संगमनेर शहर व परिसरातील भंगार गोडाऊन व दुकानांची एकाच वेळी तपासणी !

संशयास्पद वस्तूंचे पंचनामे ; बेकायदेशीर कृत्य आढळल्यास कायदेशीर कारवाई होणार…

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांचा इशारा

प्रतिनिधी —

संगमनेर पोलीस विभागातील उपविभागातील भंगार साहित्य विकत घेणाऱ्या सर्व दुकानांची पोलीस पथकांकडून एकाच वेळी तपासणी करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर तालुका, घारगाव,अकोले, आश्वी, संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटर सायकल चोरी त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची शेती अवजारे शेतीपंप, केबल चोरी, बॅटरी चोरी यासारख्या चोऱ्यांचे तक्रारी प्राप्त होत आहे त्याशिवाय चोरट्यांकडून असे चोरी केलेले साहित्य हे संगणमेर शहर व परिसरातील विविध भंगार दुकानांमध्ये अत्यल्प किमतीमध्ये घेतले जात आहे अशी माहिती प्राप्त झाली होती.

गेल्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्याचे स्प्रिंकलर पाईप, ठिबक सिंचन पाईप तसेच सबमर्सिबल पंप चोरी झाल्या बाबतचे काही गुन्हे देखील विविध पोलीस स्टेशनला दाखल आहे.

या पार्श्वभूमीवर आज रोजी संगमनेर शहर व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील १४ भंगार दुकानांवर भंगार गोडाऊन वर एकाच वेळी १४ टीम पाठवून सदर ठिकाणी संशयास्पद दुचाकी, चार चाकी गाड्या त्याचप्रमाणे या गाड्यांचे पार्ट अर्थात इंजिन, चेसिस इत्यादी मिळून येतात किंवा काय तसेच विविध शेती अवजारे, सबमर्सिबल पंप, पाईप, लोखंड, सेंट्रींग कामाचे स्टील अशा वस्तू मिळून येतात काय याची तपासणी आज रोजी दुपारी बारा ते चार या दरम्यान करण्यात आली.

तपासणी करण्यात आलेल्या १४ भंगार गोडाऊन दुकानांमध्ये मिळून आलेल्या संशयास्पद वस्तूंचे सविस्तर पंचनामे करण्यात आलेले असून त्यामध्ये मिळून आलेल्या वस्तूंबाबत संबंधित भंगार दुकानाचे चालक मालक यांना लेखी विचारणा करण्यात येणार असून त्यांचे खुलासे समाधानकारक प्राप्त न झाल्यास त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

भंगार गोडाऊन वाल्यांनी चोरीचा मुद्देमाल विकत घेतल्यास भारतीय दंड विधान कलम 411, 413,414 खाली यापुढे त्यांना आरोपी करण्यात येईल. त्यामुळे सर्व भंगार दुकानदारांना निर्देश देण्यात येत आहे की त्यांनी भंगार म्हणून कोणतीही वस्तू व मुद्देमाल विकत घेत असताना विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीची खातर जमा करावी तसेच तो मुद्देमाल त्याच्याच मालकीचा आहे त्याची खातरजमा केल्यानंतरच भंगार म्हणून खरेदी करावी. तसेच मुद्देमाल ज्या व्यक्तीकडून घेतली असेल त्याची व घेतलेल्या मुद्देमालाची नोंद ही विहीत रजिस्टर मध्ये घेण्यात यावी.

सदरच्या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे संगमनेर शहर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह संगमनेर शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन येथील कर्मचारी यांचा सहभाग होता.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!