शेतकऱ्याला १५ लाख रुपयांना फसविले !
खरेदी खताचे दस्त घेऊन आरोपी नोंदणी कार्यालयातुन पसार
संगमनेर शहर पोलीस, उपअधीक्षक आणि डीएसपींकडे तक्रार केली… पण उपयोग झाला नाही…
प्रतिनिधी —
जमीन विकत घेणाऱ्या शेतकऱ्याकडून जमिनीची किंमत १५ लाख रुपये वसूल करून खरेदीच्या दिवशी खरेदी विक्री नोंदणी कार्यालयातून खरेदीखतासह पैसे घेऊन आरोपी पसार होण्याची घटना संगमनेर तालुक्यात घडली आहे. पीडित शेतकऱ्याने संगमनेर शहर पोलीस स्टेशन, पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली पण उपयोग झाला नाही. शेवटी न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सचिन भास्कर गीते (रा. पिंपरीलौकी, अजमपुर तालुका संगमनेर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून अमोल रामदास गीते आणि रामदास लक्ष्मण गीते (रा. बोल्हेगाव रोड एमआयडीसी, मोनालिसा नगर, नागापूर, अहमदनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी आणि फिर्यादी हे मूळचे पिंपरीलौकी अजमपुर येथील रहिवासी आहेत. दोघांचीही या गावांमध्ये शेती आहे. आरोपींनी त्यांची शेतजमीन विक्रीस काढल्याची माहिती फिर्यादींना मिळाली. त्यानुसार फिर्यादीचे वडील यांनी संबंधित दोन्ही आरोपींकडे शेती खरेदी संदर्भात व्यवहार करता येईल का अशी विचारणा केली.

आम्हाला शेती विकायची आहे तुम्ही घेणार असाल तर घेऊ शकता असे आरोपींनी सांगितले त्यामुळे आरोपी कडून जमीन विकत घेण्याचे ठरले. सदर जमिनीसाठी १५ लाख रुपये रक्कम देण्याचा व्यवहार आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये ठरला. त्यानुसार फिर्यादीने त्यांना सुरुवातीला ५ लाख रुपये विसार म्हणून पिंपरीलौकी अजमपुर या ठिकाणी दिला. व दोघांच्या संमतीने मिळकतीचे खरेदीखत करण्याचे ठरले.

त्यानुसार संगमनेर येथे खरेदी खत लिहून घेण्यात आले. साक्षीदारांच्या त्यावर सह्या करण्यात आल्या. सदरचे खरेदीचे दस्त नोंदवण्यासाठी सहाय्यक दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात देण्यात आला होता. मात्र आरोपींनी आम्हाला उर्वरित रक्कम ताबडतोब पाहिजे असे सांगितल्यामुळे फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांनी उर्वरित रक्कम रोख आणि चेकच्या स्वरूपात आरोपींना दिली. व त्यानंतर खरेदी करण्याचे ठरले.

परंतु ज्या दिवशी खरेदीचे कागदपत्रे नोंदविण्यात येणार होते त्या दिवशी नोंदणी कार्यालयातील नेटचे सर्व्हर बंद पडल्यामुळे खरेदी खताचा दस्त नोंदविता आला नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी नोंदणी करण्याचे ठरले. त्यामुळे आरोपींना संपूर्ण रक्कम मिळाली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वजण फिर्यादी हे साक्षीदारांसह नोंदणी कार्यालयामध्ये गेले व सदर दस्ताची डाटा एन्ट्री होण्यासाठी सदरचा दस्त नोंद करण्यासाठी ठेवला असता आरोपींनी सर्वांची नजर चुकवत मूळ खरेदीखताचा दस्त घेऊन तिथून पळ काढला.

आरोपी जमिनीची खरेदी न देता कागदपत्रांसह गायब झाले असल्याचे फिर्यादींना समजले. त्यानंतर आपली १५ लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. फिर्यादीने यासंदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाणे तसेच पोलीस उपअधीक्षक संगमनेर आणि नगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार पाठविली होती. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. म्हणून त्यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अमोल गीते आणि रामदास गीते या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

