नवा निधी आणण्याचा पराक्रम करून दाखवायला हवा होता !
आमदार थोरात यांच्या समर्थकांचा सोशल मीडियातून मंत्री विखे यांना टोमणा !
म्हाळूंगीनदी वरील पुलाच्या बांधकामाच्या निधीवरून कलगीतुरा…..
प्रतिनिधी —
म्हाळूंगी नदीवरील खचलेल्या पुलाने संगमनेर शहरातील राजकीय वर्तुळात मोठा धुमाकूळ घातला असून. माजी महसूल मंत्री, विद्यमान महसूल मंत्री आणि खासदार यांच्या कार्यकर्त्यांच्या पत्रक बाजी रंगली आहे. खचलेल्या, तुटलेल्या पुलासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी कोणी आणला ? यावरून समाज माध्यमातून या नेत्यांचे समर्थक कागदी घोडे नाचवत आहेत. या कलगीतुऱ्याने संगमनेरकरांची करमणूक होत आहे.

माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर खालील प्रमाणे पोस्ट करून ती व्हायरल केली आहे. त्यात म्हटले आहे की,
राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आला.
त्याचाच एक भाग म्हणून संगमनेर नगरपरिषद हद्दीतील शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी मंजूर असलेला निधी व सुरु असलेल्या कामाला आता स्थगिती देऊन म्हाळूंगी नदीवरील पुलासाठी तो निधी वळविण्यात आला आहे.

थोडक्यात जनतेची फसवणूक करून आधीच्या कामांना मिळालेला निधी दुसरीकडे वापरण्यात येणार आहे. नवीन निधीची उपलब्धता केली नाही. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळातीलच निधीची फिरवाफिरव केली आहे. त्यामुळे कुणीही पोकळ गवगवा करू नये. आणि त्याचे श्रेय घेऊ नयेत.
यांना सत्ता असताना नवा निधी आणता आला नाही आणि आता पालकमंत्री असतानाही ७ कोटीचा निधी ते देऊ शकले नाही. त्यांना ती इच्छाच नसेल कदाचित…

मात्र आता या निधीवरून श्रेयवाद सुरु झाला आहे. म्हाळूंगी नदीवरील पूल पडल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी निधी मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. हा निधी मिळू नये म्हणून ज्यांनी प्रयत्न केला होता आता तेच हा निधी मिळवून दिला असा डंका मिरवत आहे.
संगमनेरात सुरु असलेल्या अनेक विकास कामाला काही लोक सातत्याने विरोध करीत असतात. अगदी मंत्रालय पातळीवर जाऊन हा पूल होऊ नयेत म्हणून काही विघातक खोडा घालण्याचा प्रयत्न करत होते. असे राजकारण बरोबर नाही.
मात्र संगमनेर मधील जनता सुज्ञ असून ती या खोट्या भूल थापांना व जाहिरातबाजीला बळी पडणार नाही. येथील तालुक्याच्या विकासात कवडीमोलाचे योगदान नसणाऱ्यांनी खोट्या अफवा पसरवून श्रेय घेऊ नयेत.

