‘हॅप्पी संगमनेर’ पहावत नसल्याने आनंद सोहळ्यात देखील विनाकारण राजकारण केले जाते — 

संगमनेरच्या विरोधकांना आमदार बाळासाहेब थोरात यांचा टोला

प्रतिनिधी —

“हॅप्पी हायवे” या आनंदमय सोहळ्यासाठी सर्वांना निमंत्रित केले होते. राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी या आनंदाच्या क्षणी एकत्र यावे अशी अपेक्षा होती. असे असताना काही लोकांनी यामध्ये विनाकारण राजकारण केले. संगमनेरचा आनंद काही लोकांना पहावत नाही. हा कार्यक्रम होऊ नये यासाठी अनेक अडचणी निर्माण करण्यात आल्या. तालुक्यात अनेक ठिकाणी फोनाफोनी झाली. मात्र हा संगमनेर तालुका आहे. एक परिवार आहे. ज्या-ज्या वेळेस संगमनेरच्या विकासात अडचणी निर्माण करण्याच्या प्रयत्न झाला. त्या-त्या वेळी तालुका एकवटला आहे. संततधार पाऊस सुरू असतानाही हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी संगमनेरचे हजारो नागरिक एकत्र आले आहेत हे राजकारण करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या या हॅप्पी हायवेचे लोकार्पण गणेश नगर येथे थोरात यांच्या हस्ते स्ट्रीट लाईट सुरु करून करण्यात आले. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे,  मनीष मालपाणी यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी व हजारो नागरिकांच्या उपस्थितीत होते. त्यावेळी आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते.

 

इंजिनिअरिंग कॉलेज ते बसस्थानक हा हायवे संगमनेरच्या वैभवात भर टाकणारा असून या कामी आपण महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून ४० कोटी निधी मिळवला. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी असलेल्या स्नेहातून २५ कोटी रुपये निधी मिळवला. मात्र काहींना हे संबंध आणि विकास कामे पहावत नाहीत. असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

संगमनेर शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे नाशिक महामार्गाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलेले आहे. इंजिनिअरिंग कॉलेज ते बस स्थानक इथपर्यंत या रस्त्याचे सुशोभीकरण काम पूर्ण झाले आहे. या कामासाठी तत्कालीन आघाडी सरकारने निधी दिला होता. तसेच विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा निधी दिला आहे.

या रस्त्याचे लोकार्पण आणि विद्युतीकरणाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला त्यासाठी आमदार थोरात यांच्यात संकल्पनेतून ‘हॅप्पी हायवे’ ही संकल्पना राबवत या रस्त्यावर आनंद सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा आधी संगमनेर शहर भाजपने बस स्थानक समोर हायवेवरील पथदिवे सुरू करण्याचा कार्यक्रम केला. व आंदोलन केले होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!