चोरट्यांनी कहर केला… जप्त केलेली वाळू चोरून नेली !

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामध्ये लहान मोठ्या चोऱ्यांपासून घरफोड्या आणि दरोडा असे प्रकार होत आहेत. मोटार सायकल चोरी, शेतकऱ्यांच्या वीज पंपांची चोरी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या अशा विविध प्रकारातल्या चोऱ्या सुरू आहेत. आता मात्र चोरट्यांनी कहर केला असून शेतकऱ्याच्या शेतातील वाळू साठा चोरून नेल्याची घटना घडली आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात ही घटना घडली असून घारगाव पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळा नदी पात्रा जवळील रामभाऊ उमा करंजेकर यांच्या मालकीच्या गट नंबर ८७२ मध्ये असलेला वाळूचा साठा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.

सदर साठा हा जप्त केलेल्या वाळूचा साठा होता. महसूल विभागाने वाळू साठा जप्त केला असल्याची नोंद आहे. यासंदर्भात तलाठी युवराज सिंग हदू सिंग जारवाल यांनी फिर्याद दिली असून घारगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे हा वाळू साठा २० ब्रास असून त्याची सरकारी किंमत १४ हजार २८० रुपये इतकी आहे. २० ब्रास एवढा मोठा माती मिश्रित वाळू साठा चोरून नेण्यासाठी चोरट्यांना वाहने आणि इतर साधनांचा वापर केला आहे.

त्यामुळे हा वाळू साठा चोरून नेण्यासाठी वेळ लागला असेल. शिवाय वाळू चोरून नेताना आवाज देखील झालेला असणार, तरीही संबंधितांना याबाबत कुठलीही खबर लागलेली नाही. चोरी करणारे चोर होते की वाळू तस्कर होते ? त्यामुळे वाळू साठ्याची चोरी ही संगणमताने झाली आहे काय ? असा संशय पोलिसांना पोलिसांकडून व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!