म्हाळुंगी नदीवरील पूल होऊ नये यासाठी भाजपच्या नेत्यांचे मंत्रालयात प्रयत्न — आमदार थोरात

प्रतिनिधी —

नगरपालिका निवडणुका होईपर्यंत इलेक्शन इश्यू करायचा आहे म्हणून म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम होऊ नये, यासाठी भाजपचेच काही नेते मुंबईत मुख्यमंत्री अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करत असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार बाळासाहेब थोरात यांनी गेल्या काही दिवसापासून बहुचर्चित ठरलेल्या म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पुलासंदर्भात महत्त्वाचे विधान करताना भारतीय जनता पक्षातील वजनदार नेत्यावर शरसंधान साधले आहे.

थोरात म्हणाले, स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर या दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल दुर्दैवाने पडला आहे. पाण्याचा लोंडा मोठा असल्याने पूल पडल्याने अनेक नागरिकांची अडचण झाली आहे, ही बाब नाकारता येणार नाही. पुलाचे काम तातडीने व्हावे, यासाठी माझ्या पातळीवर प्रयत्न केले. मात्र राज्यात सरकार माझे नाही ही वस्तुस्थिती आहे. तरीदेखील मी यासाठी आग्रही राहिलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात पत्र दिले आणि निधी मिळविण्याचा प्रयत्न केला.

मात्र काही मंडळी मुंबईत जाऊन नगरपालिका निवडणुका होईपर्यंत हा पूल होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे. या विषयावर आम्हाला आंदोलन करायचं आहे, अशी मांडणी ते मंत्रालयात करत आहेत. खरंतर सरकार त्यांचा आहे. त्यामुळे त्यांना या पुलाचे काम करून घेण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र पालिका निवडणुकीचे भांडवल म्हणून या पुलाचा प्रश्न पुढे आणला जात आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण हा इशू करू शकतो, असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितले जात आहे.

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना आपण या संदर्भात सूचना दिल्या आहेत. केवळ मलाच नको तर भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचं मुंबईत वजन आहे. त्यांना सुद्धा या कामाचे एस्टिमेट द्या. त्यांच्याकडून काम होईल, अशी अपेक्षा बाळगू शेवटी नागरिकाचे काम होण्यास महत्त्व आहे. त्याचे श्रेय आपण त्यांना देऊ, असे देखील थोरात म्हणाले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!