धांदरफळ खुर्द मध्ये महिला दिन उत्साहात साजरा !
प्रतिनिधी —
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत व पिचकू फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे धांदरफळ खुर्द या गावात “आंतरराष्ट्रीय महिला दिन” आयोजित करण्यात आला. महिलांना महिला दिन माहित व्हावा व हा दिन का साजरा करतात हे समजावे व गाव विकासाच्या प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा, गावात बाल सभा, महिला सभा व्हाव्यात या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून व स्त्री मुक्तीच्या गीतांनी करण्यात आली. यानंतर सर्व महिलांनी त्यांना समजलेला महिला दिन यावर आपली मत मांडली.

सरपंच लता खताळ यांनी मनोगत व्यक्त केले व सर्वांना महिला दिनाच्या सदिच्छा दिल्या. त्यानंतर बी.जे. खताळ जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.सुभाष आरोटे, भास्कर खताळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.लोहारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या एखंडे मॅडम, शाळेतील विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले.

यानंतर विद्यालयाच्या मुलींनी व्यसन मुक्ती या विषयावर पथनाट्य सादर केले तसेच महिला व मुलींसाठी मनोरंजनासाठी खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी पिचकू फाऊंडेशनच्या वतीने बाल स्नेही गाव या संकल्पनेला घेऊन पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले. सर्व महिला आणि बालकांनी हे पोस्टर पाहून त्यावर चर्चा केली. कार्यक्रमात गावातील महिलांनी व मुलींनी मोठ्या संखेने सहभाग घेतला. महिला दिनाच्या निमित्ताने गावातील सर्व महिलांनी आपल्या गावात महिला व बालकांसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात यावे यात त्यांचा सक्रीय सहभाग राहील असे मत मांडले.

फाऊंडेशनच्या वतीने गावात सुरू झालेल्या “अच्छी आदत” या कार्यक्रमाबद्दल स्वप्निल मानव यांनी सर्वांना माहिती दिली. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरपंच लता खताळ, उपसरपंच संदीप ठोंबरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसंघाच्या अध्यक्ष राधा खताळ व गावातील तरुण युवक चेतन देवगिरे, सतीश खताळ, नितीन कोकणे, सुजित गोफणे व गावातील ग्रामस्थ व फाऊंडेशनचे संचालक स्वप्निल मानव यांनी मेहनत घेतली.

