इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या अध्यक्षपदी वैशाली चोपडे
पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
‘Grow & Flourish – वाढा आणि बहरा’ संकल्पनेतून समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प
संगमनेर | प्रतिनिधी
इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ‘Grow & Flourish – वाढा आणि बहरा’ ही वार्षिक संकल्पना जाहीर करत नव्या अध्यक्ष वैशाली चोपडे यांनी सदस्यसंख्या वाढविण्यासह समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या समारंभाला डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी नेत्रा भक्कड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आणि डिस्ट्रिक्ट पास्ट ट्रेझरर तथा नगरसेविका रचना मालपाणी यांचीही उपस्थिती लाभली.

अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर वैशाली चोपडे यांनी आगामी वर्षात युवा कौशल्य विकास, मुलींची सुरक्षितता व सक्षमीकरण, आनंद शाळा उपक्रम, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन आणि अर्थसाक्षरता या विषयांवर विविध समाजहिताचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
यावेळी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. दीपमाला भोत (उपाध्यक्षा), अश्विनी ढोले (सचिव), प्रियांका शहा (खजिनदार), अश्विनी राठी (आयएसओ), सप्तसिंधू खोसे (संपादक), ममता पोफळे (सीसी) यांची निवड करण्यात आली.
यावर्षी प्रथमच इनरव्हील क्लब ऑफ संगमनेरने सोशल मीडियावर अधिकृत प्रवेश करत इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इनरव्हीलच्या अधिकृत संकेतस्थळावर क्लबच्या उपक्रमांची नियमित माहिती प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. क्लबचा डिजिटल प्रवास सुरू करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल क्लब ई- ॲडमिन पूजा हासे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

डिस्ट्रिक्ट ई- ॲडमिन म्हणून वैशाली खैरनार यांची निवड करण्यात आली. तसेच रोटरी क्लब ऑफ संगमनेरचे अध्यक्ष समीर शाह व सचिव संकेत काजळे, लायन्स क्लब ऑफ संगमनेर सॅफ्रॉन सॅफायरचे अध्यक्ष जितेश लोढा व सचिव नम्रता आभंग तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२चे सहाय्यक प्रांतपाल (Assistant Governor) आनंद हासे यांच्या नियुक्तीबद्दलही अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रमात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. आधार फाउंडेशनच्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच आनंदवन शाळेतील १० गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅग, कंपास बॉक्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. याशिवाय निंबगावजळी येथील युवा महिला शेतकरी पूजा डेंगळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावर्षी क्लबमध्ये अनेक नवीन महिला सदस्यांचा समावेश करण्यात आल्याने क्लबची ताकद अधिक बळकट झाली असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता कोडे आणि सीमा अत्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसुधा वाकचौरे, सोनम परदेशी, धनश्री हासे, महेश भुसाळ, राजेंद्र कुटे, संदेश चोपडे, धनंजय राहाणे, सार्थक शिंदे तसेच क्लबच्या सर्व माजी अध्यक्षा आणि सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रमुख पाहुण्या नेत्रा भक्कड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात इनरव्हीलच्या सेवा, मैत्री आणि समाजहिताच्या मूल्यांचा गौरव करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. समाजसेवेची व्याप्ती अधिक वाढवत विविध स्तरांवरील महिलांपर्यंत आणि गरजू घटकांपर्यंत क्लबचे कार्य पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
