संगमनेरात पावणे दोन टन गोवंश मांस जप्त !

पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई ;  सुमारे दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत

अल्पवयीन आरोपीसह दोघे ताब्यात तर चौघे फरार

 

 

संगमनेरचे पोलीस उपअधीक्षकपद जवळपास सात महिन्याहून अधिक काळ झाला तरी रिक्तच आहे. या पदाचा प्रभारी कार्यभार शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे आहे. सातव संगमनेर मध्ये सातत्याने आपल्या पथकामार्फत अवैध धंद्यांवर कारवाई करताना दिसतात. तर दुसरीकडे शहर पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हटविले असून त्यांच्या जागेवर नव्या कार्यक्षम निरीक्षकांची नियुक्ती झाली असली तरी नव्या निरीक्षकांच्या कार्यकाळात देखील शहरातील कत्तलखाने सुरूच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे कत्तलखान्या संदर्भात काय भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट होईल.

 

 

 

प्रतिनिधी

राजकीय पुढाऱ्यांपासून पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच प्रशासकीय विभागांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरलेले संगमनेरचे अवैध कत्तलखाने आणि गोवंश हत्या सुरुच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले असून संगमनेर शहर पोलिसांना अंधारात ठेवत पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने या कत्तलखान्यांवर छापेमारी करीत मोठी कारवाई केली आहे.

वारंवार टाकलेल्या छापल्यानंतर देखील संगमनेरातील बहुचर्चित कत्तलखाने सुरूच आहेत. कोणत्याही प्रकारच्या कारवाईला न घाबरणाऱ्या कसायांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आपले धंदे सुरूच ठेवले आहेत. गुरुवारी पहाटे पोलीस उपअधीक्षकांच्या कार्यालयातील पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल १ हजार ७०० किलो गोमांस आणि दोन चार चाकी वाहने असा सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील मोगलपुरा येथे आयुब तांबोळी याच्या चाळेच्या दोन नंबरच्या खोलीमध्ये सोन्या कुरेशी व त्याचा साथीदार सलीम कुरेशी हे दोघे गोवंश जनावराची कत्तल करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना मिळाली होती. पथकातील पोलीस नाईक अण्णासाहेब दातीर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे, अमृत आढाव व प्रमोद गाडेकर यांना सोबत घेत ही कारवाई करण्यात आली.

पथकातील कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी रात्री सव्वा एक वाजता छापा टाकला असता तेथे तिघेजण गोमांस एका पिकअप आणि मारुती ओमनी कारमध्ये भरताना पथकाला दिसले. त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर ओमनी आणि पीकअप चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले. पकडलेल्या आरोपींमध्ये आसिफ इकबाल कुरेशी (वय ३२ वर्ष ह. रा. मदिनानगर, संगमनेर मूळ रा. मालेगाव, नासिक) याच्या सहित एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पकडलेल्या आरोपींकडे पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींनी हे गोमांस सोनू रफिक कुरेशी व सलीम साटम कुरेशी या दोघांचे मालकीचे असल्याबाबत सांगितले. वाहन चालकांविषयी मात्र पोलिसांना माहिती मिळू शकली नाही.

पोलिसांनी आपल्या कारवाईमध्ये कत्तल केलेल्या जनावरांचे गोमांस, एक पिकअप, एक ओमनी कार, कुऱ्हाड, कानस, चाकू आदी कत्तलीसाठी लागणारे ९ लाख ६० हजार रुपयांचे साहित्य जप्त केले असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आसिफ इकबाल कुरेशी, सोनू रफिक कुरेशी, सलीम साटम कुरेशी यांच्यासह दोन्ही वाहनांवरील अज्ञात वाहन चालक आणि एका बालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी पकडले असून अन्य आरोपी फरार झाले असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर कत्तलखाना चालकाचे नाव निष्पन्न झाले असून कत्तलखाना चालक फरार झाले आहेत. फरार झालेल्या दोघां चालकांसह दोन्ही कत्तलखाना चालकांना पकडण्याचे काम शहर पोलिसांना करावे लागणार आहे. बहुतांशी गुन्ह्यांमध्ये फरार आरोपी अद्यापही फरार असून त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे शहर पोलीस या आरोपी संदर्भात नेमकी काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!