नगरपालिकेच्या घरपट्टी वाढीला काँग्रेसचा विरोध म्हणजे ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ — माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार
प्रतिनिधी —
संगमनेर नगर परिषदेने दहा टक्के घरपट्टी वाढ प्रस्तावित केली आहे. या घरपट्टी वाढीला शहरातील सर्व स्तरातून प्रचंड विरोध होत आहे. शहरातील नागरिकांबरोबरच भारतीय जनता पार्टीने देखील या जुलमी घरपट्टी वाढीला विरोध केला आहे. यानंतर जागे झालेल्या सत्ताधारी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत घरपट्टी वाढीला विरोध केला असल्याचे नाटक करणे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेवर आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांची एक हाती सत्ता आहे. या सत्तेच्या काळात देखील घरपट्टी वाढवून नागरिकांवर करांचा बोजा टाकलेला आहे.

संगमनेर नगरपलिकेत दर चार वर्षाने मालमत्तेचे ( घरपट्टी) रिव्हिजन होते. रिव्हिजनचा अर्थ असा होतो कि, नगरपलिका हद्दीतील जी मालमत्ता आहे त्यात काही बदल झाल्यास (नवीन इमारती, जुन्या इमारतीच्या जागेवर नवीन इमारत, जागेत बदल झाल्यास) त्याचे फेर मूल्यांकन केले जाते.

परंतू संगमनेर नगरपलिकेत एकहाती सत्ता असल्याने सत्ताधाऱ्यांनी सर्व कायदे धाब्यावर बसवून घरपट्टीवाढ केलेली आहे. कायदा असे सांगतो की, घरपट्टी वाढवण्याचे किंवा कमी करण्याचा अधिकार जनरल कॉन्सिलला आहे. पण या ठिकाणी दर चार वर्षानी घरपट्टीची रिव्हिजन करतांना वाढ करतात. यात कायद्याचा कोठेही संबंध नाही.
दुर्गाताई तांबे नगराध्यक्ष असतांना सन २०१८ साली १० टक्के घरपट्टीत वाढ करण्यात आली आहे. सातत्याने ३० वर्षात शहरातील घरपट्टीत वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त घरपट्टी घेणारी संगमनेर नगरपालिका आहे. माझ्याकडे सर्व मिटींगाचे ठराव आहेत. त्यात कोणत्याही नगरसेवकांने विरोध केलेला नाही.

भारतीय जनता पार्टीचे शहरअध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आल्यानंतर लगेच कांग्रेस वाल्यांनी नगरपालिकेला निवेदन दिले. तुमची एकहाती सत्ता असताना एकदाही घरपट्टीला विरोध का केला नाही ? आता तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार आहे का ? असे सवाल करीत हा तर ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असल्याचा प्रकार असल्याचा आरोपही जहागीरदार यांनी केला.

सन २०१८ ला घरपट्टी वाढविली असतांना मी हाय कोर्टत गेलो. तेथे संगमनेर सत्ताधारी काँग्रेस पक्षाने माझे वकील फोडले. नंतर संगमनेर कोर्टात दाखल करण्यासाठी स्थानिक वकील सुध्दा फोडले आणि आज हेच लोक घरपट्टी कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कॉपी करत आंदोलने करित आहेत.

स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्या वरच्या खोटा बुरखा फाडावाच लागेल. जो पर्यंत त्यांच्याकडे सत्ता राहिल तो पर्यंत मनमानी चालणार. जनतेला विनंती आहे की, घरपट्टी वाढीला विरोध करा असे आवाहनही जावेद जाहागीरदार यांनी केले आहे.

