तेच्या गैरवापर करून अशी दमदाटी सहन करणार नाही असा इशारा तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी दिला आहे.

या सर्व प्रकरणाच्या संबंधाने यशोधन संपर्क कार्यालयातून एक प्रेस नोट देण्यात आली असून त्यात वरील माहिती देण्यात आली आहे. प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की,

चिकणी येथे झालेल्या ग्रामसभेत एक मताने याबाबत निषेधाचा ठराव करण्यात आला. यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, भारत वर्पे, चंद्रभान मुटकुळे, राजेंद्र वर्पे, दत्तू वर्पे, संतोष घुले, दत्तात्रय मुटकुळे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आनंद वर्पे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांसाठी आमदार थोरात यांनीच निधी मंजूर केला आहे. ही कामे सुरू असताना पालकमंत्री समर्थक अमोल खताळ हे गावाशी कोणताही संबंध नसताना किंवा पंचायत समिती व इतर विभागाकडे कोणतीही तक्रार नसताना. गावात येऊन कोणत्याही स्थानिक पदाधिकाऱ्याला कोणतीही माहिती न देता विश्वासात न घेता कामात हस्तक्षेप व दमदाटी करत आहेत. याचबरोबर त्यांनी स्मशानभूमी कामात  तोडफोड केली आहे. हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे. या गावच्या विकासासाठी चिकणी ग्रामस्थांनी रक्त सांडले आहे. बाहेरून येऊन येथे हस्तक्षेप चालणार नाही. माहिती अधिकाराच्या नावाखाली सुरू असली दमदाटी संगमनेर तालुका सहन करणार नसून असे विकास कामे सुरू असताना अडथळे आणण्याचा प्रकार केल्यास आगामी काळात जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तर विलास वर्पे म्हणाले की, काही विघ्न संतोषी मंडळी तालुक्याच्या विकासात खोडा घालू पाहत आहेत. या लोकांना नागरिकांनी ओळखले आहेत ज्यांनी आयुष्यात कधीही सामाजिक काम केले नाही. ते चंगली कामे थांबवण्याचे काम करत आहेत. यामागे तुम्ही गावात कधी आला नाही. विकासासाठी तुम्ही काही केले नाही. तुमचा संबंध काय ? असे सांगताना ही दादागिरी थांबली पाहिजे. अन्यथा होणाऱ्या घटनेला प्रशासन व सत्ताधारी भाजपा जबाबदार राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी भारत वर्पे, चंद्रभान मुटकुळे संतोष घुले आदींनीही मनोगत व्यक्त केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!