मुलाचा गळा आवळून खून केल्याच्या आरोपातून वडिलांची निर्दोष मुक्तता !

संगमनेर न्यायालयाचा निकाल

प्रतिनिधी —

मुलाने गाईंचा चारा कापण्याचे मशीन विकण्यास विरोध केला, शेत जमीन दुसऱ्याच्या नावे केल्याने विकता येत नाही, या कारणावरून वडिलांनी मुलाचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेर न्यायालयाने वडिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. दत्तात्रय रामचंद्र हुलवळे (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) असे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात दत्तात्रय रामचंद्र हुलवळे यांच्या विरोधात त्यांचा दुसरा मुलगा प्रवीण दत्तात्रय हुलवळे याने दिलेल्या तक्रारीवरून भाऊ अंकुश याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० जून २०१९ रोजी वडगाव पान येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले होते.

फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी, फिर्यादीची आजी सोन्याबाई हिच्या नावावर कळस बुद्रुक ता. अकोले येथे शेतजमीन होती. ती विकल्यानंतर फिर्यादीच्या कुटुंबीयांनी वडगाव पान येथे फिर्यादी, फिर्यादीची आई आणि भाऊ यांच्या नावावर शेत जमीन घेतली. मात्र वडिलांना दारूचे व्यसन असल्याने त्यांनीही शेत जमीन विक्री करू नये, यासाठी ती वडिलांना वगळून फिर्यादीच्या कुटुंबाच्या एकत्रित नावावर करण्यात आली होती. याचा वडिलांना राग होता. सदरची शेतजमीन त्यांना विक्री करावयाची होती.

दारूच्या व्यसनामुळे ते घरातील वस्तूंची विक्री करत तसेच कुटुंबीयांना मारहाण देखील करत असत. या मारहाणीमुळे फिर्यादी आणि त्याचे आई फिर्यादीच्या मामाकडे राहावयास आहे तर फिर्यादीचा मयत भाऊ अंकुश हा वडिलांसोबत वडगाव येथे राहतो. चॉपकटर विकण्याच्या कारणावरून भाऊ अंकुश आणि वडील दत्तात्रय हुलवळे यांच्यामध्ये घटनेच्या आधी वाद झाला होता. वडिलांनी चहाचा कप फेकून मारल्याने भाऊ अंकुशच्या कपाळावर जखम झाली होती. याची माहिती मिळाल्याने फिर्यादी व त्याचे कुटुंबीय वडगाव पान येथे अंकुशला भेटण्यासाठी आले होते. मात्र घराला कुलूप लावलेले होते आणि त्याचा मोबाईल देखील बंद होता.

तसेच वडिलांच्या सततच्या भांडणाला कंटाळून आजी देखील मंगळापूर येथे राहावयास गेलेली आहे. भाऊ अंकुश देखील वडिलांना घरातील वस्तू विकण्यास विरोध करत असल्याने त्यांना त्याचा देखील राग होता. फिर्यादी मामाच्या घरी असताना वडगाव पान येथून एका व्यक्तीने केलेल्या फोनवर फिर्यादीचा भाऊ हालचाल करत नसल्याचे तसेच तो घरात पडलेला असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे फिर्यादी नातेवाईकांसह वडगाव पान येथे आला असता त्यांना घरामध्ये भावाचा मृतदेह आढळून आला.

भांडणामुळे वडिलांनी ‘आजच तुझा काटा काढणार असल्याची धमकी त्याला दिली होती’ त्यामुळे त्यांनी त्याचा खून केला असल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली होती. तत्कालीन अधिकाऱ्यांनी तपास करून न्यायालयात आरोपीविरोधात आरोप पत्र दाखल केले होते. संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.

या खटल्यामध्ये दहा साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा व्यक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश कुलकर्णी यांनी आरोपीचे वकील स्मिता सस्कर यांनी आपल्या युक्तिवादात घटना घडताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याचा, पोस्टमार्टम अहवाल, उशिराची फिर्याद, अंकुश याने आत्महत्या केल्याची शक्यता आदी बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणल्या. सरकार पक्ष आरोपी विरोधात गुन्हा शाबित करू शकला नसल्याने तसेच ॲड. सस्कर यांचा व्यक्तिवाद ग्राह्य धरीत न्यायाधीश कुलकर्णी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!