संगमनेरात पुन्हा सोनेतारण घोटाळा ; महसूल मंत्र्यांच्या बँकेला फसवले

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक आणि जी एस महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सोनेतारण घोटाळ्यानंतर आता सोने मूल्यांकनकार गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे याचा प्रवरा सहकारी बँकेतील ३८ लाख ४४ हजार ४२२ रुपयांचा फसवणुकीचा घोटाळा समोर आला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शहाणे याच्यासह नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात बँकेचे संगमनेर शाखेचे व्यवस्थापक सुदाम किसन शेजवळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बँकेने नेमलेल्या अधिकृत मूल्यांकनकार जगदीश शहाणे याच्यामार्फत कर्जदाराने दिलेल्या सोन्याची शुद्धता तपासणी करून ते खरे किंवा खोटे याची खात्री केल्यावर सोन्याचे मूल्यांकनाचे तपासणी व ते खरे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर बँकेच्या नियमानुसार सोने तारण कर्ज वितरित करण्यात आले आहे.

बँकेने सोन्याच्या मूल्यांकनाचे काम करण्यासाठी गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश लक्ष्मण शहाणे (रा. मालदाड रोड, संगमनेर) यांची नेमणूक केली होती. त्यामुळे बँकेत कर्जासाठी तारण ठेवलेले सोने खोटे निघाले तर त्याबाबत मूल्यांकनकार व सोनेतारण कर्जदार यांना जबाबदार धरण्यात येते.

संगमनेरमध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा संगमनेर, नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक शाखा संगमनेर, जीएस महानगर को-ऑपरेटिव बँक शाखा संगमनेर या बँकांमध्ये झालेले सोनेतारण प्रकरणात तारण ठेवलेल सोने निघाले असून या बँकांमध्ये जगदीश शहाणे हा अधिकृत सराफ असल्याने त्याच्या व कर्जदारांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बँकेने ४० सोनेतारण कर्जदारांच्या दागिन्यांची तपासणी करण्याचे ठरविले होते. तपासणीअंती आठ सोनेतारण कर्जदारांनी बँकेकडे गहाण ठेवलेले सोने खोटे असल्याचे आढळून आले.

त्यामुळे शाखा अधिकारी सुदाम शेजवळ यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांनी फेब्रुवारी २०२२ पासून कर्ज घेतेवेळी तारण म्हणून बँकेत खोटे सोने ठेवून तसेच खोटे सोने खरे असल्याचे मूल्यांकन प्रमाणपत्र शहाणे यांनी सोबतच्या आठ कर्जदार आरोपींसह बँकेला देऊन बँकेचा विश्वास संपादन करत ३८ लाख ४४ हजार ४२२ रुपयांची फसवणूक केली. अशा आशयाची फिर्याद दिल्याने शहर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात फसवणुकीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.

यांच्या विरोधात झाला गुन्हा दाखल… 

1) भानुदास यशवंत ढगे रा. पिंपळगाव खांड, ता. अकोले, 2) गोरक्ष राधाकृष्ण गाडेकर रा. मनोली, ता. संगमनेर, 3) सुधीर रावसाहेब घुगे रा. घुलेवाडी, ता. संगमनेर, 4) मारुती अण्णासाहेब मंडलिक रा. रायतेवाडी फाटा, संगमनेर खुर्द, 5) शरद मारुती पर्बत रा. ढोलेवाडी राजापूर, ता. संगमनेर, 6) राहुल ज्ञानेश्वर गुरुकुले रा. पाटील मळा, संगमनेर खुर्द, 7) सारिका सतीश पोटे रा. संगम निर्माण संस्था, घुलेवाडी, ता. संगमनेर, 8) सुशील सुरेश रोहम रा. निमगाव टेंभी, ता. संगमनेर, 9) गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश लक्ष्मण शहाणे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!