निवडणुकीच्या वेळी काहीही करा पण….
नामदार छगन भुजबळ यांचे खास आवाहन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
सरकारच्या माध्यमातून अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत. यात ५० हजार रुपये जमीन खरेदी योजनेतून देणार आहेत. या योजनेचा लाभ घ्या, अनेक योजना अजित पवार तिथल्या तिथे पार पाडत आहेत. निवडणुकीवेळी काहीही करा, मात्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले. ते नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

अजित दादांनी कबूल केलेले पैसे मिळणार असून वेगवगेळे अभ्यासक्रम महाविद्यालयांत शिकवले गेले पाहिजते. त्यासाठी मुलांना वेगवेगळ्या फॅकल्टीमधून शिकू दिले पाहिजे. जे शिक्षण घेता येईल ते घेऊ दिले पाहिजे. अलीकडे सोशल मीडियाचा वापर वाढत चालला असून सोशल मीडियाचा अतिरेक बरा नाही. कारण आजकाल सोशल मीडियातील सर्व गोष्टी खऱ्या नाहीत. अनेकदा त्यातून फसवणूक देखील होते. शाळेत देखील याबाबत जनजागृती होणे आवश्यक असून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व आहे.

सिंगापूरमध्ये प्राईम मिनिस्टर नंतर दोन नंबरचा मंत्री शिक्षण मंत्री असतो, असेही भुजबळांनी सांगितले. शाळेच्या आठवणी ताज्या करताना भुजबळ म्हणाले की, आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची परेड पाहून आनंद वाटला. मी पहिल्यांदा म्युनिसिपल शाळेत शिकलो. त्यावेळी मला एका महिला शिक्षिकेने शिकवलं, तसेच मी नेवल NCC मध्ये प्रमुख कॅडेट होतो. आजचा कार्यक्रम, विद्यार्थ्यांची तयारी पाहून पुन्हा लहान व्हावं वाटलं. एकीकडे हा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे राज्यातीलच नव्हे देशातील उद्योग क्षेत्रातील महत्वाचे नाव असलेल्या रतन टाटा यांचा उद्योग रत्न म्हणून सन्मान करण्यात आला. भुजबळ यांनी टाटा ग्रुपचे कौतुक केले.

संभाजी भिडेंचे खरे नाव मनोहर कुलकर्णी असून ब्राह्मण समाजात कोणीही शिवाजी, संभाजी नाव ठेवत नाही. त्यामुळे इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभ राहावं लागेल. ज्यांचे आपण फोटो लावतो, त्यांनी किती शाळा केल्या. त्यांनी सर्वांना का नाही शिकवलं, असा प्रश्न उपस्थित करत आपण आपले देव ओळखायला शिका, असा सल्ला भुजबळांनी दिला. बाबासाहेबांनी सांगितलं शिका आणि सत्तेत सामिल व्हा. बाबासाहेब सत्तेत सामिल झाले आणि आपल्याला संविधान मिळालं.

