संगमनेर शहरात मोटरसायकल चोरी थांबेना !

शहर पोलिसांनी टोळी पकडून देखील चोरीचे सत्र सुरूच !

 

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेरात येऊन मोटरसायकल शोधण्याच्या संगमनेर पोलिसांच्या कामगिरीचा उदो उदो केला. त्यासाठी पत्रकार परिषद देखील घेतली. पोलीस अधीक्षकांनी शहर पोलिसांचे कौतुक केले. मात्र संगमनेर उप विभागात सातत्याने होत असलेल्या चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या, अवैध धंदे, गौण खनिज तस्करी, वाळू तस्करी, अवैध कत्तलखाने, गोवंश हत्या या संदर्भातील गंभीर गुन्हे या कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने मागे पडले आहेत. दबले गेले आहेत.या गुन्ह्यांचा तपास लागण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पोलीस अधीक्षक त्याबाबत काय भूमिका घेतात हे पाहण्यासारखे आहे.

 

 

प्रतिनिधी —

काही दिवसांपूर्वी संगमनेर शहर पोलिसांनी नगर जिल्ह्यासह आणि राज्यातील काही भागातून मोटरसायकल चोरी करण्याची प्रकरणे उघडकीस आणली. यामध्ये एका टोळीकडून ५१ मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या. ही मोठी कारवाई झाली असल्याचे सांगितले गेले. या कारवायाची माहिती देण्यासाठी थेट पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संगमनेर मध्ये येऊन पत्रकार परिषद घेतली आणि पोलिसांचे कौतुक देखील केले.

आता मोटर सायकल चोरीला आळा बसेल अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत असताना पोलीस अधीक्षकांच्या पत्रकार परिषदेनंतर आणि संगमनेर शहर पोलिसांच्या मोठ्या कारवाईनंतर संगमनेर शहरात सातत्याने रोज मोटरसायकल चोरी होत असल्याचे गुन्हे घडत आहेत.

मोटार सायकल चोरी थांबलेली नाही. दररोज मोटरसायकल चोरी जाण्याचे प्रमाण जैसे थे आहे. त्यामुळे पोलिसांनी कितीही कारवाया केल्या तरी संगमनेर शहरातील मोटार सायकल चोरी थांबायचं नाव घेत नाही. ही मोटर सायकल चोरी बंद तरी कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

संगमनेर शहरासह संगमनेर उपविभागात असणाऱ्या संगमनेर तालुका, आश्वी, घारगाव या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत देखील सातत्याने मोटार सायकल चोरीची प्रकरणे घडत आहेत. रोजच्या दैनिक अहवालांमधून संगमनेर शहरासह या चार पोलीस ठाण्यांमधून दररोज मोटरसायकल चोरी होत असल्याचे एक तरी प्रकरण घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संगमनेर शहरच काय संपूर्ण उपविभागात मोटार सायकल चोऱ्यांमध्ये सातत्य असल्याचे आढळून येत आहे.

पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात. चोरीला गेलेल्या मोटारसायकल यांची संख्या समजून येते. मात्र अनेक मोटार सायकल चोरींचे गुन्हे नोंदवले देखील जात नाहीत. त्याबद्दल काहीच बोलले जात नाही. कितीही मोटर सायकल मिळून आल्या तरी मोटार सायकल चोरीला आळा कोण घालणार हा प्रश्न मात्र कायमस्वरूपी जैसे थे आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!