साखर कारखान्याच्या स्क्रॅपच्या व्यवहारातून वाद : एकाचे अपहरण !
संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
प्रतिनिधी —
साखर कारखान्याच्या लोखंडी स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या दोघांमध्ये वाद झाल्याने मुंबईच्या एका व्यापाऱ्याने संगमनेर येथील एका स्क्रॅप (लोखंडी भंगार) व्यापाऱ्याचे अपहरण केल्याची घटना संगमनेरात घडली असून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

संगमनेर शहरा लगत असणाऱ्या समनापुर येथील व्यापारी अश्फाक मुक्तार मलिक यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. साबान अत्तर अली उर्फ बाबू (रा. तुर्भे, नवी मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे की, अश्फाक यांचा समनापुर येथे मलिक स्टील नावाने लोखंडाचा व्यवसाय आहे. तसेच अश्फाक यांचा मोठा भाऊ मोबीन मुक्तार मलिक उर्फ सज्जू यांचा भंगार स्क्रॅपचा व्यवसाय आहे. मोबीन मलिक आणि नवी मुंबई तुर्भे येथील साबान अत्तर अली उर्फ बाबू या दोघांनी संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात साखर कारखान्या मधील लोखंड स्क्रॅप संयुक्तपणे घेतले होते. व त्यामधून प्राप्त होणारे उत्पन्न दोघांमध्ये वाटून घेतले जात होते. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी दोघांमध्ये आर्थिक व्यवहारावरून तणाव निर्माण झाला होता.

१५ एप्रिल २०२३ रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास माझ्या लहान भावाने फोन केला की, मोबीन उर्फ सज्जू याची मोटरसायकल ही समनापुर मार्केट चौफुलीवर पडलेली आहे. त्यामुळे मी व माझा छोटा भाऊ व इतर माझे दोन भाऊ असे भावाचा शोध घेत असताना आम्हास माहिती मिळाली की, मोठ्या भावाचा व्यवसाय पार्टनर साबान अत्तर अली उर्फ बाबू व माझा भाऊ मोबीन मुक्तार मलिक उर्फ सज्जू व्यवसायामुळे त्याच्यासोबत गेला की त्यास पळवून नेले याबाबत मला शंका वाटल्याने माझ्या भावाचा दिवसभर शोध घेतला.

दरम्यानच्या काळात भावाने फोन करून मी बाबू याच्यासोबत असल्याचे सांगितले. माझा भाऊ सज्जू आणि बाबू यांच्यामध्ये गेल्या काही महिन्यापासून जे व्यवसायिक तणाव निर्माण झाले होते त्या वादातूनच माझ्या भावास अज्ञात कारणासाठी पळवून नेले किंवा तो स्वतः त्यासोबत गेला याबाबत मला शंका आहे. त्यामुळे साबान अत्तर अली उर्फ बाबू राहणार तुर्भे नवी मुंबई याने माझ्या भावास व्यावसायिक भागीदारीतील वादामुळे अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याची माझी फिर्याद आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात याबाबत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक धादवड हे करत आहेत.

