मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक

प्रस्थापितांसमोर बंडखोरांचे मोठे आव्हान !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्राध्यापकांच्या सिनेट निवडणुकीत आता खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरवात झाली आहे. विविध संघटनांचे उमेदवार निश्चित झाले असून प्राध्यापक मंडळी जोमाने प्रचारात उतरल्याचे चित्र दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच ३-४ प्राध्यापक संघटना सहभागी झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत गेली अनेक वर्षे विद्यापीठात सातत्याने निवडून आलेल्या प्रस्थापित संघटनेसमोर बंडखोर उमेदवारांनी मोठे आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे.

सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.वाल्मिक गर्जे, रुईया महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विजय चव्हाण, आणि चेतना महाविद्यालयाच्या प्रा. अमृता देशमुख यांनी MUST( मस्ट) प्रणित ‘परिवर्तन पॅनल’ मध्ये प्रवेश करून जोरदार प्रचार सुरू केला आहे. डॉ. वाल्मिक गर्जे यांनी एक चित्रफीत जारी केली असून या चित्रफितीच्या माध्यमातून प्रस्थापित संघटनेबद्दल घणाघाती आरोप केले आहेत.

गेली अनेक वर्षे आपण या संघटनेत अत्यंत तळमळीने काम केले. प्राध्यापकांचे अनेक प्रश्न विद्यापीठात आणि शासनस्तरावर मांडले मात्र अत्यंत अपमानास्पद पद्धतीने आपल्याला संघटनेच्या कार्यकारी समितीमधून बाहेर काढण्यात आले. निवृत्त होऊन १०-१५ वर्षे होऊनही पदाच्या लालसेने काही ठराविक मंडळींनी संघटनेवर कब्जा मिळवला हे दुर्दैवी आहे. नव्या दमाच्या नेतृत्वाला संधी मिळू द्यायची नाही असे अत्यंत घातकी धोरण राबवल्याने संघटनेत हुकुमशाही निर्माण झाली. असे डॉ. वाल्मिक गर्जे यांनी या चित्रफितीत म्हटले आहे.

प्राध्यापक संघटनेचा सुवर्णकाळ पाहिलेल्या चळवळीची अशी दुर्दशा झाल्याचे आपणास दुःख झाले आहे. काही ठराविक लोकांच्या आडमुठेपणामुळे, शिवराळ भाषेमुळे विद्यापीठ ते सहसंचालक कार्यालय आणि मंत्रालयापर्यंत या लोकांना प्रतिबंध केल्याचे चित्र असून हे लोक कधीही प्राध्यापकांचे प्रश्न सोडवू शकणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. संघटनेची अवस्था नेतृत्वहीन झाली आहे. त्यामुळे आता परिवर्तन अटळ असून प्राध्यापकांनी प्रस्थापितांना दूर करून परिवर्तन पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे. असे कळकळीचे आवाहन प्रचार समितीचे प्रमुख आणि विमुक्त जातीजमाती प्रवर्गातील उमेदवार डॉ. वाल्मिक गर्जे यांनी केले आहे.

या निवडणुकीत परिवर्तन पॅनल कडून खुल्या प्रवर्गासाठी एकूण पाच उमेदवार अनुक्रमे MUST संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार, व्हीजेटीआय (VJTI)चे डॉ. अभयकुमार वायाळ, बी. एड. महाविद्यालयाच्या फ्रान्सिस वैद्य, मुपटाचे डॉ. नंदकिशोर चंदन, प्रस्थापित संघटनेतील बंडखोर उमेदवार डॉ. विजय चव्हाण असे पाच दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

महिला प्रवर्गातून MUST संघटनेच्या सरचिटणीस भवन्स महाविद्यालयाच्या डॉ. निर्मला पवार, अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून MUST संघटनेचे उपाध्यक्ष आणि पुरोगामी चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. शशिकांत माघाडे, अनुसूचित जमाती प्रवर्गातून MUST संघटनेचे कार्यकारी सदस्य व हझारिमल सोमाणी भवन्स महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. विजय हिले आणि इतर मागासवर्ग (OBC) प्रवर्गातून के. सीं. इंजिनीरिंग कॉलेजचे डॉ. बबन रिंढे असे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

खुल्या प्रवर्गासाठी एकूण १८ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांसाठी मतदारांना पसंतीक्रम द्यावा लागणार आहे. तर राखीव गटासाठी ( महिला, SC, ST, OBC, DTNT) प्रत्येक प्रवर्गातून १ उमेदवार निवडायचा आहे. विद्यापीठाच्या विद्या परिषद (Academic Council) गटातून चेतना महाविद्यालयाच्या डॉ. अमृता देशमुख, रुईया महाविद्यालयाचे डॉ. विजय चव्हाण, आणि आर. डी. नॅशनल महाविद्यालयाच्या डॉ. मेघना चौटालिया असे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

काही संघटनांनी नव्या जुन्या उमेदवारांना संधी दिली असून काही संघटनांना पूर्ण पॅनल उभे करता आले नाही. अशी परिस्थिती आहे. MUST प्रणित परिवर्तन पॅनल मध्ये कला, वाणिज्य, विज्ञान बी. एड. इंजिनीअरिंग अशा सर्व शाखेच्या उमेदवारांना संधी दिली असून समतोल साधला असल्याचे MUST चे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी सांगितले.

आपले सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास डॉ. विजय पवार यांनी व्यक्त केला आहे. एकूणच मुंबई विद्यापीठाची यावर्षीची सिनेट निवडणूक ऐतिहासिक ठरणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. येत्या चार पाच दिवसात निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल असे दिसते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!