आमदार थोरातांची भूमिका म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’!
भाजपची प्रतिक्रिया
पालकमंत्री विखे पाटील यांची पुलासाठी साडेचार कोटी रुपयांच्या निधीची मागणी
प्रतिनिधी —
स्वत:च्या नावाने व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यापेक्षा म्हाळुंगी नदीच्या पुलाकरीता निधी आणण्याचे प्रयत्न केले असते तर आपले अपयश उघडे झाले नसते. परंतू आता आपल्याला निधीही आणता येत नाही हे सर्व जनतेला कळाल्यानेच आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याचा आमदार बाळासाहेब थोरात यांचा प्रयत्न म्हणजे ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असाच असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

म्हाळुंगी नदीवरील पुलाच्या कामा संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावर आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या आरोपाची खिल्ली उडवून पक्षातर्फे भाजपाचे शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार, अमोल खताळ यांनी प्रसिध्दीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, म्हाळुंगी नदीवरील पुल कुणामुळे खचला याची संपूर्ण कल्पना संगमनेरच्या जनतेला आहे. परंतू आता सत्ता नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या आमदार थोरातांना या पुलाच्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून निधी मंजुर करुन आणण्यातही अपयश येत आहे. त्यामुळेच आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे.

वास्तविक राज्य सरकारने या पुलाच्या कामासाठी सर्वतोपरी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातूनही या पुलाच्या कामाचे सर्व प्रस्ताव नगरविकास विभागाकडे देण्यात आलेले आहेत. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पुलाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष बाब म्हणून ४ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी यापुर्वीच पत्र दिले असल्याची वस्तुस्थिती असताना सुध्दा कोणत्याही विषयाची माहीती करुन न घेता केवळ भारतीय जनता पक्षावर बेछुट आरोप करुन, आमदार थोरात वेळ मारुन नेण्याचे काम करीत आहेत. पुलाच्या कामासाठी जनता रस्त्यावर उतल्यानंतर आमदार थोरातांनी पुलाच्या कामावरून बोलायला सुरूवात करावी हे सुध्दा आश्चर्यकारक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

पुलाच्या कामाला महत्व न देता स्वत:च्या नातेवाईकांच्या नावाने व्यापारी संकुल उभारण्याच्या कामाला प्राधान्य देणा-या आमदार थोरातांनी या व्यापारी संकुलाच्या कामाचा सर्व निधी पुलाच्या कामासाठी वर्ग करावा असे पुढे येवून जाहीर करावे असे थेट आव्हान भारतीय जनता पक्षाच्या वतीने देतानाच आपल्या बगलबच्चे असलेल्या ठेकेदारांच्या चूकीमुळे खचला असून यावर सुध्दा आमदार थोरातांनी बोलावे आशी मागणी करण्यात आली आहे.

