थोरात व कोल्हे यांचे पुढे काय करायचे हे ठरवू — महसूल मंत्री विखे पाटील यांचा इशारा  

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

जिल्ह्याच्या राजकारणात कोणीही कोणाच्या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करायचा नाही, असा अलिखित करार आहे. मात्र गणेश कारखाना निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी विखेविरोधात पॅनल उभे केले. यावर महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सूचक इशारा दिला.

गणेश कारखान्याच्या निवडणुकीत उतरून थोरात आणि कोल्हे यांनी अलिखित करार मोडला आहे. त्यामुळे आता त्यांचे पुढे काय करायचे हे ठरवू , अशा शब्दात विखे यांनी इशारा दिला आहे.

सध्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत यंदाच्या वर्षी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घातले आहे. थोरात आणि कोल्हे यांनी एकत्र येत विखे यांच्याविरुद्ध मोठे आव्हान उभे केले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरील इशारा दिला आहे.

यापूर्वीपासून गणेश सहकारी साखर कारखाना हा विखे पिता पुत्रांच्या ताब्यात आहे. त्यांच्याच ताब्यात असलेल्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने हा साखर कारखाना नुकताच पुन्हा चालवण्यासाठी घेतला आहे. निवडणूक काळात सहकार विभागाने व मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याने त्यावरही मोठा गदारोळ झाला होता.

आमदार बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे एकत्र येऊन साखर कारखान्याची निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत प्रचारादरम्यान  सुद्धा विविध आरोप प्रत्यारोप झाले. थोरात कोल्हे यांच्या मंडळाला अगदी प्रचार सभेसाठी जागा नाकारण्यात आल्याचा आरोप देखील आमदार थोरात यांनी भर सभेत केला होता. तिथली हुकूमशाही मोडून काढली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले होते. विवेक कोल्हे यांनी देखील आक्रमक पवित्रा घेत विखे यांच्या हुकूमशाही विरुद्ध दंड थोपटले. या सर्वाचा परिपाक म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच ही प्रतिक्रिया दिली आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!