निळवंडेच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही — आमदार थोरात

प्रतिनिधी —

निळवंडे पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन मा महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.काही महिने अडचणीचा काळ असला तरी आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचेही ते म्हणाले.

देवकौठे येथे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित सोसायटीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे आदींसह तळेगाव भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

नवरात्र उत्सवानिमित्त सर्वत्र झालेली आकर्षक रोषनाई, सुवासिनींकडून औक्षण, फटाक्यांची आतिषबाजी, पारंपारिक वाद्य, लेझीम पथक, भव्य दिव्य मिरवणूक आणि अलोट गर्दीत जेसीबीतून फुलांची उधळण करत देवकौठे ग्रामस्थांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभूतपूर्व स्वागत केले.

थोरात म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करून आपण दुष्काळी भागातील जनतेसाठी निळवंडे धरण पूर्ण केले आहे. आपल्याच कार्यकाळात कालव्यांची कामे पूर्ण झाली असून फक्त पाणी सोडणे बाकी होते. परंतु श्रेयासाठी पाणी उशिरा सोडले गेले. जीवनात निळवंडे धरण व कालवे पूर्ण झाल्याचा आनंद असून हे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाईल तो आपला आनंदाचा दिवस असेल. सध्या निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे.

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून प्रत्येक गावच्या वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुक्यातील रस्त्यांच्या ७७ कोटींच्या निधीला स्थगिती दिली होती. सुप्रीम कोर्टात जाऊन ती स्थगिती उठवली आहे. येत्या काळात रस्त्यांची कामे ही पूर्ण होतील. आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही. चांगले काम करणे ही आपली परंपरा आहे. काही महिने अडचणीचा काळ असला तरी आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर एकनाथ मुंगसे यांनी आभार मानले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!