श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक पालक मेळावा 

प्रतिनिधी —

शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात इ.१२वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचा शिक्षक पालक मेळावा साईबाबा सभागृहात नुकताच संपन्न झाला. मेळाव्यासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे वार्षिक नियोजन, विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची उपस्थिती व शिस्त, पालकांची आपल्या पाल्याबाबत भूमिका यांबाबत चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी पालक प्रतिनिधी व अध्यक्ष सचिन बजाज व सचिन वाकचौरे, शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ.राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ, शिक्षक पालक मेळावा समितीच्या कार्याध्यक्षा प्रा.वृषाली खांडगे आदी उपस्थित होते.

पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी पाल्याशी सुसंवाद साधणे, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, त्याला विश्वासात घेऊन अध्ययन-अध्यापनाविषयी त्याच्याशी चर्चा करणे, वेळ देऊन त्यांच्याशी विचारांची देवाण-घेवाण करणे, शिक्षकांच्या नेहमी संपर्कात राहणे आवश्यक आहे. असे मत सचिन बजाज व सचिन वाकचौरे यांनी व्यक्त केले.

डॉ.संजय मालपाणी म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जडण-घडणीत शिक्षक व पालक यांची भूमिका अत्यंत महत्वाची असून पालकांनी वेळोवेळी शिक्षकांच्या संपर्कात राहून आपल्या पाल्यास उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत करण्यास प्रवृत्त करावे. कारण मेहनतीला पर्याय नाही. आपल्या पाल्यास थोडे स्वातंत्र्य द्यावे परंतु मोबाईलच्या अति वापरापासून परावृत्तदेखील करावे. विद्यार्थ्यांनी स्वतःचे वेळापत्रक तयार करावे.

प्राचार्य डॉ. गायकवाड म्हणाले की, शिक्षकांनी व पालकांनी मिळून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या पाल्याच्या आरोग्याकडेही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. पाल्याच्या मोबाईलच्या वापरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. उपप्राचार्य डॉ. ढमक म्हणाले की, पालकांनी शिक्षकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांची उपस्थिती, व अभ्यासातील प्रगती जाणून घ्यावी. आपल्या पाल्याचे फाजिल लाड पुरवू नयेत.

वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.सुनिल राहिंज यांनी विज्ञान शाखा व प्रा.मनिषा फासे यांनी कला व वाणिज्य शाखेच्या वतीने महाविद्यालयातील विविध उपक्रम व विविध परीक्षांच्या वार्षिक नियोजनांची माहिती पालकांना दिली. भाऊसाहेब वाकचौरे, दौलत महाले, सिताराम शिंदे या पालकांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.वृषाली खांडगे यांनी केले. सूत्र संचालन प्रा.भारती कडू व प्रा.वृषाली गोण्टे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ यांनी मानले. या प्रसंगी पालक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!